मुख्यमंत्री दादांना म्हणाले, ” पश्चिम महाराष्ट्रातच आणखी किती साखर कारखाने काढणार आहात?”

गोष्ट आहे साठ सत्तरच्या काळातली. नगर जिल्हा म्हणजे राजकीय दृष्ट्या सजग भाग. इथे कम्युनिस्टांपासून ते काँग्रेस पर्यन्त सर्व विचार प्रवाह तेव्हा सुखाने नांदत होते. गोदावरी, प्रवरा नद्यांच्या पाण्याने सुपीक झालेल्या भागात विठ्ठलराव विखेंसारख्या नेत्याने सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली होती.

सहकारी साखर कारखाने उभे राहिले आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस आले. ठिकठिकाणी आपल्या भागातल्या लोकांना एकत्र करून सहकाराच्या माध्यमातून विकास साधणारं तरुण नेतृत्व उभं राहू लागलं.

यातच होते नेवासे तालुक्यातल्या सोनई गावचे यशवंतराव गडाख. तसा तर त्यांचा राजकारणाशी थेट संबन्ध नव्हता. वडील फौजदार होते, गावाकडं पिढीजात पाटीलकी चालत आलेली. गडाख यांचं लहानपण मात्र कष्टातच गेलं. शाळा कॉलेजमध्ये काही विद्यार्थी आंदोलने केली असतील मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळा मास्तरची नोकरी पकडली.

नोकरी करत असताना मित्रांचा आग्रह म्हणून पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरले आणि प्रचंड मतांनी निवडून देखील आले. पुढे नेवासाचा सभापती देखील झाले. रस्ते, इमारती, तलाव अशी विकासाची काम सुरु केली. निवडणूक जिंकल्यावर हि त्यांची नोकरीची खटपट सुरूच होती. राजकारणासारख्या बेभरवशाच्या क्षेत्रावर विसंबून राहायचं की घर चालवण्यासाठी नोकरी करायची हा प्रश्न त्यांच्यापुढे होता.

पण त्यांचा कामाचा धडाका, ग्रामीण भागातील प्रश्नांची समज, प्रशासन हाताळण्याची पद्धत यामुळे त्यांची लोकप्रियता वाढतच गेली. 

अशातच त्यांनी आपल्या भागात साखर कारखाना उभा करायचं मनावर घेतलं. त्यांचं वय जास्तीत जास्त तिशीत पोहचलं असेल. भांडवल नव्हतं, अनुभव नव्हता पण मनात जिद्द अफाट होती. त्यांनी गावोगावी फिरून लोकांना कारखान्याचे महत्व समजावून सांगितलं, पैसे उभे राहू लागले.

सुरवातीला आहे त्या बजेट मध्ये गुळ कम रम कारखाना उभा करायचं ठरलं होतं. त्याकाळी आंध्र प्रदेशमधील एका रामय्या नावाच्या उद्योगपतीने त्याचा कारखाना विकायला काढला होता. त्यातल्या जुन्या मशिनरी कमी किंमतीत घ्यायचं ठरलं. तीन लाखांचा ऍडव्हान्स देखील दिला.

नगरच्या या तरुणाची चाललेली धडपड सांगलीच्या वसंतदादा पाटलांच्या कानावर पडली. ते राज्यातले दिग्गज नेते होते. सहकार क्षेत्रातील त्यांचा अभ्यास मोठा होता. शिक्षण मोठं नव्हतं पण जनेतची नस पकडायची त्यांची हातोटी मोठी होती.

वसंतदादांनी गडाख यांना मुंबईला मंत्रालयात भेटायला बोलावलं. यशवंतराव गडाख भेटीला गेले त्यावेळी दादा त्यांना म्हणाले,

“जुना नको नवाच कारखाना उभारा.”

गडाखांनी त्यांच्या समोर उभ्या असलेल्या अडचणींचा पाढाच वाचून दाखवला. शिवाय ऍडव्हान्सची रक्कम तेलगू व्यापाऱ्याला दिलेल्याच देखील सांगितलं. वसंतदादा त्यांना घेऊन तत्कालीन सहकार मंत्री यशवंतराव मोहिते यांच्याकडे गेले. त्यांनी मुळा कारखान्याची फाईल मागून घेतली. दोन्ही नेत्यांची काही तरी चर्चा झाली. मोहिते म्हणाले चला मुख्यमंत्र्यांना भेटू.

