पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळं चीन-रशियाचे संबंध फाटायची शक्यताय

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत. तसे भारत आणि रशियाचे संबंध पार भारत स्वतंत्र झाला तेव्हापासूनचे आहेत. या आधीही पुतिन यांनी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आणि मोदींच्या कार्यकाळात भारताला अनेकदा भेटी दिल्या आहेत. तरीही त्यांचा यंदाचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे.

यामागचं कारणही खास आहे. कोविडचं थैमान सुरू झाल्यानंतर, पुतिन पहिल्यांदाच रशियाच्या बाहेर कुठल्या देशात द्विपक्षीय बैठक घेण्यासाठी येत आहेत. यासाठी त्यांनी भारताची निवड केल्यानं चीनच्या नाकाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. कारण चीन आणि रशियाचे संबंध फारसे चांगले नाहीत, त्यात रशिया चीनचं ऐकते हे दाखवण्याचे सगळे चान्सेस पुतिन धुडकावून लावत आहेत.

आत्ता तर बैठक झाली होती…

चीन, भारत आणि रशिया यांच्यात नुकतीच त्रिपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीमुळं फार गदारोळ झाला नाही. अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीचा सामना, कोविड संसर्गाशी लढा आणि संयुक्त राष्ट्रांसारख्या बहुराष्ट्रीय संस्थेला आणखी मजबूत करणं या गोष्टींवर या बैठकीत चर्चा झाली.

सीमा प्रश्नावरही चर्चा…

या बैठकीत भारत आणि चीन सीमा प्रश्नावर चर्चाही झाली. आधीच सीमारेषेवरुन आणि चीन भारताच्या सीमाभागात करत असलेल्या कुरापतींवरुन वाद पेटलेले आहेतच. त्यात चिनी सैनिक भारतीय जवानांना आपल्याच सीमाभागात टेहळणी करायला अटकाव घालत होते. अशा परिस्थितीतही भारत चीनशी बैठक कशी काय करतो, यावरुन दंगा झाला होता. पण भारत सध्या सावध पावलं उचलत आहे आणि पुतिन यांच्या दौऱ्यादरम्यान भारत आणि चीन सीमाभागातली परिस्थिती शांत ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं ऑनलाईन का होईना पण भारत आणि चीन बैठक झाली, हे महत्त्वाचं असल्याचा अनेकांचा अंदाज आहे.

पुतिन यांचा चीनला शह

जागतिक राजकारणात रशिया चीनला पूरक भूमिका घेतेय, अशी चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. अशी चर्चा होणं हे चीनसाठी फायद्याचं असलं, तरी पुतिन यांची पत कमी करणारं आहे. त्यामुळं भारत भेटीतून पुतिन रशियाची स्वतंत्र भूमिका सिद्ध करणार असल्याची चर्चा आहे. कारण भारत आणि चीनचे संबंध बिघडलेले असले, तरी रशिया भारतासोबत आपले संबंध दृढ करण्यासाठी आतुर आहे, हे त्यांच्या दौऱ्यामुळं अधोरेखित होत आहे.

या भेटीचा भारताला काय फायदा होणार?

चीनसोबतच अमेरिकेलाही भारत-रशिया मैत्रीचं ठळक उदाहरण पाहायला मिळेल. सोबतच पुतिन यांच्या भेटीदरम्यान सुरक्षा, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या विषयांशी संबंधित बैठकीही होणार आहेत. या दौऱ्या दरम्यानच भारताला शक्तिशाली एस-४०० मिसाईल, एके-२०३ असॉल्ट रायफल्स अशी महत्त्वाची शस्त्रं मिळण्याबाबत चर्चा होणार आहे. साहजिकच चीनपासून असलेल्या संभाव्य धोक्याला सामोरं जाण्याची तयारी करण्यासाठी भारताला या शस्त्रास्त्रांचा फायदाच होणार आहे. रायफल्सचा पहिला लॉट भारतात आल्यानंतर उरलेल्या रायफल्स भारतातच तयार होतील.

एका बाजूला आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत भारत आणखी बलवान होत असताना, रशियाच्या मदतीनं भारताची शस्त्रसामुग्रीतली ताकदही वाढणार आहे. त्यामुळं रशियाला आपल्या गोटात सामील करायला उत्सुक असलेल्या चीनच्या पदरी मोठी निराशा पडेल आणि चीनविरोधात भारताचं पारडं काहीसं जड होईल, असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.