काश्मीर फाईल्स नंतर “दिल्ली फाईल्स” येतोय : इंदिरा गांधींच्या हत्येनंतरचा इतिहास समोर येणार

गेले कित्येक दिवस झाले ‘द काश्मीर फाइल्स’ काही केल्या चर्चेतून बाहेर होण्याचं नावाचं घेत नाहीये. रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने ते ट्रेंडिंगवर आहेतच, अशी जब्राट सोशल ऑडियन्स या मुद्याला मिळालीये. ‘द काश्मीर फाइल्स’ या छोट्या बजेटच्या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई आणि तसेच रेकॉर्डब्रेक वाद मिळवलेत. मात्र हे सर्व मार्केटमध्ये आणलं ते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी.  

विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांची वेदनादायी कहाणी रुपेरी पडद्यावर आणून बरीच वाहवा मिळवली. आता या बॉम्बनंतर अग्निहोत्री यांनी आपल्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे.

‘दिल्ली फाईल्स’

विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटरवरून आज १५ एप्रिलला ही घोषणा केली आहे.

 

अशा स्पेशल अंदाजात त्यांनी काश्मीर फाईल्सच्या यशासाठी प्रेक्षकांना धन्यवाद दिलं आहे आणि त्यांच्यासाठी अजून मेहनतीने काम करत #TheDelhiFiles च्या आगमनाची माहिती दिलीये.

यावरून खूप तर्कवितर्क चालू आहे. कशी असणार फिल्म आणि कोणत्या इन्सिडन्सवर आधारित असेल, अशा चर्चा रंगल्यायेत. मात्र जेव्हा दिल्ली फाईल्स असं नाव ऐकण्यात येतं तेव्हा बहुतेक लोकांच्या डोळ्यासमोर एकच इन्सिडन्स येतो. तो म्हणजे…

१९८४ चे शीख विरोधी दंगे!

ही अशी घटना होती ज्याने अक्ख्या देशाला हादरवून टाकलं होतं. केवळ एक कृती आणि एक दिवस या घटनेसाठी कारणीभूत ठरली होती. ती म्हणजे, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी केलेली हत्या. 

हे खूप वरवर आणि सढळपणे सांगितल्या जातं, म्हणून तसंच सगळ्यांनी घेतलंय. मात्र याची पार्श्वभूमी खूप मोठी आहे. 

घटना सुरु होते ७० च्या दशकात. 

या दशकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. तसच १९७२ च्या पंजाब राज्य निवडणुकांमध्ये काँग्रेसचा विजय झाला आणि अकाली दलाचा पराभव झाला. १९७३ साली अकाली दलाने पंजाबला अधिक स्वायत्ततेची मागणी करण्यासाठी आनंदपूर साहिबचा प्रस्ताव मांडला. सर्वसाधारणपणे सत्ता केंद्रातून राज्य सरकारांकडे वळवावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेस सरकारने हा प्रस्ताव फुटीरतावादी दस्तऐवज मानला आणि तो फेटाळला. 

या काळात स्वायत्त सरकारच्या प्रचारासाठी हजारो शीखांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. त्यावेळी तुरळक हिंसाचार झाला होता. मात्र त्याच्या पार्श्वभूमीवर एका सशस्त्र शीख फुटीरतावादी गटाला भारत सरकारने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. कारण त्यांना शीखांसाठी मातृभूमी म्हणून खलिस्तानचा स्वतंत्र देश घोषित करायचा होता. त्यामुळेच त्यांना…

‘खलिस्तानी’ असं त्यांना संबोधण्यात येत होतं.

१९८० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतापासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात हा गट होता. म्हणून सशस्त्र शीख फुटीरतावादी खलिस्तान चळवळीमुळे हिंसाचार चालूच राहिला. जुलै १९८२ मध्ये अकाली दल या शीख राजकीय पक्षाचे अध्यक्ष हरचंद सिंह लोंगोवाल यांनी अटक टाळण्यासाठी जरनैल सिंह भिंद्रनवाले यांना सुवर्णमंदिर परिसरात राहण्याचे निमंत्रण दिलं होतं. मात्र नंतर भिंद्रनवाले यांनी पवित्र मंदिर परिसरालाच शस्त्रागार आणि मुख्यालय बनवले.

आनंदपूर साहिबच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी भिंद्रनवाले यांनी अकाली दलासह १९८२ मध्ये धर्मयुद्ध मोर्चा सुरू केला. 

