व्यंकटेश प्रसाद केएल राहुलची मापं काढू शकतोय ती उगाच नाही…
भारताकडे एकवेळ स्पिन गोलंदाजीमध्ये वर्चस्व होतं असं मानलं जायचं. पुढे काळ बदलत बदलत फास्टर बॉलर लोकांनाही चांगले दिवस आले. कपिल देव रिटायर झाल्यानंतर भारतीय संघात फास्टर बॉलरची एक पोकळी निर्माण झाली होती. पुढे जवागल श्रीनाथ आणि व्यंकटेश प्रसाद या जोडगोळीने मोर्चा सांभाळला. पण व्यंकटेश प्रसाद हा कायमच अंडररेटेड राहिला.
व्यंकटेश प्रसाद सध्या चर्चेत आलाय, ते केएल राहुलवर केलेल्या टीकेमुळं. खराब फॉर्ममध्ये असूनही राहुलला सतत संधी का दिली जातीये ? त्याच्यापेक्षा चांगल्या प्लेअर्सला चान्स का दिला जात नाहीये ? यावरुन व्यंकटेश प्रसादनं राहुलला आणि बीसीसीआयला लक्ष्य केलं.
व्यंकटेश प्रसाद अधिकारवाणीनं हे सगळं बोलू शकतोय, त्याला कारणही तसंच आहे. ते म्हणजे व्यंकटेश प्रसादचा अनुभव.
व्यंकटेश प्रसाद हा भारताचा एक महत्वाचा बॉलर होता. उत्कृष्ट लेग कटर आणि स्लो बॉलिंग सोबतच विविध व्हॅरिएशन व्यंकटेश प्रसादच्या बॉलिंगमध्ये होत्या. व्यंकटेश प्रसाद हा बॉलर कायम अंडररेटेड होता कारण ज्या ज्या वेळी त्याने त्याची बेस्ट बॉलिंग दिली त्या त्या वेळी भारत पराभूत होत गेला. आजचा किस्सा अशाच एका मॅचचा ज्यात व्यंकटेश प्रसादने जबरदस्त बॉलिंग केली खरी पण भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
साल होतं १९९९. बऱ्याच काळानंतर भारत पाकिस्तान यांच्यात सामना सुरु झाला होता. चेन्नईमध्ये पहिली टेस्ट मॅच खेळवली जात होती. तब्बल दहा वर्षांनंतर भारत पाकिस्तान यांच्यात टेस्ट सीरिजचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळच्या पाकिस्तानच्या टीममध्ये सईद अनवर, युसूफ योहाना, इंझमाम उल हक, सलीम मलिक आणि शाहिद आफ्रिदीसारखे जबरदस्त बॅट्समन होते.
या मॅचमध्ये पाकिस्तानने पहिल्या इनिंगमध्ये २३८ रन बनवले, आता या प्रत्युत्तरात भारताने १६ रनांची आघाडी मिळवली होती. पाकिस्तानच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पाकिस्तानने २७८ रन बनवलेले होते आणि त्यांचे फक्त ५ खेळाडू बाद झालेले होते. या वेळी पाकिस्तान एकदम मजबूत स्थितीत होता. सामना पूर्णतः पाकिस्तानच्या बाजूने झुकलेला होता.
अशा वेळी बॉलिंग मिळाली ती व्यंकटेश प्रसादला. हि ओव्हर एक मॅजिक ओव्हर असेल याची कुणालाही कल्पना नव्हती. पहिल्याच ओव्हरमध्ये व्यंकटेश प्रसादने मोईन खानला आउट करत मोठा अडसर दूर केला.
पुढच्याच ओव्हरमध्ये शाहिद आफ्रिदीला क्लीन बोल्ड करत व्यंकटेश प्रसादने आपला फॉर्म दाखवून दिला होता. यानंतर वसीम अक्रम, सकलेन मुश्ताक, वकार युनूस यांच्याही बत्त्या व्यंकटेश प्रसादने एक एक करत गुल केल्या.
आपल्या पाच विकेट प्रसादने या एकही रन देता पटकावल्या होत्या. या इनिंगमध्ये व्यंकटेश प्रसादने ३३ धावा देऊन एकूण ६ विकेट मिळवल्या. इतकी चांगली बॉलिंग करूनही भारताचा या मॅचमध्ये १२ धावांनी पराभव झाला. याच मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने दुखापतग्रस्त असूनही आपली ऐतिहासिक १३६ धावांची खेळली होती.
आजही क्रिकेटमध्ये सचिनची हि बॅटिंग लोकांच्या लक्षात आहे पण व्यंकटेश प्रसादच्या बॉलिंगची कुठेही चर्चा होत नाही.
१९९६ ते २००१ या काळात व्यंकटेश प्रसादाची बॉलिंगमध्ये चलती होती. प्रसादने आमिर सोहेल आणि पाकिस्तान टीमला त्याचा हिसका दाखवला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने एकाच ओव्हरमध्ये ५ बॉल मध्ये ४ विकेट मिळवल्या होत्या.
व्यंकटेश प्रसादने स्लोवर बॉल हे खूप मोठं अस्त्र शोधून काढलं होतं, आज क्रिकेटमध्ये स्लोवर बॉल किती महत्वाचा आहे हे फास्टर बॉलर लोकांना चांगलंच ठाऊक असेल. घरच्या खेळपट्ट्यांऐवजी विदेशी खेळपट्ट्यांवर व्यंकटेश प्रसाद जास्त प्रभावी होता आणि म्हणूनच भारताचा मॅचविनर खेळाडूही.
हे हि वाच भिडू :
- द्रविड त्या दिवशी लॉर्डसवरची पैज हरला पण १५ वर्षांनी का होईना त्याने जिंकून दाखवलंचं!
- आणि शांत सज्जन प्रसादने पाकिस्तान्यांना आयुष्यभर लक्षात राहिल असा धडा शिकवला.
- क्रिकेट पंढरी लॉर्ड्सवर शतक झळकवणे सचिनला फक्त एकदाच जमलं होतं..
- तो टेरर अटॅक खरं तर सचिन, धोनी आणि द्रविडला किडनॅप करण्यासाठी आखण्यात आला होता.