विट्याच्या खडकाळ माळावर साहित्याचा मळा फुलवला

एखादा माणूस अगदी व्रतस्थ असतो, आयुष्यभर तो आपल्या उद्दिष्टापासून तो तसूभर देखील ढळत नाही. अशी माणसं क्वचित सापडतात. ती एकतर इतिहासात असतात किंवा आपल्या पासून खूप लांब असतात.  अशी माणसं आपल्या भोवती जरी असली तरी कधी कधी आपल्याला दिसत नाहीत.

असाच सांगली जिल्ह्याच्या विटा नगरीत एकदा साहित्य संमेलन पाहायचा योग आला. संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे होते.

साहित्य संमेलन आणि तेही विट्यात? असा पहिला प्रश्न मनाला पडला.

आणि मग भेट झाली हि जादू  करणाऱ्या किमयागाराची म्हणजेच रघुराज मेटकरी यांची!

रघुराज मेटकरी हे जातीने धनगर! जात सांगायचा उद्देश एवढाच कि त्यांच्या खडतर शिक्षणाच्या काळात ‘त्यांचे शिक्षण हे जरा जातीपेक्षा जास्तच होतंय’ असं काही लोकांना वाटायचं. शिक्षणाचा घरात काही संबंध नव्हताच पण त्यांच्या आजीला शेतातली कामे झाल्यावर मंदिरात कीर्तन ऐकण्याचा नाद होता.

कीर्तन ऐकताना एका बाईने त्यांना मंदिरात ‘लांब जाऊन बसण्यास ‘ सांगितले. तो अपमान सहन न होऊन आजी एक दिवस आपल्याकडचे सगळे पैसे घालून ‘रामायणाचा’ खंडच घेऊन घरी आली. आणि दुसरीत शिकणाऱ्या रघुराज ला म्हणाली

मला आता हे वाचून दाखव.

रघुराज आजीला रामायण घरीच वाचून दाखवू लागला. पुढे महाभारत, पांडवप्रताप, शिवलीलामृत वाचता वाचता तो रघुराज ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी झाला.

वाचनाचा छंद त्यांनी उच्च कोटीला नेला. वयाच्या १० व्या वर्षापासूनच ते कविता करायला लागले.  काहीतरी मोठं आपल्या हातून घडणार आहे असं त्यांना वाटू लागलं.

आणि ते घडलंच….

१९७६ साली त्यांनी त्यांच्या काही मित्रांसमवेत विटा शहरामध्ये ‘पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन’ घडवून आणायचा चंगच बांधला. साहित्य संमेलन भरवण्याचे धाडस पुण्या-मुंबईच्या लोकांनी देखील न करण्याचे ते दिवस होते.

विटा शहरातले काही साहित्यप्रेमी लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले त्यातच एक महत्वाचं नाव म्हणजे पतंगराव कदम यांचं.

ग्रामीण साहित्य संमेलनाचं हे रोपटं लावण्यात त्यांचाही हातभार होता.

साहित्य संमेलन भरवतानाची झाडलोटीची कामे ते संमेलनाध्यक्षांना अर्ज विनंत्या पर्यंत सगळं मेटकरी करायचे, हे साहित्य संमेलन म्हणजे ‘सबकुछ मेटकरी’ अशा स्वरूपाचं असायचं.

पहिल्याच वर्षी धो. म. मोहिते संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले, त्यानंतर कवी सुधांशु, बाबा कदम, वसंत सबनीस, रणजित देसाई यासारखे मातब्बर संमेलनाध्यक्ष साहित्य सम्मेलनाला लाभले.

मोकळ्या पटांगणात भरलेले साहित्य संमेलन आणि गांधी टोप्या घातलेला समोर जमलेला हजारोंचा जमाव बघून संमेलनाध्यक्षाना ही राजकीय सभा तर नाही ना असा प्रश्न पडायचा. ते गडबडून जायचे. ग्रामीण साहित्य संमेलन म्हणून दुर्लक्ष करण्याचाही काही साहित्यिकांचा प्रयत्न असायचा पण मेटकरी त्यांना जिद्दीने घेऊनच येत.

‘एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंथ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही’

असं पु. ल. देशपांडे एके ठिकाणी म्हणतात.

