“आगरकर-भांडारकर-रानडे” यांनी वि.रा. शिदेंना स्कॉलरशिप नाकारली होती…

आपली पोरं शिकायला कितीही शिकतील, पण त्यात मोठं दिव्य असतं ते पैशाचं… ‘उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळत नाही’ हे आजच्या पोरांचं रडगाणं असतं. जिथं तिथं स्कॉलरशिप मिळवायला जावं तिथून नकार येतात.

पण आजपासून १०० वर्षांपूर्वीही अशीच परिस्थिती होती.

मोठमोठ्या लोकांनी स्कॉलरशिपसाठी असाच संघर्ष केला होता. त्यात आंबेडकरांइतकंच मोठं उदाहरण म्हणजे महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचं!

महर्षि विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे इंग्लंडमध्ये शिकायला गेलेल्या अगदी सुरुवातीच्या बहुजन विद्यार्थ्यांपैकी एक होते.

मराठ्यांच्या पोरांनी गावाकडून येऊन पुण्यात आणि परदेशात शिक्षण घेणे या ट्रेण्डची पायाभरणी त्यांनीच केली.

जाती-निर्मूलनासाठी त्यांनी मोठा लढा दिला. आपले आयुष्य त्यांनी अस्पृश्यांच्या सेवेमध्ये व्यतीत केले.

पुण्यात राहून याच प्रकारचा क्रांतिकारी विचार निर्भीडपणे मानणारे गृहस्थ म्हणजे आगरकर. त्यांच्या कामाकडून प्रेरणा घेऊनच वि. रा. शिंदे यांनी सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली.

पण सुरुवातीच्या काळात एकदा याच आगरकरांनी महर्षि वि. रा. शिंदे यांना स्कॉलरशिप द्यायला नकार दिला होता.

या प्रसंगाचे वर्णन स्वतः महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या लेखनात केले आहे.

इ.स. १८९३ ची ही गोष्ट. ते नुकतेच पुण्यात कॉलेजला ऍडमिशन घ्यायला आले होते.  इ.स. १८९८ अखेर पर्यंत म्हणजे सहा वर्षे महर्षि वि. रा. शिंदे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकले.

महर्षि वि. रा. शिंदे यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि निराधार होती. यावर मत करून ते पुण्यात आले. पण या शहरात त्यांचे कोणीच ओळखीचे नव्हते.

“कोणाची ओळख ना पाळख असा आलेला. तशांत फर्ग्युसन कॉलेजमध्यें कसा प्रवेश मिळाला ह्याचें मला अद्यापि आश्चर्य वाटतें”

असे ते स्वतःच म्हणाले होते.

त्यांनी शहरात राहणे-खाणे आणि कॉलेजची फी यासाठी शोधाशोध सुरु केली. पुण्याला गरीब मराठ्यांना कॉलेजांत मदत करणारी एक संस्था त्या काळी होती. डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन असे त्या संस्थेचे नाव होते. तिचे संस्थापक व सेक्रेटरी होते तत्कालीन प्रसिद्ध मराठा पुढारी गंगाराम भाऊ म्हस्के.

त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना स्कॉलरशिप मिळाली. मात्र ती फक्त दरमहा दहा रुपयांचीच!

‘एवढीच रक्कम देणें शक्य आहे’, असें त्यांनी महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांना सांगितले. कॉलेजांत जाण्याची कशीबशी सोय होईल इतपतच ही रक्कम होती.

पण ह्यापलीकडे राहण्याची किंवा अभ्यासाची दुसरी कसलीही सोय त्यातून होईना. पण यामुळे कॉलेजात त्यांची हजेरी कशी तरी एकदा लागली. 

फर्ग्युसन कॉलेज हे आताच्या ठिकाणी नव्हते. त्या वेळी नदीच्या पलीकडे मुख्य पुणे शहरातील शनिवार पेठेत गद्रे नावाच्या गृहस्थांचा मोठा जुन्या वाडा होता. त्यातच हे कॉलेज भरत असे.

फर्ग्युसन कॉलेजचे तेव्हाचे प्रिन्सिपॉल वामन शिवराम आपटे हे संस्कृत कोशकार म्हणून प्रसिद्ध होते. ते वारल्यानंतर नुकतीच त्यांच्या जागी तेव्हाचे प्रसिद्ध समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची नियुक्ती झाली होती. 