भिंद्रनवाले पंजाबमधील पुनरुज्जीवनवादी आणि अतिरेकी चळवळीचे प्रतीक बनलं. भिंद्रनवाले आणि त्यांचे अनुयायी सतत बंदुका बाळगू लागले, हेट स्पीच देऊ लागले. १९८३ पासून पंजाबमधील परिस्थिती अस्थिर होत गेली. ऑक्टोबरमध्ये शीख अतिरेक्यांनी एक बस थांबवली आणि सहा हिंदू प्रवाशांना गोळ्या घालून ठार केलं. त्याच दिवशी आणखी एका गटाने ट्रेनमध्ये दोन अधिका-यांची हत्या केली. तेव्हा काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारने पंजाब राज्य सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू केली.

भिंद्रनवाले यांच्यावर अटकेची तलवार आली. यावेळी मग अटक टाळण्यासाठी भिंद्रनवाले आपल्या अतिरेकी केडरसह शीख तीर्थ असलेल्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर कब्जा केला. 

तेव्हा उदयास आलं ‘ऑपरेशन ब्लू स्टार’

WhatsApp Image 2022 04 15 at 5.07.16 PM

सुवर्णमंदिरात अनेक भाविक अडकलेले होते आणि सशस्त्र भिंद्रनवाले यांनी सुवर्णमंदिरात कब्जा केला होता. तेव्हा त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि सुवर्ण मंदिर परिसरातून सशस्त्र दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी अखेर इंदिरा गांधींनी भारतीय लष्कराला सुवर्णमंदिरात प्रवेश करण्याचा आदेश दिला. मंदिराच्या आत खलिस्तानींचे नेतृत्व शीख धर्मगुरु सरदार जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्याच्या साथीदारांनी सैनिकांवर हल्ला केला.

खलिस्तानवाद्यांची वाढती संख्या लक्षात घेता इंदिरा सरकारने बंदुका घेऊन चढाई करण्याचे आदेश दिले होते. ज्यामध्ये जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्याच्या साथीदारांचा मृत्यू झाला होता. त्यातले बहुतेक शीख होते. 

त्यानंतर पंजाब राज्यातून फुटीरतावाद्यांना हटवण्यासाठी भारतीय निमलष्करी दलांकडून मोहिमा सुरू करण्यात आल्या. मात्र मंदिरात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शिखांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यातील काहींनी खलिस्तान चळवळीला पाठिंबा दिला होता. ज्याचा स्फोट या कारवाईच्या चार महिन्यांनी झाला. 

ती एक गोष्ट, एक दिवस…

३१ ऑक्टोबर १९८४. सकाळी ९:२० वाजता इंदिरा गांधी त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्या, तेव्हा  दोन शीख सुरक्षा रक्षकांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. सतवंत सिंह आणि बेअंत सिंह असं त्यांचं नाव.

त्यातील एका मारेकऱ्यावर इंदिरा गांधी यांच्या अन्य अंगरक्षकांनी जागीच गोळ्या झाडल्या, तर दुसऱ्याला नंतर गांधीहत्येसाठी दोषी ठरवून ठार करण्यात आलं. 

जवळपास ११ वाजता या घटनेची माहिती ऑल इंडिया रेडिओभरून देण्यात आली. जेव्हा ही घोषणा झाली की इंदिरा गांधींची हत्या करणारे शीख आहेत, तेव्हा देशभरात शीखांविरुद्ध असंतोष निर्माण झाला. तो ही असा की बघता बघता त्याच रूपांतर मोठ्या दंग्यात झालं. देशभरात शिखांना लक्ष्य करून निर्घृणपणे ठार मारण्यात आले, त्यांची घरे, दुकाने जाळण्यात आली. अशा परिस्थिती देशाला आणि दंग्यांना सावरण्यासाठी त्याच दिवशी राजीव गांधी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 

WhatsApp Image 2022 04 15 at 5.10.17 PM

पंजाब, दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये रक्ताचे पाट वाहत होते.

अविभाजित बिहारमधील बोकारो (आता झारखंड) या शहरातही दंगली झाल्या. दिल्ली आणि कानपूरनंतर बोकारोमध्ये सर्वाधिक मृतदेह होते. स्टील सिटी म्हणून ओळखल्या जाणा-या या शहरातील रस्ते आणि रस्त्यांवर अनेक निरपराधांची हत्या झाली. सरकारचे म्हणणे आहे की एकट्या दिल्लीत दिल्लीत सुमारे २,८०० शीख मारले गेले आणि देशभरात ३,३५० शीख मारले गेले. मात्र स्वतंत्र सूत्रांचा असा अंदाज आहे की देशभरातील मृतांची संख्या सुमारे ८००० ते १७००० आहे.

WhatsApp Image 2022 04 15 at 5.59.58 PM

दंगलीनंतर लाखो शिखांनी आपली घरे सोडली. किमान २० हजारांपेक्षा जास्त जण शहरातून पळून गेल्याची माहिती सरकारने दिली; पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीजने ‘कमीतकमी’ १,००० विस्थपितांची नोंद केली. हे शीख दिल्ली, पंजाब, हरियाणा सोडून उत्तर प्रदेश, बिहारसह अन्य राज्यांत स्थायिक झाले.  

