गेल्या ५ महिन्यात १० लाख मुलांपर्यन्त दर्जेदार ऑनलाईन शिक्षण घेवून जाणारी ही तरुणाई आहे..

कोरोनामुळे शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ झाला हे सगळ्या जगानं पाहिलं, शाळा बंद असल्यामुळे मुलांचं शिक्षण थांबायला नको म्हणून त्यावर ऑनलाईन शिक्षण हा उपाय सुचवला गेला. शासनानं पण तो उपाय वापरण्याचं ठरवलं.

मग सुरु झालं ऑनलाईन शिक्षणाचं एक नवं पर्व. ज्यात पहिली पासूनच्या मुलांना मोबाईल स्क्रीन समोर बसवायला सुरुवात झाली.

हळू हळू यातील त्रुटी समोर यायला लागल्या. अभ्यासक आणि शिक्षण तज्ञ पण या समस्यांवर बोलायला लागले. एकतर्फी संवाद म्हणजे फक्त शिक्षकांनीच बोलायचं, त्यांनी शिकवलेलं मुलांना समजत आहे कि नाही हे कळतं नव्हतं.

दुसरी आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे शहरांमध्ये आणि आर्थिक सुबत्ता असणाऱ्या मुलांना ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था सहज मिळत होती, पण त्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आणि पालकांची आर्थिक स्थिती हि तशी काही नाजूक. त्यामुळे महागड्या ऑनलाईन शिक्षणाचे पर्याय परवडणारे नव्हते. आणि हे होते ते मोफत नव्हते, आणि जे मोफत होते ते तेवढे दर्जेदार नव्हते.

तर अशा या गरीब आणि विशेषतः गावातल्या मुलांच्या या समस्या आणि शिक्षणाच महत्व ओळखून तीन तरुणांनी त्यासाठी पुढाकार घ्यायच ठरवलं. आणि एक संकल्पना समोर आली

‘V स्कुल’ नावाची.

पुण्याच्या  ‘वॉवेल्स ऑफ द पिपल असोसिएशन’ (वोपा) या संस्थेने ग्रामीण भागातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत आणि दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी व्ही स्कूलचा (V School) हा उपक्रम सुरु केला आहे. आणि नुसता सुरु केलेला नाही तर मागील ५ महिन्यांमध्ये राज्यभरातील जवळपास १० लाख मुलांपर्यंत ते पोहचले देखील.

व्ही स्कुल बद्दल सगळं सविस्तर सांगणारच आहे, पण त्याआधी ‘वोपा’ या संस्थेविषयी थोडं सांगतो.

पुण्याची ऋतुजा जेवे, प्रफुल्ल शशिकांत, आकाश भोर हे तिघेही शिक्षणाने इंजिनियर. आपल्या शिक्षणाचा उपयोग करत ऋतुजा अहमदनगरच्या स्नेहालय या शाळेसाठी स्वयंसेवक म्हणून काम करत होत्या तर प्रफुल्ल आणि आकाश हे दोघे हि डॉ. अभय बंग यांच्या ‘निर्माण’ या उपक्रमासाठी काम करत होते.

याच कामातून तिघांची ओळख झाली आणि डॉ. अभय बंग यांच्या मार्गदर्शनात विकासापासून लांब असलेल्या मराठवाडा विभागातील भागासाठी काही तरी ठोस काम करण्याचं पक्क झालं. यांनी शिक्षण निवडलं आणि २०१८ मध्ये ‘वोपा’ची स्थापना झाली.

तिथल्या शाळेतील शिक्षकांना मुलांना शिकवण्याच्या नवनवीन पद्धती विकसित करणं, देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांना शिक्षण देणं, बीड भागातील ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना शाळेपर्यंत आणणं किंवा शाळेला त्यांच्या पर्यंत घेऊन जाणं असे उपक्रम सुरु केले.

