विश्वेश्वरय्या यांच्या इंजिनियरिंग कारकिर्दीची जडणघडण धुळे शहरापासून झाली.

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. भारताचे आधुनिक विश्वकर्मा. संपूर्ण देशभरात त्यांनी उभारलेली धरणे, बंधारे, बंदरे, पूल आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. ब्रिटिशांनी देखील त्यांच्या कार्याला सर्वोत्तम मानले. स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर त्यांच्या एवढा महान स्थापत्यशास्त्रज्ञ भारतात कोणी झाला नाही

अशा या भारतरत्नच्या कारकिर्दीची सुरवात, जडणघडण मात्र महाराष्ट्रात झाली.

त्यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात चिक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी येथे झाला. त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील मोक्षगुंडम या गावचे.  त्यांच्या वडिलांचे नाव पंडित श्रीनिवासशास्त्री व आईचे व्यंकचम्मा. वडील संस्कृतचे गाढे विद्वान होते.

विश्वेश्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबल्लापूर या खेड्यात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण बंगलोरच्या सेंट्रल कॉलेजामध्ये झाले. १८८० मध्ये ते बी. ए. परीक्षा विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाले. म्हैसूर सरकारने पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली.

इंजिनियरिंगच शिक्षण घेण्यासाठी विश्वेश्वरय्या पुण्याला आले.

१८८३ मध्ये ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ते मुंबई प्रांतात पहिले आले. स्थापत्यशास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचा लौकिक सर्वदूर पसरला. त्याच वर्षी तत्कालीन ब्रिटिश मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांची साहाय्यक अभियंता पदावर नियुक्ती झाली.

विश्वेश्वरय्या यांची पहिलीच नेमणूक खान्देशातील धुळे या छोट्या शहरात झाली.

ग्रामीण भागात काम करायचं झालं तर स्थानिक भाषा आलीच पाहिजे याची जाणीव विश्वेश्वरय्या यांना होती. म्हणूनच त्यांनी पुण्यात महर्षी कर्वे यांच्या कडून मराठीचे धडे गिरवले आणि मग धुळ्याला दाखल झाले.

ते पावसाळ्याचे दिवस होते.

त्यांचे सिनियर इंजिनियर होते एचजी पालिसार.ते कडक शिस्तीचे होते. धुळे जिल्ह्यातील दातारी या खेड्यातील  पांजरा या नदीवर सायफन कालवा बांधण्याचे आव्हानात्मक काम विश्वेश्वरय्या यांच्यावर सोपविण्यात आले होते.

भर पावसात हे शिवधनुष्य विश्वेश्वरय्या यांनी उचललं. दिलेल्या मुदतीत पूर्ण देखील केलं.

आज १३० वर्षे झाले हा कालवा धुळे मध्ये कार्यरत आहे.

पुढे काळ गाजवलेल्या या महान अभियंत्यांचा हा पहिला पराक्रम.

तिथल्या एका छोट्या जुन्या सरकारी इमारतीमध्ये बसून त्यांनी काम केलं. डेडरगाव तलाव ते धुळे शहर पाइपलाइन बांधून शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकालात लावला.

पांझरा नदीवर त्यांनी १८८ फड बंधारे बांधले. आजही जगभरात या फड सिंचन योजनेचा अभ्यास केला जातो. नदीच्या पुराची भीती कायमची कमी झाली.

अवघ्या सोळा महिन्याच्या कार्यकाळात धुळे शहराच्या पुढच्या शेकडो वर्षांचे प्रश्न सोडवून टाकले.

पालीसार या साहेबांनी त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये  उत्कृष्ट असा शेरा देऊन विश्वेश्वरय्या यांची खूप प्रशंसा ही केली. त्यांनीच विश्वेश्वरय्या यांना खात्याच्या विविध परीक्षांना बसण्यासाठी प्रवृत्त केले. विश्वेश्वरय्यासुद्धा अशा खात्यांच्या परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. गंमत म्हणजे त्यांनी मराठी या विषयामध्ये खूपच गुण मिळवले.

धुळे येथे केलेल्या उत्कृष्ट कामामुळे विश्वेश्वरय्या यांना प्रमोशन मिळाले व पुण्याला बदली झाली.

पुण्याला त्यांच्याकडे रस्ते आणि इमारत बांधकाम विभागाची सूत्रे सोपविण्यात आले होते. इथे मुळा नदीवर असलेल्या खडकवासला धरणावर त्यांनी ७ ते ८ फूट अधिक पाणी साठवू शकतील असे दरवाजे बनवण्याचे ठरवले आणि स्वतःच्या अक्कल हुशारीने त्यांनी स्वयंचलित दरवाज्यांचे डिझाईन तयार केले.

खडकवासला धरणाचे ऑटोमॅटिक दरवाजे हा जगभरात क्रांतिकारी शोध ठरला. विश्वेश्वरय्या यांना त्याचे पेटंट प्रदान केले गेले. त्यांनी पुण्यात असताना टिळकांच्या सल्ल्याने केसरीमध्ये एक सदर लिहिण्यास सुरवात केली होती.

या सदरातून त्यांनी ब्लॉक सिस्टीमच्या जलसिंचनाचा पर्याय मांडला. आजही महाराष्ट्रातील अनेक शेतकरी याचा वापर करतात.

दुष्काळी धुळे असो किंवा पुराने प्रभावित झालेले पुणे असो विश्वेश्वरय्या यांचे महाराष्ट्रावर अनेक उपकार आहेत. कोल्हापूरच्या रंकाळा तलावावरील दगडी बांध सुद्धा त्यांचीच कल्पना आहे.

कावेरी नदीवरील कृष्णसागर धरण, दूर अरब देशातील एडन बंदरातील जॅकवेल पुढच्या आयुष्यात विश्वेश्वरय्या यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात अनेक विक्रम केले, नवनवे मानदंड उभे केले. ब्रिटिश सरकारने दिलेलं नाईटहुड पासून भारत सरकारच्या भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाची उपाधी मिळाली.

जगभरात डंका वाजलेल्या या इंजिनियरचा आपली जडणघडण झालेल्या महाराष्ट्राशी बंध अखेरपर्यंत कायम राहिला. या मातीचे उपकार ते कधीही विसरले नाहीत.

१३० वर्षांपूर्वी त्यांनी धुळे शहरात केलेल्या कार्याची आठवण म्हणून धुळेकरांनी एक छोटं विश्वेश्वरय्या स्मृती संग्रहालय उभारलं आहे. यामध्ये विश्वेश्वरय्या यांचा जीवनप्रवास आणि काही खास फोटो पहायला मिळतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.