ते म्हणाले घरी भोजन आहे, पत्रकार जेवायला गेले तेव्हा कळालं भजन ऐकायला बोलवलं आहे
जेवणाचं आमंत्रण कोणाला आवडत नाही?
त्यातही आम्ही पत्रकार तर कधीच कोणाच्या जेवणाला नाही म्हणत नाही.
दिल्लीमध्ये लाडाने ज्यांना प्रणबदा म्हटलं जात असे प्रणव मुखर्जी म्हणजे एकदम कडक शिस्तीचा माणूस. राष्ट्रपती होण्याच्या आधी सुद्धा त्यांच्या छडीला भलेभले घाबरायचे. प्रणबदानां कधी राग येईल हे सांगता येत नाही. पत्रकार तरी प्रणबदापासून चार हात लांबच असतात. त्यांच्या या अतरंगी स्वभावाचा असाच एक किस्सा.
गोष्ट ऐंशीच्या दशकातली आहे.
तेव्हा तर प्रणबदा तरुण तडफदार नेते होते. इंदिरा गांधींच्या पाश्चात चिरंजीव राजीव गांधी सत्तेच्या मुख्यस्थानी आली होते. अशा वेळी पंतप्रधानपदी तुमच्याहून सरस व्यक्ती मीच आहे हे सांगण्याच धाडस एकट्या प्रणब मुखर्जी यांच्यात होतं.
या गोष्टींचा अंदाज आल्याने प्रणबदाना राजकारणातून साईड लाईनला टाकण्यात आलं. संसदभवनाच्या सेन्ट्रल हाॅल मध्ये ते बऱ्याचदा पाईप ओढत बसलेले दिसत, पण त्यांच्यातील राजकीय धुगधुगी कमी झाली नव्हती.
एकदा त्यांनी दिल्ली मधल्या काही प्रमुख पत्रकारांना आपल्या घरी भोजनाला बोलावले. कधी नव्हे ते प्रणबदानी घरी जेवायला बोलावले म्हणून पत्रकारांच्या मनात रसगुल्ले फुटले.
आता खमंग बंगाली मिठाई सोबत काही तरी खुसखुशीत ऐकायला मिळणार असं सगळ्यांना वाटलं.
संध्याकाळी आवरून सगळी पत्रकार मंडळी प्रणबदाच्या दिल्लीतल्या घराच्या बाहेर जमली. आत काही तरी आवाज येत होते. आता उशीर झाला म्हणून प्रणबदा चिडायला नकोत म्हणून सगळे गडबडीत गेट मधून आत शिरले. तसही संदेश रसगुल्लाच्या आठवणीने पोटात कावळे कोकलत होतेच.
आत गेल्यावर मात्र सगळ्या पत्रकारांचे चेहरे खाड करून उतरले. प्रणब मुखर्जीच्या घरात भजनाचा कार्यक्रम होता. त्यांनी पत्रकारांना भोजनासाठी नव्हे तर भजनासाठी बोलावले होते. त्यांच्या बंगाली धाटणीच्या हिंदीमुळे सगळा गोंधळ झाला होता.
आता काही पर्याय नसल्यामुळे “भूखे भजन होय गोपाला” करत भजनामध्ये सगळे पत्रकार सामील झाले.
थोड्याच वेळात एकएक करून तिथून सटकले. महाप्रसाद खायला गेल्यानंतर नुसता गुलाल उधळुन यायला लागल्यावर आपलं कस होईल तस या पत्रकारांच झालं. ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची झाली.
प्रणबदाच्या भजनाने अख्ख्या दिल्लीच्या पत्रकारांना उपवास घडवला.
हे ही वाच भिडू.
- रवींद्रनाथ टागोरांचं ‘पहिलं प्रेम’असणारी ती मराठी मुलगी कोण होती ?
- ही तर प्रणव मुखर्जींची पंतप्रधान होण्याची खेळी ?
- रसगुल्ल्यावरील बंदीमुळे या मुख्यमंत्र्यांचं सरकार गेलं होतं !
- स्वातंत्र्यलढ्यात तोफेच्या तोंडी गेलेले देशातील पहिले पत्रकार.