फक्त भरतनाट्यम शिकण्यासाठी वहिदा रेहमाननं जन्मकुंडली बनवून घेतलेली

कलावंतांच्या आयुष्यात काही विलक्षण घटना घडतात ज्यामुळे त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळते. वहिदा रहमान या अभिनेत्रीला खरंतर डॉक्टर व्हायचं होतं पण शाळेत असतानाच ती खूप आजारी पडली आणि अभ्यासात तिची पीछेहाट होऊ लागली त्यामुळे तिने डॉक्टर होण्याचा नाद सोडला.

दुसरं म्हणजे वहिदाला चांगले नर्तक देखील व्हायचे होते. त्यामुळे तिने आपल्या वडिलांकडे आपल्याला चांगल्या नृत्य शाळेमध्ये दाखल करण्याची विनंती केली. वहिदा रहमानचे वडील पुरोगामी विचारांचे होते. ब्रिटीश सरकारच्या काळातील ते उच्च पदस्थ अधिकारी होते. त्यांनी मुलीची ही विनंती मान्य केली आणि नृत्य गुरूचा शोध सुरू केला. 

त्या काळात टि एम सुंदरम पिल्लई नावाचे विख्यात भरतनाट्यम गुरु होते. 

त्यांचं संपूर्ण देशभर मोठं नाव होतं. वहिदाला घेऊन ते गुरुजींकडे गेले. गुरुजींनी वहिदाची विचारपूस केली. तिचे नाव विचारले. त्यानंतर त्यांनी वहिदाच्या वडिलांना सांगितले,” मी हिला भरतनाट्यम शिकवू शकणार नाही!” रहमान साहेबांना खूप आश्चर्य वाटले. त्यांनी त्याचे कारण विचारल्यावर ते आणखीनच चकित झाले. 

कारण गुरुजी म्हणाले ,”तुम्ही मुस्लिम आहात!” यावर रहमान साहेब आणि वहिदाचे म्हणणे होते,” कलेचा आणि धर्माचा संबंधच काय?” त्यावर गुरुजी म्हणाले भरत नाट्यम मध्ये ईश्वरावर श्रद्धा असणे खूप आवश्यक आहे. यातील शिवमुद्रा ,हस्त मुद्रा, पद्म, वरणमाला ह्या गोष्टी फक्त हिंदू मुली करू शकतात. वहिदा हे करू शकणार नाही. त्यामुळे मी तिला शिष्य बनवू शकत नाही!”

गुरुजींचे उत्तर ऐकून वहिदाला खूप वाईट वाटले. परंतु तिने हार मानली नाही. ती सातत्याने गुरुजींना भेटत राहिली. आणि पटवून देत राहिली की ,”तुम्ही सांगाल ते सर्व शिकायला मी तयार आहे. परंतु गुरु म्हणून मला तुम्हीच हवे आहात!”

तब्बल चार महिन्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. गुरुजींनी वहिदाला आणि तिच्या वडिलांना पुन्हा एकदा बोलवले आणि सांगितले ,” मला उद्या हिची जन्म कुंडली आणून द्या!” त्यावर वहिदाचे वडील म्हणाले ,” गुरुजी आम्ही मुस्लिम आहोत. आम्ही तिची कुंडली बनवलेली नाही.” पुन्हा प्रश्न निर्माण झाला.

गुरुजी म्हणाले, “ठीक आहे. तुम्ही मला हिची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण मला द्या. मी तिची कुंडली बनवून घेतो.” वडिलांनी तात्काळ संपूर्ण माहिती गुरुजींना दिली. गुरुजींनी त्यांच्या एका मित्राकडून वहिदाची कुंडली बनवून घेतली. कुंडलीचा अभ्यास केल्यानंतर गुरुजींना खूप आश्चर्य वाटले! कारण या पत्रिकेमध्ये तिच्या कलागुणांचा संदर्भ दिसत होता आणि ही मुलगी कलेच्या क्षेत्रामध्ये खूप पुढे जाईल हे देखील स्पष्टपणे त्या कुंडलीत जाणवत होते!

गुरुजींनी खूप आनंदाने वहिदाला नृत्य शिकवण्याची जबाबदारी घेतली.

रहमान साहेबांना देखील खूप आनंद वाटला. ते म्हणाले,” कदाचित वहीदाच्या नशिबात तुमच्यासारखा गुरु लिहिला असेल म्हणून एवढी यातायात करावी लागली.” पुढे वहिदा गुरुजींकडे भरतनाट्यम शिकायला येऊ लागली. कठोर परिश्रम घेतले.

आता लढाई आर पार ची होती. इथे तिला सक्सेसफुल व्हायचेच होते. तिच्या मनात प्रचंड जिद्द होती. काही महिन्यातच तिने ती कला पारंगत केली. पुढे गुरुजींच्या आशीर्वादाने तिने अरंगेतरम चा देखील कार्यक्रम केला. पुढे जगभर वहिदाचे भरतनाट्यम गाजले. चित्रपटातून देखील वहिदा या नृत्याद्वारे रसिकांच्या मनात भरली. 

पिया तोसे नैना लागे रे, मोसे छल किये जा (गाईड), नदी ना रे न जाओ शं पैय्या पडू (मुझे जिने दो) पान खाओ सैय्या हमार (तिसरी कसम) हि तिची गाणी लगेच नजरेसमोर येतात. एकूणच वहिदाच्या आयुष्यात कलाक्षेत्रातील घवघवीत यश तिला यशो शिखरावर घेवून गेले. तिच्या नृत्य गुरुजींना देखील वहिदा इतकी लोकप्रिय शिष्या दुसरी मिळाली नाही.

केवळ धर्माच्या आधारावर शिक्षण द्यायला नकार देणाऱ्या गुरुजींना देखील अखेर हार मानावे लागली. हा किस्सा स्वत: वहिदाने कलर्स वाहिनी वरील डान्स दिवाने च्या सेट वर सांगितला होता. त्या वेळी वहिदा समवेत हेलन, आशा पारेख आणि माधुरी दीक्षित उपस्थित होत्या.

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.