अशातच मागच्यवर्षी मार्च मध्ये कोरोनाची महामारी आली आणि मुलांचं वर्गातलं शिक्षण थांबलं. ऑनलाईन सुरु झालं पण वर सांगितल्या प्रमाणे अडचणी येत होत्या. याच अडचणीतून ‘वोपा’च ‘V स्कुल’ निर्माण झालं.

बीड जिल्ह्यातून झाली ‘V स्कुल’ची सुरुवात.

‘V स्कुल’ची सुरुवात अगदी छोट्या स्तरावर केली ती बीड जिल्ह्यातून आणि दहावीच्या मुलांना केंद्रित ठेवून. दहावीच्या मुलांचा शासनाने आखलेला संपूर्ण अभ्यासक्रम मुलांना समजण्यास सोपा ठरले असा विकसित करण्यात आला. यासाठी लोकल भाषा, प्रत्येक धड्याला काही सूचना, व्हिडीओ, इमेजेस, ऑनलाईन परीक्षा, घरी करायला गृहपाठ असं स्वरूप देण्यात आलं.

जूनमध्ये बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते व्ही-स्कूल सार्वजनिक करण्यात आलं.

यामुळे बीड जिल्ह्यातील एकूण ४७ हजार दहावीच्या विद्यार्थ्यांना थेट फायदा मिळाला. या कामात बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी देखील ‘वोपा’ला लागेल ती मदत केली.

यानंतर हळू हळू उस्मानाबाद आणि इतर जिल्ह्यामध्ये याची सुरुवात करण्यात आली. दहावीच्या मुलांनंतर हा अभ्यासक्रम पहिली ते नववीच्या मुलांसाठी देखील सुरु करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. आणि त्यानुसार ‘वोपा’ ने काम करून ते सुरु देखील केलं.

म्हणून ‘V स्कुल’ दर्जेदार आहे.

या ‘V स्कुल’च सगळ्यात महत्वाचं वैशिट्य आहे ते म्हणजे एकतर्फी संवाद न राहता इंटरॅक्टिव्ह होण्याची सुविधा. सोबत केवळ व्हिडिओचा भडिमार केला नाही, तर फोटो, जीआयएफ आणि इतर इंट्रेस्टिंग गोष्टींचाही उपयोग केला आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षक यांना यात सक्रिय भूमिका घ्यावी लागते.

लॉगिन किंवा इंस्टॉल करण्याची गरज नसल्यामुळे एकाच मोबाईलवरुन अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सुविधा आहे. एक धडा एका पानावर असल्यामुळे स्क्रोलिंग करून वापरायला एकदम सोप्पे आहे.

वही, पेन, पुस्तक, परिसर व शिक्षक यांचा योग्य वापर करुन विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी होईल अशी रचना करण्यात आली आहे.

याच संदर्भात उदाहरण द्यायचं झालं तर वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही गावातल्या आतिषच घेऊ. गावात राहणाऱ्या १० मुलांकडे स्वतःचा मोबाईल नव्हता आणि त्यांच्या पालकांकडेसुद्धा मोबाईल नव्हता. याच गावातील आतिशला हे माहिती होते. केवळ मोबाईल नाहीये म्हणून आपले १० मित्र शिक्षणापासून लांब राहू नयेत म्हणून आतीशने स्वतःच्या फोनचा वापर ग्रुप स्टडीसाठी करत आहे.

दिवसभराची सगळी काम झाली की संध्याकाळी एकाच वेळेला एका ठेकाणी भेटून आतिषसोबत सगळे V-स्कूलवर विनाशुल्क ऑनलाईन अभ्यास करतात. 

नजीकच्या काळात ‘V स्कुल’ ऍप लॉन्च करणार आहेत. त्यामुळे ते आता संपूर्ण राज्याच्या ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहचतील. आपल्याकडे फुकट आहे म्हंटल्यावर काही तरी कमतरता आहे असं मानलं जात पण वरची वैशिट्ये वाचल्यावर ‘V स्कुल’ ने याला फाटा दिला आहे असं म्हणाला वाव आहे.

त्यामुळेच चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी समाजानं पण उभं राहण्याची गरज आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.