लॉकडाऊनच्या काळात एका परिवाराने 6 लाख लोकांना जेवू घालण्यासाठी 2 कोटी रूपये खर्च केले

गेले वर्ष भर झालं जगात कोरोनाचा उच्छाद सुरु आहे. अनेकांनी आपल्या जवळच्या प्रियजनांना या कोरोनाच्या लढाईत गमावलं. संपूर्ण जगाला नवीनच असलेल्या रोगाशी सामना कसा करायचा हे कोणालाच ठाऊक नव्हतं. म्हणूनच या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी गेल्या वर्षापासून देशात कधी कडक तर कधी अंशतः नॉर्मल स्वरूपात लॉकडाऊन सुरू आहे.

कित्येक दिवस झाले सर्वजण घरात कैद आहेत. अनेकांना तर याकाळात आपल्या नोकऱ्या देखील गमवाव्या लागल्या, ज्यांचं हातावर पोट आहे अशांवर तर उपासमारीची वेळ आली. रुग्णलयाचे भरमसाठ खर्च, अशात कित्येकांनी घेतलेले कर्जाचे हफ्ते फेडता न आल्यामुळे आत्महत्येचा मार्ग देखील स्वीकारला आहे.

मात्र सगळीकडेच नकारत्मकता भरली आहे असे नाही. या कोरोना संकटाच्या परिस्थितीतही काही मानवतेचे हातही समोर आलेत.

कोणी जेवण देऊन मदत केली, कोणी रोजगार देऊन, कोणी रूग्णांना ऑक्सिजन, बेड देऊन मदत केली, तर कोणी प्रवासी मजूरांना घरी पोहोचण्यासाठी व्यवस्था केली. असच माणूसकीच आणखी एकदा दर्शन पहायला मिळालं ते, आंध्रप्रदेशच्या चंद्रशेखर गुरु पादुका पीठम और श्री रामायण नवान्निका यज्ञ ट्रस्ट यांच्यारूपानं.

विष्णुभट्टला अंजनेय छायानुलु यांनी 27 वर्षांपूर्वी गरिबांच्या मदतीसाठी आंध्र प्रदेशच्या तेनाली येथे या ट्रस्टची स्थापना केली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत या ट्रस्ट द्वारे त्यांची गोरगरिबांना छोटी मोठी मदत सुरूच आहे. मात्र नव्यानेच आलेल्या कोरोना संकटाने संपूर्ण देशाप्रमाणे तेनाली गाव देखील हादरून गेले. कंत्राटी कामगार, वृद्ध ,अपंग भिकारी, अनाथ मुले यांचा तर आधार  गेला. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.

लॉकडाऊन दरम्यान उद्भवलेली परिस्थिती पाहता विष्णुभट्टला अंजनेय छायानुलु यांनी आपल्या ट्रस्टद्वारे लोकांना मदत करण्याचा विचार केला. सुरुवातीला 50 किलो अन्न तयार करुन शहराच्या झोपडपट्टीत त्याचे वाटप केले.

मात्र, ते यावरच समाधानी नव्हते, कारण हे अन्न प्रत्येकासाठी पुरेसे नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी15 ठिकाणे शोधून काढली, जेथे जवळजवळ 6 हजार लोकांचा या कोरोना साथीच्या आजारामुळे रोजगार सुटला होता आणि आता त्यांची खाण्यापिण्याची पंचायत होती,

त्यांचे सुपुत्र विष्णुभट्ट यज्ञ नारायण अवधानी यांनी एके ठिकाणी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं कि

वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचं पूर्ण कुटूंब या कामात उतरलं.

त्यांच्या ट्रस्टने लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या काही स्थानिक स्वयंपाकी लोकांची ओळख केली आणि त्यांना पगार देऊन कामावर ठेवले. त्यानंतर, जेवण बनवून त्या सर्व 15 भागात वाटायला सुरूवात केली.

जेव्हा सोशल मीडियाद्वारे लोकांना याची माहिती मिळाली, तेव्हा देशभरातून बरेच लोक मदतीसाठी पुढे आले. या सर्वांच्या मदतीने गेल्या 120 दिवसांपासून लोकांमध्ये अन्न वाटण्याचे काम सातत्याने सुरू आहे. या कुटुंबाने लॉकडाऊनवेळी 6 लाख लोकांना खायला देण्यासाठी 120 दिवसांत 2 कोटी रुपये खर्च केलेत.

रोज 10,000 लोकांना जेवण

ट्रस्टची टीम रोज 1000 किलो तांदूळ, 400 किलो भाजी आणि सांबर बनवून जवळपास 8,000ते 10,000 लोकांमध्ये त्याचे वाटप करते. दिवसाला 1 लाख रूपये तर टीम आणि ट्रांसपोर्टवरच खर्च झाले. त्यांचे जेवण देखील उत्कृष्ट दर्जाचे असते. या कामात चित्रपट दिग्दर्शक हरीश शंकर आणि लोकल नेत्यांनी त्यांची मदत केली. या ट्रस्टच्या कामामुळे अनेकांना रोजगार तर अनेकांना दोन वेळचं जेवण मिळालं.

कोणतेही जात धर्म पंथ याचा विचार न करता या कुटुंबाने दिवसातले २०-२० तास राबून अव्याहतपणे हि मदत चालू ठेवली. यापुढे देखील त्यांची मदत सुरूच राहणार आहे. अशा प्रसंगाला तोंड देण्यासाठी एक धर्मशाला उभी करण्याचा त्यांचा विचार आहे. संपूर्ण देशात या कुटूंबाचं कौतुक केलं जात आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.