३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर १९८४ दरम्यानचा हा घटनाक्रम.

भारतभरातील मानवी हक्क संघटना आणि वृत्तपत्रांचा असा विश्वास होता की हे हत्याकांड घडवून आणले गेले आहे. हिंसाचारात राजकीय अधिका-यांची मिलीभगत होती. 

नवनिर्वाचित पंतप्रधान राजीव गांधी यांनी देखील अप्रत्यक्षरीत्या या दंगलीचे समर्थन केले होते. जेव्हा त्यांना दंगलीबद्दल विचारले गेलं, तेव्हा आईच्या निधनानंतर पंतप्रधानपदाची शपथ घेतलेले आणि काँग्रेसचे सदस्य असलेले राजीव गांधी म्हणाले होते…

‘मोठं झाड पडलं की पृथ्वीही हादरतेच’

३१ ऑक्टोबरच्या रात्री आणि १ नोव्हेंबरच्या सकाळी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक समर्थकांची भेट घेऊन निधी आणि शस्त्रास्त्रांचे वाटप केले. काँग्रेसचे खासदार सज्जन कुमार आणि कामगार संघटनेचे नेते ललित माकन यांनी शंभर रुपयांच्या नोटा आणि दारूच्या बाटल्या हल्लेखोरांना दिल्या.

१ नोव्हेंबरच्या सकाळी सज्जन कुमार पालम कॉलनी, किरण गार्डन आणि सुलतानपुरीच्या भागात रॅली काढताना दिसले. त्यांनी काही लोकांच्या गटाला लोखंडी रॉड वाटत “शिखांवर हल्ला करा त्यांना लुटा, ठार करा आणि त्यांची मालमत्ता जाळा” अशा ऑर्डर दिल्या होत्या. 

WhatsApp Image 2022 04 15 at 5.59.48 PM

इतकंच नाही तर केंद्रीय अन्वेषण विभागाने न्यायालयाला सांगितलं की, दिल्ली पोलिसांनी दंगलीच्या वेळी आपले ‘डोळे बंद’ ठेवले होते. हे सर्व नियोजित होतं.

दंगल निवडकपणे पसरावी म्हणून काँग्रेस पक्षाच्या अधिकाऱ्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी दंगलखोरांना मतदार याद्या, शाळा नोंदणी अर्ज, रेशन कार्ड हे उपलब्ध करून दिले होते. ज्यांचा उपयोग शीखांची घरं आणि व्यवसाय शोधण्यासाठी केला गेला.

पुढे बरेच वर्ष काँग्रेसच्या मानगुटीवर हे दंगलीचे भूत कायम राहिले. अनेकवेळा जाहीर माफी मागून देखील त्यांचे हे पाप धुतले गेले नाही.

१९८४ पासून हे सर्व शीख न्यायची अपेक्षा करत होते. तब्बल ३४ वर्षांनंतर म्हणजेच २०१८ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने ट्रायल कोर्टाचा निकाल रद्द करत सज्जन कुमार यांना दंगलीचा दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गुन्हेगारी कट रचणे, हिंसा भडकवणे आणि दंगल घडवून आणणे यासाठी ते दोषी आढळले होते.

तर साधारण २०१५ सालची गोष्ट आहे. केंद्र सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. या दंगलीत मारल्या गेलेल्या शिखांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणं हा त्यामागचा उद्देश होता. त्यानुसार २०२१ मध्ये नरेश सेहरावत और यशपाल सिंह या दोघांना हत्येबरोबरच मारहाण करण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने घरात घुसणं, खुनाचा प्रयत्न करणं, घातक शस्त्राने दुखापत करणं, दरोडा टाकणं, जाळपोळ करणं अशा गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं.

आणि अजून इन्व्हेस्टीगेशन सुरु आहे…

आता अग्निहोत्री यांच्या दिल्ली फाईल्सच्या घोषणेनं हा चित्रपट याच घटनेवर आधारित असू शकण्याचा अंदाज आहे. आणि असं असेल तर अग्निहोत्रींच्या खासियत नुसार यातील अनेक ‘गूढ पेच’ समोर येऊ शकतील. 

कारण विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीर फाइल्समधून इतिहासातील अनेक छुपी गुपिते लोकांसमोर आणली आहेत. ताश्कंद फाइल्स या चित्रपटाच्या माध्यमातून माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचे गूढ उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या चित्रपटासाठी विवेक अग्निहोत्री यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

यानंतर आता लोक दिल्ली फाइल्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.