लक्ष्मणच्या अंघोळीमुळं भारत आफ्रिका मॅच मध्ये राडा झाला होता.

क्रिकेट म्हणजे जंटलमन लोकांचा गेम आणि व्हीव्ही एस लक्ष्मण म्हणजे या जंटलमन लोकांच्या मधला देव माणूस. त्याने कधी कोणाला स्लेजिंग केलं नाही ना कधी कोणाबरोबरच्या भांडणात त्याच नाव आलं ना कधी कुठल्या वादात अडकल. आपण भल आणि आपली बॅट भली असा नाकासमोर चालणारा सज्जन माणूस.

पण या सज्जन माणसाच्या आंघोळीची स्टोरी खूप फेमस आहे.

गोष्ट आहे २००६ सालची. भारतीय टीम आफ्रिकेच्या दौऱ्यावर आली होती. राहुल द्रविड आपला कप्तान होता. तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीचा चौथा दिवस होता. भारताची दुसरी इनिंग सुरु झाली. पहिल्या डावात काढलेल्या ४१४ धावांमुळे आपल्याला आफ्रिकेवर शंभर धावांची लीड मिळाली होती.

मॅच आणि सिरीज आपल्या हातात आले होते. कारण आपली बॅटींग लाईनअप तगडी होती.

सेहवाग आणि वासिम जाफर ही रेग्युलर ओपनिंग जोडी, त्यानंतर द्रविड, मग ४ आणि ५ नंबरला सचिन लक्ष्मण, सहा नंबरला गांगुली आणि सात नंबरला दिनेश कार्तिक.

सेहवाग आणि जाफर आत्मविश्वासाने खेळायला उतरले. पण दुर्दैवाने दुसऱ्याच ओव्हरला फोर मारण्याच्या नादात सेहवाग डेल स्टेनचा शिकार झाला. सेहवाग आउट झाल्यावर द्रविड मैदानात आला. तो येऊन एक ओव्हर पण झाली नाही तेवढ्यात वसीम जाफरला मखाया एनटीनीने आउट केले. मग खरी मज्जा सुरु झाली.

४ नंबरला खेळायला आलेल्या सचिनला अंपायरनी मैदानात उतरू दिले नाही.

कारण होते की आदल्या दिवशी खेळ सुरु असताना सचिन काही कारणांनी मैदानातून १० मिनिटासाठी बाहेर गेला होता. कसोटी क्रिकेटच्या नियमाप्रमाणे त्याला १० मिनिटे खेळता येणार नव्हते. आता अचानक अम्पायरनी हा विचित्र नियम बाहेर काढल्या मुळे भारतीय ड्रेसिंगरूममध्ये गोंधळ सुरु झाला.

पुढच्या नंबरला खेळायला येणाऱ्या लक्ष्मणचा कुठेच पत्ता नव्हता.

लक्ष्मणला शोधण्यासाठी सगळीकडे धावाधाव सुरु झाली. अखेर हरभजनसिंगला तो आपल्या सवयीप्रमाणे बाथरूममध्ये शॉवर घेताना सापडला. भज्जीने त्याला ओरडून हाक दिली,

“लक्ष्मणभाई आपकी बॅटिंग है. जल्दी चलो !”

आता हरभजनची इमेज टीममध्ये प्रँकस्टर अशी होती. लक्ष्मणला वाटल की तो गंमत करतोय. त्यानं लक्ष दिलं नाही. निवांत आपलं गाणं गुणगुणत अंघोळ सुरूच ठेवलं. इकडे ग्राउंडमध्ये देखील कोणाला कळेना की काय झालंय. भारताचा पुढचा फलंदाज खेळायला का येत नाही आहे. कप्तान राहुल द्रविडला देखील टेन्शन आलं होतं.

आता क्रिकेटचा आणखी एक नियम म्हणजे जर ३ मिनिटात पुढचा खेळाडू मैदानात आला नाही तर त्याला आउट देण्यात येत.

लक्ष्मण येत नाही म्हटल्यावर स्वतः सचिन पळत पळत ड्रेसिंग रुमच्या बाथरूममध्ये गेला. लक्ष्मण तेव्हा अंगाला साबण लावत होता. सचिनने त्याला ओरडून सांगितलं. सचिन म्हणतोय म्हटल्यावर मग लक्ष्मणला इमर्जन्सी लक्षात आली. तो फास्टमध्ये आवरून बाहेर आला तोवर ६ नंबरच्या गांगुलीला तयार करण्यात येत होतं.

गांगुली देखील आपली लवकर बॅटिंग येणार नाही म्हणून ट्रॅकसूट घालून बसला होता. कोणी तरी गांगुलीच्या अंगात टीशर्ट चढवत होतं. एकीकडे सचिनने त्याला पड बांधत होता. कोच ग्रेग चपलने डोक्यावर हेल्मेट चढवल. लक्ष्मण बाहेर आलेल बघून बॅटिंगला चाललेल्या गांगुलीने कधी नव्हे ते त्याला शिव्या घातल्या.

पुढचा बॅट्समन खेळण्याची ३ मिनिट केव्हाच उलटून गेली होती.

आता गांगुली क्रीजवर गेला आणि आफ्रिकेने अपील केल्यावर तो आउट होऊन परत येणार ही खात्री होती. पण योगायोगाने ग्राउंडवर असलेल्या कप्तान द्रविडने आफ्रिकन कप्तान स्मिथशी चर्चा करून ठेवली होती. त्याने देखील खिलाडूवृत्ती दाखवत अपील करणार नाही अस मान्य केल.

लक्ष्मणच्या अंघोळीमुळे निर्माण झालेला समरप्रसंग टळला. यापुढे मैदानात आल्यावर कोणीही अंघोळीला जायचं नाही असा फतवा कोच ग्रेग चपलने काढला.

आजही सज्जन व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणला सचिन गांगुली वगैरे त्याचे मित्र अंघोळीमुळे झालेल्या राड्याची आठवण काढून त्याची टांग खेचत असतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.