१९८३ सालच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पुलं स्वतःच  विट्याला आले आणि इथली साहित्य चळवळ पाहून भारावून गेले. पुलं म्हणाले

“खानापूर तालुक्यातील लोक जिद्दी आहेत, इथल्या लोकांनी दगड धोंडे फोडून उसाचे, द्राक्षाचे मळे फुलवले, त्याच ठिकाणी आमच्या रघुराज मेटकरींनी हजारो मनांची शेती करून साहित्याचा मळा फुलवला आहे”.

आणि त्यानंतर मात्र पुलं आणि रघुराज मेटकरींची वेव्हलेन्थ जी जमली ती कायमचीच. हा सगळा घटनाक्रम सुनीताबाई देशपांडे यांनी आपल्या आहे मनोहर तरी या आत्मचरित्रात लिहून ठेवला आहे.

पुलं आणि सुनीताबाईंनी मेटकरींना वाचनालय सुरु करण्याचा सल्ला दिला.

त्यासाठी १००० पुस्तके दिली आणि सोबत पैसेही दिले. रघुराज मेटकरींनी विट्याच्या विठ्ठल मंदिरात ‘मुक्तांगण’ या नावाने वाचनालय सुरु केले. पुढच्या काही वर्षात शेकडो लोक या वाचनालयाशी जोडले गेले.

पुलं आणि सुनीताबाई जेव्हा त्यानंतर विट्यात आले. तेव्हा रघुराज मेटकरींच्या साहित्यावरील निस्सीम भक्तीने खुश झाले. त्यांनी मेटकरींना त्यांच्या घरी बोलावले.

२६ जानेवारी १९९० च्या रात्री ९ वाजता रघुराज मेटकरी पुलंच्या घरी पोचले सोबत होते त्यांच्यावर अतोनात प्रेम करणारे त्यांचे मित्र पतंगराव कदम. मुक्तांगण वाचनालयाला स्वतःची जागा हवी होती, त्याचा शोध चालू होता. पैशाचीही अडचण होतीच. पण रघुराज मेटकरी जिद्दी होते त्यांनी चिकाटी सोडली नव्हती. त्यांचे साहित्यावरील प्रेम सच्चे होते.

त्या रात्री सुनीताबाईंनी मेटकरींच्या हाती एक लाख रुपयाचा चेक ठेवला, मुक्तांगण साठी!

त्यावर पुलं म्हणाले,

आता कदम साहेब तुम्ही सांगा तुम्ही किती देताय?

त्यावर एका क्षणात पतंगराव म्हणाले ‘चला माझेही एक लाख दिले’.

त्यानंतर मुक्तांगण डौलानं उभं राहिलं. आज विट्यातल्या मुक्तांगण वाचनालयात ३०००० हुन अधिक पुस्तके आहेत. हजारो लोक ती पुस्तके वाचतात.

रघुराज मेटकरींनी त्यानंतर बरीच साहित्य निर्मिती केली. माणदेशी बंड, गॅलिलिओचे चरित्र हि त्यांची काही गाजलेली पुस्तके.

विट्यातील  ‘मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाने’ आता चाळीशी ओलांडली आहे.  

दरवर्षी मराठीतले नामवंत कवी, लेखक या संमेलनाला हजेरी लावतात, त्याचवेळी ग्रामीण लेखक, कवींच्या साठी हे हक्काचे व्यासपीठ राहिले आहे. आसपासच्या जिल्ह्यातील शेकडो नवसाहीत्यिक या संमेलनानाला हजेरी लावतात.

अखंडपणे १९७६ पासून हे संमेलन सुरु आहे. आजही तोच विशीतला उत्साह, तीच तळमळ, तेच प्रेम रघुराज मेटकरींच्या या साहित्य संमेलनात दिसते.

रघूराजजींना फक्त उणीव भासते ती  ‘हे रघूराजचं म्हणजे माझंच हाय रे’ म्हणून हक्काने संमेलनात येणाऱ्या पतंगरावांची हे रघूराजजींच्या डोळ्यात पाहताना सुटत नाही.

इंग्रजीत ‘punching above the weight’ असा एक वाक्प्रचार आहे. तसंच काहीतरी रघुराज मेटकरी आयुष्यभर करत राहिले आणि तेही यशस्वीपणे!

एक साहित्य संमेलन, एक वाचनालय, एक शाळा त्यांनी विट्याला दिली. आणि आजही प्रयत्न चालूच आहेत नवनिर्मितीचे! त्यांच्या जिद्दीला सलाम!

  • रणजित यादव

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. Nitant Tambade says

    रणजित यादव,
    खूप सुंदर व्यक्तिचित्रण रेखाटलंय,अगदी हुबेहूब.

Leave A Reply

Your email address will not be published.