मोरे आणि शिर्के यांनी मिळून हजारोंच बहामनी सैन्य कापून काढलं

शिवरायांच्या प्रत्येक गडावर एक अख्खी कादंबरी लिहून व्हावी इतका इतिहास दडला आहे. अनेक मावळ्यांनी जीवाची बाजी लावून हे किल्ले सांभाळले आणि महाराष्ट्राची मान उंचावत ठेवली.

अशाच एका किल्ल्यावरच्या युद्धाची माहिती आपण आज घेणार आहोत विशाळगड उर्फ खेळणा.

विशाळगड म्हटल्यावर आपल्याला आठवते शिवरायांनी पन्हाळ्यावरून सिद्दी जोहरचा मोडलेला वेढा, पावनखिंडीतली लढाई, बाजी प्रभुंचा पराक्रम आणि महाराज विशाळगडावर पोहचल्यावर उडालेल्या तोफा.

पण अनेकदा प्रश्न पडतो की महाराज पन्हाळ्यावरून सुटल्यावर विशाळगडावरच का गेले?

अनेकांना अस वाटत की हा गड पन्हाळ्यापासून जवळ होता. मग मुद्दा उरतो की सिद्दीने जसा पन्हाळ्याला वेढा घातला तसा विशाळगडाला घातला असता तर?

याच उत्तर आहे सिद्दी जोहरच काय पण औरंगजेब सुद्धा विशाळगड सहजासहजी जिंकू शकला नसता. विशाळगड अभेद्य होता.

विशाळगडावर अनेक लढाया झाल्या मात्र अशीच एक रोमहर्षक लढाई पंधराव्या शतकात झाली होती.

गोष्ट आहे 1453 सालची. दक्षिण भारतात बहामनी सुलतानाचे वर्चस्व होते. अल्लाउद्दीन अहमदशहा आपली राजधानी बिदर मधून राज्यकारभार पहात होता. भारत भरात मुसलमानी राजवट पसरत चालली होती.

पण महाराष्ट्रात अनेक मराठा सरदार होते जे स्वतःच स्वतंत्र अस्तित्व राखून होते.

अनेकदा हज यात्रेसाठी जलमार्गाने निघालेल्या यात्रेकरूंची कोकणात लूट केली जाई.

या सगळ्याचा बंदोबस्त करण्यासाठी अहमदशहाने आपला सर्वात पराक्रमी सरदार खलफ हसन मलीक उत तुज्जार याला कोकण मोहिमेवर पाठवले.

मलिक उत तुज्जार सात हजाराची बहामनी सेना घेऊन निघाला. चाकणला त्याने आपली छावणी उभा केली आणि मावळातून तो कोकणात उतरला. रायरी वगैरे किल्ले ताब्यात घेतले.

तिथल्या शिर्के नावाच्या मराठा सरदाराला त्याने आपल्या ताब्यात घेतले. या शिर्केना मलिक तुज्जारने मुसलमान होण्याची अट घातली. शिर्के म्हणाले,

” मी धर्मांतर करण्यास तयार आहे मात्र शेजारच्या खेळणा गडावरील माझा शत्रू शंकरराय मोरे याचे देखील धर्मांतर करावे.”

शिर्केच मत होतं की फक्त मी जर धर्मांतर केले तर मोरे माझी अवहेलना करेल आणि माझी माझ्या बिरादरीत पत कमी होईल आणि प्रजेचं बंड होऊन माझ माझ्या वाडवडिलांपासुन ताब्यात असलेला प्रदेश माझ्या हातातुन जाईल.

म्हणुन माझा प्रतीस्पर्धी शंकरराय याला प्रथम वठणीवर आणा आणि त्याच्या ताब्यातील प्रदेश माझ्या अधिका-यांच्या स्वाधीन करा. त्याचे देखील धर्मांतर झाले तर मला त्रास होणार नाही. अशी विनंती शिर्केनी मलिक उत तज्जार कडे केली.

मलिक तज्जारला ठाऊक होते की खेळणा हा अजिंक्य आहे. तिकडे जाण्याचा रस्ता हा बिकट आहे. पण शिर्क्यांनी खेळण्यापर्यंत पोहचवण्याचे त्याला वचन दिले.

खेळणाचा मोह मलिक तज्जारला आवरला नाही. अख्खी कोकणपट्ट्यावर आपलं वर्चस्व निर्माण होईल सुलतानाची शाबासकी मिळेल म्हणून मलिक तज्जार आपली सेना घेऊन शिर्क्यांच्या पाठोपाठ विशाळगडाच्या दिशेने निघाला.

या सर्व घटना फेरिश्ता या फारसी इतिहासकाराने त्याच्या बुरहाने मसीर या ग्रंथात नोंदवुन ठेवल्या आहेत. तो म्हणतो,

 रस्ता इतका कठीन होता कि, आसमंतातील मराठ्यांशिवाय त्या मार्गावर प्रत्यक्ष सैतानाचीही दैन्यावस्था झाली असती.

शिर्क्यांच्या गोड बोलण्याला मलिक तज्जार भूलला.त्यांनी त्याला सह्याद्रीच्या उंच कड्यावर आणून अडकवले.

एकीकडे घनदाट जंगल तर दुसरी कडे भयानक दरीकपारी. वाटा वाकड्या तिकड्या.

एवढ्या प्रचंड सेनेला धड चालता देखील येत नव्हते. विसाव्याला जागा नव्हती. त्यातच मलिक तज्जारला रक्ताच्या हगवणीचा त्रास सुरू झाला. त्याची सेना त्या जंगलात बेजार झाली होती.

अशातच बेसावध क्षणी शिर्के तिथून सुटले आणि विशाळगडावरच्या शंकरराय मोरेंना जाऊन मिळाले.

दोघांनी मिळून ते हजारोंच बहामनी सैन्य सहज कापून काढलं.

खुद्द मलिक उत तुज्जार या युद्धात मारला गेला.

पुढे अनेक वर्षे विशाळगड अजिंक्य राहिला. पुढे स्वकीयांच्या फितुरीमुळे तो आदिलशाहीच्या ताब्यात गेला. अखेर शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केल्यावर विशाळगडाने मोकळा श्वास घेतला.

शिर्के आणि मोरेंची एकी प्रत्येक मराठा सरदाराने दाखवली असती तर महाराष्ट्रात कधीच परकीय सत्तेला पाऊल देखील टाकता आले नसते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.