आता विठ्ठल रामजी शिंदे यांना स्कॉलरशिप मिळण्यासाठी गोपाळ गणेश आगरकर यांना भेटणे भाग होते. त्यांना मिळायचे फक्त १० रुपये. त्यापैकी पाच रुपये कॉलेजची फी होती. उरलेल्या पाच रुपयांत त्यांचे जेवणे-राहणे अशक्य होते.

आगरकर हे त्याकाळी मुख्य शहरात राहत नसत. आत्ता फर्ग्युसन कॉलेज जिथे आहे तिथे आधी फक्त जंगल आणि टेकड्या होत्या. तिथे अजिबात वस्ती नव्हती. त्या जागेवर गोपाळ गणेश आगरकर एक साधी झोपडी बांधून राहात असत. त्या झोपडीशिवाय आजूबाजूला कुठलीच वस्ती नव्हती.

कॉलेजची फी माफ करण्याबद्दल विठ्ठल रामजी शिंदे यांनी एक अर्ज बनवला. तो घेऊन ते प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर यांना भेटायला गेले.

त्यांची भेट सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झाली.  आगरकरांची मुद्रा बरीच त्रासलेली असल्याचे त्यांनी बघितले. पण तरीही विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यांना आपला अर्ज दिला.

त्यांचा अर्ज आगरकरांनी पाहिला. विठ्ठल रामजी शिंदे यांना आधीच ‘डेक्कन मराठा असोसिएशनची स्कॉलरशिप मिळत आहे’ हे त्यांना समजले.

ते ऐकल्याबरोबर आगरकरांनी ‘फी माफ व्हावयाची नाहीं’ असे रोखठोक निर्भीडपणे सांगून टाकले.

विठ्ठल रामजी शिंदे यांना या उत्तराची अपेक्षा नव्हती. याचे वर्णन करताना ‘नकाराचा बाँब मजवर आदळल्या’ची उपमा विठ्ठल रामजी शिंदे यांनी दिली आहे. त्यांनी पुण्यात येण्यापूर्वी आगरकरांचे लेखन वाचले होते. त्यामुळे ते त्यांना मदत करतील अशी त्यांची अपेक्षा होती.

त्यामुळेच ‘आगरकरांविषयीं माझा ग्रह अनुकूल झाला नाहीं’ अशी तक्रार ते करतात.

अर्थात ‘उगाच नादाला लावण्यापेक्षां त्यांचें हें तडकाफडकी उत्तर एका रीतीनें योग्यच होतें’ हे त्यांना नंतर समजून चुकले.

खरोखर पाहता यात ‘आगरकरांचा, इतर प्रोफेसरांचा किंवा कॉलेजच्या इतर परिस्थितीचा काहीच दोष नव्हता’ हे त्यांनी नंतरच्या काळात मान्य केले. आपल्या या निराशेला ‘माझाच अजाणपणा व अननुभवीपणा हेच कारण होय!’ असा खुलासा त्यांनी आपल्या लेखनात केला आहे. 

पुढच्या काळात त्यांनी आगरकरांपासून प्रेरणा घेत त्यांचेच समाजसुधारणेचे काम पुढे चालू ठेवले.

असाच प्रसंग त्यांच्या आयुष्यात पुन्हा आला.

तो इंग्लंडला जाण्यापूर्वी. उच्च शिक्षणासाठी आणि प्रार्थना समाजाचे कार्य वाढवण्यासाठी त्यांनी इंग्लंडला जाण्याचे नक्की केले होते. यासाठी त्यांना एक स्कॉलरशिप मिळणार होती.

अमेरिकेमधील युनिटेरियन पंथाने या स्कॉलरशिपची तरतूद केली होती. तुलनात्मक धर्मशिक्षणासाठी ठेवलेल्या शिष्यवृत्तीकरिता एकाच विद्यार्थ्याची निवड होई. सुरुवातीला विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाला भांडारकरांनी पाठिंबा दिला.

“डॉ. भांडारकरांनी मनात आणल्यावर प्रांतिक समाजाची, कलकत्त्याच्या समितीची, नंतर ब्रिटिश कमिटीची व अखेरीस मँचेस्टर कॉलेजची पसंती ह्या ओघाओघानेच मिळाल्या” असे विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिले आहे. पण यात अचानक एक अडचण आली.

