नेफा सीमेवर १९६२ मध्ये लष्करातील सैनिकांसाठी तमाशा सादर करणाऱ्या विठाबाई नारायणगावकर !

विठ्ठलाने मला लोकांच्या मनोरंजनाबरोबर प्रबोधनासाठी पाठविले आहे. मी माझ्या कलेचा उपयोग लोकशिक्षणासाठी करेन ही खुणगाठ मनी बाळगून महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत, तमाशा सम्राज्ञी, तमाशा परंपरेतील एक धाडसी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व विठाबाई नारायणगावकर भाऊमांग यांनी महाराष्ट्रात मराठवाडा, खान्देश, विदर्भ, कोकण पट्ट्यातील गावागावात आपल्या नृत्याचा ठसा उमटवला.

 विठाबाईंचा आज स्मृतिदिन आजच्याच दिवशी जाणून घेऊया विठाबाईंच्या जीवनातील अनेक सुवर्णपाने…

अलीकडच्या काही दशकात भारतीय जवानांसाठी सीमेवर अनेक कार्यक्रम होत असतात. पण, १९६२ मध्ये घरापासून दूर राहून देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांना तमाशा कलेच्या माध्यमातून मानवंदना देण्याचे धाडस  विठाबाईंनी केले.

पठ्ठेबापूरावांच्या तमाशातून प्रेरणा घेतलेल्या शाहीर भाऊ-बापूमांग नारायणगावकर आणि शांताबाई या दांपत्यापोटी विठाबाईंचा जन्म झाला. विठ्ठलाप्रती असलेली भक्ती म्हणून मुलीचे विठाबाई ठेवण्यात आले. विठाबाई तशी दिसायला गोंडस, चुणचुणीत, गोड गळ्याची त्यामुळे रूप, स्वरूप आणि सौंदर्य या तिन्ही गोष्टी तिला जन्मजात मिळाल्या.

कला आत्मसात करायला अनेकांना मेहनत करावी लागते. पण, लहानपणापासूनच नृत्य आणि गायनाचे बाळकडू मिळाले.

लहानपणापासूनच तमाशातल्या लावण्या, गवळणी त्यांच्या कानावर आपसूक पडत होत्या. त्यांतच त्यांनी  कलेकडचा ओढा बघूनच वडिलांनी शिक्षणाची सक्ती केली नाही. आणि वयाच्या चौथ्या–पाचव्या वर्षीच विठाबाईंची शाळेपासून दुरावल्या आणि वडिलांच्या तमाशाबरोबर गावोगाव तमाशासाठी भटकंती करू लागल्या.

तमाशाच्या फडात जन्माला आलेली मुलगी चौथ्या वर्षीच भाऊ बापूंच्या तमाशा बोर्डासोबत गावोगावी फिरू लागली. गायकीची ढब संवादाची फेक आणि नृत्याची अदब आत्मसात करू लागली. त्यांची ही मेहनत पाहूनच मामा वरेरकरांनी लक्षा आणि विठाबाईंना आपल्या कलापथकात पाठवून द्यायची विनंती त्यांनी भाऊंना केली. नंतर विठाबाई मामा वरेरकरांच्या कलापथकातून काम करू लागल्या.

गाण्याची लय कशी असावी, आवाजाची सुरावट कशी असावी, चेहऱ्यावरचे हाववभाव त्यांच्या संगतीला असलेला पदन्यास कसा असावा हे विठाबाईने त्या काळात आत्मसात केले.

आता जसे कलाकारांना लग्जरिअस आयुष्य जगता येते.पण, त्या काळात गावोगावी तमाशा सादर करणाऱ्या विठाबाईना कोणताही आर्थिक मोबदला म्हणजे बिदागी मिळत नसे. काहीवेळा उपासमार तर काहीवेळा मिळेल ते शिळे अन्न खाऊन त्या रंगमचावर उतरायच्या. पोटात अन्न नसायचे पण याची लवही कुठे त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची नाही.

