इंग्लंडमधून कंपनी सरकारला नोटीस आली होती, ” मराठ्यांना आधुनिक शस्त्रास्त्रे विकू नका.”

साल होतं १७७८. पेशवाईच्या गृहकलाहाचा काळ. नारायणराव पेशव्याचा खून घडवून आणणाऱ्या रघुनाथराव पेशव्याने बंड पुकारलं होतं. तो पेशवाईची गादी आपल्याला मिळावी म्हणून इंग्रजांना जाऊन मिळाला.  या भाऊबंदकीचा फायदा घेऊन मराठा सत्तेचा विनाश करायचा इंग्रजांनी बेत केला होता. प्रचंड मोठं इंग्लिश सैन्य पुण्यावर चाल करून आलं.

अटकेपार झेंडा लावणारा पराक्रमी राघोबादादाचा अनुभवी मार्गदर्शनाचा वापर करून पुणे सहज जिंकता येईल असं इंग्रजांना वाटत होत. मात्र त्यांच्या आणि विजयाच्या मध्ये एक माणूस उभा होता.

महादजी शिंदे.

बारभाईचा कारभार पाहणाऱ्या नाना फडणवीसांनी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवत होळकर, शिंदे, नागपूरकर भोसले या सगळ्यांना एकत्र आणलं होतं. पुणे दरबारच्या सैन्याच्या वेगवेगळया तुकडया केल्या गेल्या. हरिपंत फडके, रामचंद्र गणेश, बाजीपंत बर्वे, तुकोजी होळकर वगैरे  सर्व सरदार आपापल्या सैन्यानिशी तळेगांवापासून बोरघाटापर्यंत माऱ्याच्या जागा रोखून युध्दास सिध्द होते. महादजी शिंदे त्यांचं नेतृत्व करत होते.

पहिल्या इंग्रज-मराठा युद्धास प्रारंभ झाला. इकडे मराठयांचे सैन्य व तोफखाना शत्रूंशी तोड देण्याकरिता खंडाळयाच्या आजूबाजूस येऊन माऱ्याच्या जागा रोखून युध्दास सिध्द झाले होते. मराठयांच्या तोफखान्याचा मुख्य सेनापती होता भिवराव पानसे.

मराठा तुकडीमध्ये नरोन्हा नांवाचा एक फिरंगी गोलदाज होता. तो तोफा डागण्यामध्ये अतिशय कुशल होता. त्याने शत्रूंवर तोफांचा व बाणांचा असा मारा केला की, प्रत्येक खेपेस शत्रूंचा नामांकित शिपाई नेमका गोळयाखाली सापडत असे. शिवाय महादजी शिंदेंच्या खास तुकड्यानी गनिमी काव्याने घाटातील जंगलात  ब्रिटीशांना परेशान करून सोडले होते.

आपल्या मोठमोठ्या तोफा आणि शस्त्रास्त्रे घेऊन घाट उतरणे अवघड आहे हे इंग्रजांच्या लक्षात आले. अखेर नको असलेले सामान जाळून इंग्रजी सेना घाट उतरली व वेगाने पुण्याच्या दिशेने निघाली. अखेर मावळातील तळेगाव वडगाव येथे इंग्रज मराठा सेना आमनेसामने आली.

हीच ती सुप्रसिद्ध वडगावची लढाई.

या युद्धात साहेबी सैन्याला मराठ्यांच्या सैन्याने चांगलेच थोपटून काढले. कंपनी सरकारचा युनियन जॅक डळमळायला लागला. मराठ्यांच्या जोरदार माऱ्यामुळे इंग्रजांच्या सैन्याने वडगावचा रस्ता धरला. 

मराठ्यांनी मग अक्षरशः इंग्रजी सैन्याला कुबकलं. इंग्रजी घमेंड तळेगाव वडगावच्या मातीत पार चिरडून गेली. इंग्रजांचा सपशेल पराभव झाला.

त्यांच्या पुणे जिंकायचं आणि शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकवायचा ह्या स्वप्नाचा देखील पार चुराडा झाला. राघोबादादा मराठ्यांचे कैदी बनले. 

तिकडे सातासमुद्रापार असलेल्या इंग्लंड मधील सरकारमध्ये अस्वस्थता उडाली. मुत्सदेगिरीत आणि युद्धात निपुण असे इंग्रज लोक भारतातील अडाणी, अशिक्षित मराठ्याकडून झोडपले गेले ! हे कसे घडले, ह्या पराभवाची कारणे द्या. अशा नोटिसा इंग्रज सरकारने भारतातील इंग्रजांवर बजावल्या.

टोपीकरांनी कारण शोधलं की इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीने आपली इंग्रजी हत्यारे मराठ्यांना विकली अन् तीच हत्यारे, तोफा, दारुगोळा मराठ्यांनी इंग्रजावर वापरला होता. त्यांच्याच हत्यारांनी त्यांना झोडपून काढले होते.

अशी कारणमीमांसा कंळताच इंग्लंडमधे मोठी खळबळ माजली. सगळे गोरे लोक ईस्ट इंडिया कंपनीवर रागाने आग पाखडू लागले ! कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाची बैठक झाली. या बोर्डाने अधिकाऱ्यांना जाब विचारला, 

“तुम्ही मराठ्यांना आपली शस्त्रे का विकली ? अन् का विकता ?”

तेव्हा भारतातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंग्लंडला जबाब दिला,

आम्ही मराठ्यांना आपली शस्त्रास्त्रे विकली व विकतो. परंतु ती सर्व शस्त्रास्त्रे हिणकस अशी कमी पल्ल्याची जुनी शस्त्रास्त्रे असतात. तसं जर केलं नाही तर तथील मराठे जे अत्यंत बुद्धिमान व कुशल कारागीर आहेत. ते नवी शस्त्रे तयार करतील व आम्हावर उलटतील तेव्हा त्यांना आपली फुकट गेलेली अशी जुनी शस्त्रास्त्रे विकणे हेच फायद्याचे आहे.

वडगावच्या लढाईत आपला पराभव झाला आहे परंतु तो एक दैवी योगायोग समजावा. इथले लोक हुशार अन् कुशल आहेत परतु त्यानी अजून स्वत:ला ओळखले नाही. एवढ्या तेवढ्यावरून आपल्या भाऊबंदांशी भांडण्यात, त्यांच्याशी जन्माचे वैर साधण्यात, त्यांचा हात पृथ्वीवर कोणीही धरू शकणार नाही. भाईबंदांशी असलेले वैर हे पिढ्यान्पिढ्या चालत असते. तेव्हा त्यांना मिजाशीत, आळसात व अज्ञानात ठेवून त्यांच्यात फंदफितुरी करूनच आपला कार्यभाग साधेल.

इंग्रजांचे शब्द खरे ठरले आणि तिथून पुढे तब्बल दीडशे वर्षे पर्यंत इंग्रजांच्या सत्तेचा सूर्य भारताच्या भूमीवर मावळला नाही !”

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.