४९ जणांच्या मृत्यूला कारण ठरलेलं बार्ज नेमकं काय असतं? त्यादिवशी काय झालं?

तौक्ते चक्रीवादळाचा वेग सध्या कमी झाला आहे, पण मागं नुकसानीचा जो खड्डा खणून ठेवला आहे तो भरताना पुढचे अनेक दिवस जातील यात शंका नाही. हजारो घरांचं, शेकडो हेक्टर वरच्या शेतीचं नुकसान हे तर आहेचं पण त्यासोबत गेलेल्या अनेक जिवांचं नुकसान भरून न येणार आहे.

असचं एक जीवांचं न भरुन येणार नुकसान म्हणजे बार्ज ३०५ या जहाजेवरील गेलेल्या तब्बल ४९ जीवांचं. त्यात अजून ही जवळपास २६ जण बेपत्ता आहेत. 

या वादळादरम्यान मुंबईपासून १७५ किलोमीटर आत समुद्रात अडकलेल्या ४ जहाजांवरील ७१३ पैकी ६२० जणांना वाचवण्यात नौदलाला यश आलं होतं. यात बार्ज पी-३०५ मध्ये अडकलेल्या २७३ पैकी वाचवलेल्या १८६ जणांचा समावेश आहे. उर्वरितमध्ये ४९ जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर २६ जणांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न अजूनही सुरु आहेत.

पण या सगळ्या घडामोडींदरम्यान हे नक्कीच जाणून घ्यायला हवं कि हे बार्ज म्हणजे नक्की काय असते? सामान्य जहाजांपेक्षा वेगळं असते का? त्यावर शेकडो जण कशी अडकली? इशारा देऊन  देखील त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं का? याला जबाबदार कोण? याच सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण बघणार आहोत.

बार्ज हा प्रकार काय असतो? आणि ते सामान्य जहाजांपेक्षा वेगळं असतं का?

बार्ज म्हणजे एक सपाट पृष्ठभाग असलेली नाव असते. जी प्रामुख्यानं नदी आणि समुद्रामध्ये माल वाहतुकीसाठी बनवलेलं असती. जे मोठं मोठे कन्टेनर्स, इतर अवजड वस्तू, बल्क स्टोक अशांची वाहतूक केली जात असते. बार्जचा फायदा म्हणजे इतर कोणत्याही वाहतुकीपेक्षा माल वाहतुकीचा हा सर्वात स्वस्त पर्याय असतो.

हे बार्ज बॉम्बे हायमध्ये कसे?

अरबी समुद्रामध्ये बॉम्बे हाय हे एक तेल क्षेत्र कार्यरत आहे. याच नियंत्रण आणि नियमन हे सगळं सरकारची तेल कंपनी ‘ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन’ अर्थात ओएनजीसी द्वारे केलं जातं. आता या बार्जचा बॉम्बे हायशी संबंध सांगायचा तर बार्ज पी-३०५ हे ओएनजीसीच्या अनेक ऑईल रिगवर काम करणाऱ्या लोकांना राहण्यासाठी क्वार्टरच्या रूपात वापरलं जात होतं.

बॉम्बे हाय तेल क्षेत्रांत अशी इतर बार्ज देखील असतात आणि बऱ्यापैकी सगळे बार्ज हे विनाइंजिन वाले असतात. त्यांना एका टगबोटीच्या सहाय्यानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवलं जातं. त्यापूर्वी त्यांना ऑईल रिगला बांधून ठेवण्यात येतं. या बार्जला देखील बांधून ठेवण्यात आलं होतं.

मग या वादळात प्रशासनानं इशारा दिला होता का?

हे चक्रीवादळ अचानक आलं असं देखील झालेलं नाही. येण्यापूर्वी सगळ्यांना इशारा देण्यात आला होता, त्यानुसार तयारी केली गेली, अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. एनडीआरएफने प्रत्येक राज्यांसाठी पथक देखील पाठवली होती.

सोबतच तटरक्षक दलाने मागच्या बुधवारी नाविक, इतर नौका आणि किनाऱ्यावरील मासेमार यांना इशारा दिला होता. आयसीजीचे प्रवक्ते, कमांडेंट आर.के सिंह यांनी सांगितलं कि, तटरक्षक दलानं पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्र, गोवा, गुजरात, लक्षद्वीप, केरळ, इथल्या नाविक आणि मासेमाऱ्यांना खराब हवामान आणि चक्रीवादळ यामुळे जवळच्या बंदरावर आश्रय घेण्यास सांगितलं होतं. 

