वर्गात कायम तिसरं येणारं, तरीही सगळ्यात स्कॉलर पोरगं म्हणजे व्हीव्हीएस लक्ष्मण

सौरव गांगुलीच्या नेतृत्वातली टीम इंडिया म्हणजे सज्जन आणि उनाड पोरांचा मिळून झालेला गुणी वर्ग होता. सचिन तेंडुलकर कायम पहिला येणार, द्रविड दुसरा, दादा गांगुली मॉनिटर, युवराज-नेहरा-भज्जी-सेहवाग म्हणजे मागच्या बाकावरची राडा करणारी पोरं. या सगळ्या गर्दीत कायम भारी मार्क्स मिळवूनही शांत राहणारं पोरगं एकच होतं – वांगीपुरापू वेंकट साई लक्ष्मण. अर्थात आपला व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण.

सहा फूट उंची, थंड नजर आणि कायम आईनं पाडून दिल्यासारखा भांग. क्रीझवर उभा राहिला की लेग साईडला हुकूमत आणि गुरं चरायला सोडून परत येईपर्यंत आऊट होणार नाही याची फिक्स गॅरंटी- म्हणजे लक्ष्मण.

सचिनची बॅटिंग म्हणजे लष्करी शिस्त, बॉल अशा टाईमिंगवर मारणार की सरळ रेषेत बाऊंड्रीपार. राहुल द्रविड म्हणजे क्रीझवर न हलणारा दगड उभा करावा. गांगुली, युवराजच्या बॅटिंगवर तर फेटे उडवावे, एकदम धुरळा! लक्ष्मणकडं हे सगळं होतं. डिफेन्स आणि टेकनिक तर बाप. लईवेळा सिक्स बिक्स मारत नसला, तरी ‘सुट्टी नाय’ मोड त्यालाही ऑन करता यायचाच.

नाईन्टीजच्या पोरांसाठी लक्ष्मणच्या अनेक आठवणी असतील. पण सगळ्यात खास २००१ कोलकाता टेस्ट. पहिली टेस्ट हरलेलो, त्यात दुसऱ्या टेस्टमध्ये फॉलोऑन. असं वाटलं ही सिरीज मंडळात जमा झालिये. एकदम डर का माहौल झाला होता. ऑस्ट्रेलिया हा गणितासारखा अवघड पेपर असला, तरी लक्ष्मण होता स्कॉलर. त्यानं शांतीत क्रांती केली, त्याचे २८१ रन्स आणि द्रविड सोबतच्या पार्टनरशिपनं ऑस्ट्रेलियाचा सपशेल बाजार उठवला.

वॉर्न, मॅकग्रा, गिलेस्पी, कॅस्प्रोव्हिच असला बेक्कार बॉलिंग लाईनअप. पण लक्ष्मण सगळ्यांना पुरून उरला. या मॅचबद्दल बोलताना गिलेस्पी म्हणाला होता, ‘If I am honest, I was pretty sick of the sight of Mr. Laxman.’

लक्ष्मणबाबत आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्याचा स्वभाव. निवांत स्लिपमध्ये उभं रहायचं, कधी कोणाला स्लेजिंग नाही, उगं बॉलरला हूल देणं नाही. मॅचचा रिझल्ट काहीही लागला, तरी चेहऱ्यावर हसू.

आणखीन एक किस्सा म्हणजे मोहाली टेस्ट २०१०. समोर परत ऑस्ट्रेलियाच. पहिल्या इनिंगमध्ये लक्ष्मण बॅटिंगला आला दहा नंबरला. इंज्युरीमुळं भावाला रनर घेऊन पळावं लागत होतं. भारताच्या बॉलर्सनं कांगारूंचं कंबरडं मोडलं आणि टार्गेट मिळवलं २१६ रन्सचं.

कांगारू बॉलर्सपण चेकाळलेले. त्यांनी आपली टॉप ऑर्डर किरकोळीत खाल्ली. प्रेशर आणि रनर घेऊन क्रीझवर आला लक्ष्मण. एका बाजूनं विकेट पडत राहिल्या पण लक्ष्मण अभेद्य होता. शेवटचा गडी प्रग्यान ओझा पण त्यालाही साथीला घेत लक्ष्मणनं किल्ला लढवला. त्याच्या नॉटआऊट ७३ रन्समुळं भारतानं मॅच मारली. ऑस्ट्रेलियाच्या पेपरमध्ये परत एकदा लक्ष्मण टॉपर ठरला.

याच मॅचमध्ये लक्ष्मणला पहिल्यांदा चिडतानाही पाहायला मिळालं.

टेस्टच्या मानानं त्याला वनडेमध्ये तशी कमीच संधी मिळाली. त्याच्याकडे चांगले स्ट्रोक्स होते, पण व्हाईट बॉल क्रिकेटला हवी असणारी आक्रमकता थोडी कमी पडली.

रिटायरमेंटनंतर, तो कमेंट्री बॉक्समध्ये आणि कोचिंग करताना दिसतोय. पण आजही लक्ष्मण म्हणल्यावर दोनच गोष्टी आठवतात, टेस्टचे व्हाईट कपडे, डोक्यावर हेल्मेट, डोळ्यांवर गॉगल आणि सिली पॉईंटला कॅच घ्यायला उत्सुक असलेले हात.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे- दिवसभराचा खेळ संपल्यावर एका हातात हेल्मेट, एका हातात बॅट, गळ्याभोवती रुमाल अशा अवतारात ईडन गार्डन्सच्या पॅव्हेलियनकडे चालणारे दोन भिडू. एका बाजूला द्रविड आणि दुसऱ्या बाजूला व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण.

भले सचिन, द्रविड यांच्यापेक्षा कमी मार्क असतील; भले दादा, युवराज, भज्जीपेक्षा कमी दंगा असेल, पण सगळ्यात स्कॉलर मात्र वांगीपुरापू वेंकट साई लक्ष्मणच!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.