न्यायमूर्ती रानडे यांनी मध्येच दुसऱ्याच एका विद्यार्थ्यांचे नाव यासाठी सुचवले. तो विद्यार्थी होता श्रीधर विष्णू परांजपे. ह्या तरुणाची रानडेंच्या मनावर छाप पडली होती.

या ब्राह्मण विद्यार्थ्याने अचानक या स्कॉलरशीपसाठी होणाऱ्या निवडीची सूत्रेच बदलून टाकली. ग. त्र्यं. माडखोलकर यांनी देखील याचा उल्लेख आपल्या लेखनात केला आहे.

“परांजपे यांच्या विविध गुणांचा इतका परिणाम डॉ. भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांच्यावर झाला की शिष्यवृत्तीकरिता त्या दोघांनीही १९०० च्या डिसेंबरमध्ये श्रीधर विष्णू परांजपे यांची शिफारस केली.”

यावेळी आपले नाव नक्की होईल असा विश्वास एकीकडे विठ्ठल रामजी शिंदे बाळगून होते. भंडारकरांनाही याची कल्पना होती. पण तरीही “एकेश्वरवादाचे प्रचारक म्हणून परांजपे उत्तम काम करतील, असा विश्वास प्रार्थनासमाजाच्या त्या दोघाही धुरिणांनी, आपल्या या शिफारशीच्या पत्रात व्यक्त केलेला होता” असे खानोलकरांनी लिहिले आहे.

दोघांनीही आपली पसंती परांजपे यांना दिल्याने आता पुण्यातून शिंदे यांच्या ऐवजी ती शिष्यवृत्ती परांजपेच नेणार अशी शक्यता निर्माण झाली. विठ्ठल रामजी शिंदे यांना भंडारकरांचीच आशा होती. पण त्यांनीही आपली पसंती परांजपे यांना दिल्याने चक्रेच फिरली.

पण तेव्हाच अमेरिकेच्या युनिटेरियन पंथाचे प्रमुख आणि प्रसिद्ध प्रचारक रेव्ह. जे. टी. संडरलँड यांचा संदेश आला. यांचे भाषण एकेकाळी यांच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी ऐकले होते. त्यांचा शिंदे यांच्यावर लोभ होता.

ही स्कॉलरशिप विठ्ठल रामजी शिंदे यांनाच मिळावी असा निरोप थेट अमेरिकेवरून आला!

सर्वांचाच नाईलाज झाला आणि शेवटी ही स्कॉलरशिप विठ्ठल रामजी शिंदे यांना मिळाली.

“परदेशात जाऊन तौलनिक धर्मशास्त्राचे अध्ययन करण्याचा श्रीधररावांचा योग हुकला” अशी हळहळ ग. त्र्यं. माडखोलकर यांनी आपल्या लेखनात व्यक्त केली आहे.

शिंद्यांनीही मेरिटपेक्षा आपली निवड योग्य होती हे सिद्ध करून दाखवले.

ब्रिटिश अ‍ॅण्ड फॉरिन असोसिएशनने ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात त्यांची धर्मशिक्षण विषयासाठी निवड केली. १९०१ ते १९०३ ही दोन वर्षे त्यांनी मँचेस्टर कॉलेजात तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा व बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास, समाजशास्त्र या सगळ्या विषयांचा एकत्रित अभ्यास केला.

विवेकानंदानंतर १९०३ च्या सप्टेंबरमध्ये नेदरलँडमध्ये  अ‍ॅमस्टरडॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय धर्मपरिषद गाजवणारे ते एकमेव भारतीय व्यक्तिमत्त्व होते.

आणि त्यांना डावलून ज्यांचे नाव चर्चेत आले ते श्रीधर विष्णू परांजपे! त्यांनी तीन वर्षांच्या आतच श्रीरामदासानुदास नाव धारण केले. १८ मे १९०३ रोजी त्यांनी वर्धा शहराजवळ एका टेकडीवर हनुमानगडाची स्थापना केली. एक ओटा बांधून त्यांनी त्यावर मारूती देवाची स्थापना केली व अभिनव ‘श्रीरामदास संप्रदायाचा’ प्रारंभ केला.

ज्या विषयासाठी आणि प्रार्थना समाजासाठी ही स्कॉलरशिप होती त्याच्याशी हे विसंगत होते.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.