सन १९५७ मध्ये भाऊ नारायणगावकर यांच्या निधनानंतर  तमाशाच्या बोर्डाची पूर्णपणे जबाबदारी विठाबाईंवर येऊन पडली. याची जाण ठेऊन न डगमगता नव्या जोमाने भाऊ-बापूमांग नारायणगावकर या नावाने तमाशा उभा केला.

पुण्यातील मारूती सावंत यांच्याबरोबर विवाहबद्ध झाल्यानंतर तमाशाचा गाडा चालवता चालवता विठाबाईंनी संसाराचे आव्हानही लीलया पेलले. विठाबाईला मंगला, विद्या, मालती, संध्या, भारती अशा पाच मुली तर विजय, कैलास आणि राजेश ही तीन मुले झाली.

अस म्हणतात की बाळंतपण हे बाईचा दुसरा जन्मच असतो. त्याच उक्तीप्रमाणे तमाशाच्या फडावर काम करताना त्यांनी बाळंतपणाच्या जीवघेण्या यातनाही सहन करून रसिकांची सेवा केली.

विठाबाई येणाऱ्या संकटामुळे एकत्र बांधलेल्या चाळ प्रमाणे कधी एकजूट होऊन लढल्या तर कधी चाळ तुटून घुंगरू विखरावे अशा विखुरल्या.

एकावेळी जेव्हा त्यांच्या पोटात बाळ होतं तेव्हाही त्या स्टेजवर नाचत होत्या. असंख्य वेदना होत होत्या आणि तरीही त्या तग धरून होत्या. पण जशी लावणी संपली त्या तडक आत गेल्या त्यांनी साडी फेडली आणि थोड्या विसावल्या.

तोच त्यांना प्रसूतीकळा सुरु झाल्या. आणि अवघ्या काही मिनिटात त्यांनी बाळाला जन्म दिला. अशा अवस्थेत लोकांनी विठाबाईनाच बोलवा अशी मागणी केल्याने

विठाबाईनी दगडाने ठेचून नाळ तोडली आणि पुन्हा त्या सज्ज होऊन स्टेजवर जाऊन नाचल्या त्या ‘पोटासाठी नाचते मी परवा कुणाची’ या लावणीवर.

विठाबाईच्या मागचा वनवास अजून संपला नव्हता. त्यांचा कात्रजच्या घाटात अपघात झाला. तर कधी सावळा बापूबरोबर सांसारिक कलह झाला. पण त्यांनी  धीर सोडला नाही.

ती पोटासाठी नाचली

पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची,, नेसली पितांबर जरी या त्यांच्या लोकप्रिय लावण्या आहेत. शिवाय रक्तात न्हाली कुऱ्हाड,रंगल्या रात्री अशा ,छोटा जवान ,मुंबईची केळेवाली ,मराठा सरदार, सापडला हरी नायकिणीच्या घरी ,चंद्रमोळ,शिवप्रताप आणि रायगडची राणी ही त्यांची गाजलेली वगनाट्ये आहेत.

या लावण्या सादर करताना त्या खरच स्वत:च्या आणि इतरांच्या पोटासाठी नाचल्या. कधी घर तर कधी फड त्यांनी उभा केला.

‘श्रीमंती ही केवळ बोर्डावरची’ ही मालमत्ता घेऊन वार्धक्यात विठाबाई जीवन व्यतीत करू लागल्या. विठाबाई १९६८ साली पुणे येथे भरलेल्या अखिल भारतीय तमाशा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी १९९० रोजी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कारही दिला.

दलित नाट्यासंमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार, जागतिक महिला दिन पुरस्कार, माननीय शदर पवार, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे भारत सरकारचा सन्मानाचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. १९९० मध्ये त्यांना कलेतील राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.

अशा या हरहुन्नरी जिद्दी आणि आयुष्याचे धडे देणाऱ्या विठाबाईचे पुण्यातील रुग्णालयात २००२ रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

  • पूजा कदम

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.