पुढे यशवंतराव मोहिते सोबत वसंतदादा पाटील आणि पाठोपाठ यशवंतराव गडाख अशी वारी आता मुख्यमंत्र्यांच्या केबिन मध्ये आली. तेव्हा मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. पहिल्यांदा यशवंतराव मोहिते त्यांच्याशी बोलले मग वसंतदादा पाटलांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरु झाली.

नाईक साहेब म्हणाले,

पश्चिम महाराष्ट्रात आणखी किती कारखाने काढता? विदर्भ, मराठवाड्याचा काही विचार करणार आहात कि नाही तुम्ही लोक ?

त्यांच्या या वाक्यामुळे वातावरण तापले.  वसंतदादा आपल्या रांगड्या स्वभावानुसार सडेतोडपणे म्हणाले,

“महाराष्ट्राचे पश्चिम, मध्य आणि पूर्व असे भाग का पाडताय ?आमच्या डोक्यात असे काही नाही. तिकडेही होऊ द्यात कारखाने . नाही कोणी म्हणतंय ? तेथील कार्यकर्त्यांनी जरा उत्साह दाखवावा, पुढे यावं, प्रस्ताव आणावेत. आमची काहीही हरकत नाही. आम्ही त्यांनाही मदत करू. आता या पोराचं काम पहा. यान जनमत तयार केलं, गावोगाव हिंडला. तीस लाख रुपये गोळा केले. आंध्र मध्ये जाऊन जुन्यामशिनरी  खरेदीचा करार करून आला. या सगळ्यात वसंतदादा पाटील कुठे होता?

या पोरांना आम्ही काही बोटाला धरून चालायला नाही शिकवलं. पडत धडपडत ही मुलं शिकली. मग माझ्याकडे आली. तुमच्या पोरांनाही सांगा अशी सुरवात करा आणि आमच्याकडे या. मोहिते आणि मी नाही म्हणालो तर मग बोला.”

वसंतराव नाईक निरुत्तर झाले. पुढे यशवंतराव गडाख यांच्या कारखान्याचा प्रश्न मार्गी लागला. ते पुन्हा गावी जायला निघाले होते तेव्हा वसंतदादा म्हणाले,

“तू जुनी मशिनरी घेऊ नको. नवीन कारखाना नवीन मशिनरी घे.”

गडाखांनी त्यांना सांगितलं,

“पण एक कोटीच्या वर बजेट जाईल आणि अगोदरच तीन लाखांचा ऍडव्हान्स दिला आहे.”

वसंतदादा म्हणाले,” रजिस्ट्रेशन मी मिळवून देतो.”

त्या तीन लाख ऍडव्हान्सचा प्रश्न निघाल्यावर दादांनी त्या तेलगू व्यापाऱ्याला भेटायला बोलावलं. योगायोगाने तो मुंबईला आलाच होता. दादांनी गडाख यांना सोबत घेऊन त्याला गाठलं. आपल्या सुप्रसिद्ध मोडक्या तोडक्या हिंदीत म्हणाले,

“देखो रामय्या साब, जुना मशिनरी गडबड हो सकता है. यह यशवंतराव नया लडका है. यंग है. इसको सब तकलिफ देगा.”

पण तो रामय्या म्हणू लागला कि “लेकिन दादा वो ऍग्रिमेंट हुआ है.”

वसंतदादा त्याला ऍग्रिमेंट फाडायला सांगू लागले. तो तयार होईना.  दादा म्हणाले,

“मेरे लिए करो. तुम बडा आदमी है. यशवंतराव को छोटा भाई समझो. ऍग्रिमेंट फाड डालो, पैसा वापस करो. मेरी बात मानो.”

दादांच्या आग्रहा खातर रामय्याने करार रद्द केला आणि मुळा कारखान्याचा विषय मार्गी लागला. पुढे अनेक अडचणीवर मात करून अवघ्या दहा महिन्यात हा कारखाना उभा राहिला. यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि अण्णासाहेब शिंदे यांच्या हस्ते त्याच उदघाटन झालं.

यशवंतराव गडाख वसंतदादांच्या उपकाराची, त्यांच्या रांगड्या स्वभावाची आठवण आजही सांगतात.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.