मग इशारा देऊन देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं कि झालं?

हे चक्रीवादळ येण्यापूर्वी समुद्रात चार बार्ज होते. यातील शेकडो श्रमिकांसोबत समुद्राच्या उसळत्या लाटांवर हेलकावे खाणाऱ्या इतर तीन बार्जनं संकटकालीन SOS मॅसेज पाठवून मदत मागितली.

तर यातील पी-३०५ हे बार्ज तेल क्षेत्राजवळ एका प्लॅटफॉर्मला (ऑईल रिग) बांधून ठेवण्यात आलं होतं. या बार्जचे चीफ इंजीनियर रहमान शेख यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही चक्रीवादळाच्या इशाऱ्याला गांभीर्यतेनं घेतलं असतं कदाचित सगळ्यांचा जीव वाचला असता.

४८ वर्षीय रहमान यांनी इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं कि,

वादळाच्या आठवडाभर आधी आम्हाला सूचना मिळाली होती. जवळपासच्या सगळे बार्ज माघारी फिरले होते. मी कॅप्टन बलविंदर सिंह यांना सांगितलं कि बंदरावर माघारी जावू. पण त्यावर ते म्हणाले, ४० किलोमीटर प्रतिसापेक्षा जास्त वेगानं वारं वाहणार नाही. सोबतच वादळ एक ते २ तासात मुंबईवरून पुढे सरकेल.

पण आमचा अंदाज चुकला. जवळपास १०० किलोमीटर प्रतितासापेक्षा जास्त वेगानं वारं वाहत होतं. आमचे ५ अँकर तुटले होते. ते वादळाचा सामना करु शकत नव्हते.

जेव्हा वादळ आलं तेव्हा बार्ज पी-३०५ वर २६१ लोक उपस्थित होते. त्यानंतर चीफ इंजिनियर रहमान शेख यांच्या सांगण्यानुसार, आम्ही पी-३०५ च्या टगबोटीला SOS मॅसेज पाठवला होता, पण बहुदा त्या बोटीच्या मालकांनी बघितला नसावा.

आम्ही नेव्हीच्या काही जहाजांना आमच्याकडे येताना बघितलं पण त्यापूर्वीच हे बार्ज एका ऑईल रिगला धडकलं आणि एक मोठं छिद्र पडून त्यात पाणी भरण्यास सुरुवात झाली. बार्ज वर असलेल्या लोकांनी लाइफ राफ्ट्सची मदत घेण्याचा प्रयत्न केला, पण १६ पैकी १४ लाइफ राफ्ट्स खराब होत्या.

ज्यांनी लाईफ जॅकेट्स घातलं होतं त्यांना समुद्रात उतरण्यास सांगितलं, त्यामुळे वाचणारे त्यांना तात्काळ बघू शकतील, आणि वाचवतील. रहमान पुढे सांगतात, सोमवारी संध्याकाळी ५ वाजता बार्ज पाण्यात बुडालं. त्यानंतर बुधवार १९ मे रोजी २२ मृतदेह बाहेर काढण्यात आले. जवळपास ५० लोक बेपत्ता होते. मी देखील जवळून मृत्यू बघितला पण, अल्लाहच्या कृपेनं वाचलो.

याला जबाबदार कोण?

जिथे हे जहाज होतं, तो संपूर्ण प्रकल्प ओएनजीसीचा आहे. मात्र ओएनजीसीनं या प्रकल्पाचं कंत्राट AFCONS या कंपनीला दिलं आहे, जी शापूरजी पालनजी ग्रुपमधली कंपनी आहे. AFCONS नं हे जहाज ड्युरामास्ट या कंपनीकडून चार्टर केलेलं होतं.

पण तज्ज्ञांच्या मते, मुख्य कंत्राटदार म्हणून प्राथमिक जबाबदारी ओएनजीसीला जबाबदारी नाकारता येणार नाही. सोबतच बार्जची जबाबदारी असणाऱ्या AFCONS आणि मालकी असणाऱ्या डरमॅस्ट कंपनीच्या मालकांनी वेळेवर योग्य उपाययोजना करुन कामगारांचे जीव वाचवणं अपेक्षित होतं.

सध्या या दुर्घटनेसंदर्भात पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी चौकशी समिती नेमली आहे, त्यामुळे चौकशीतून लवकरचं नक्की जबाबदार कोण हे पुढे येईल.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.