योगींना सांगा, “तुमचं युपी,बिहार दाखवायचं झालं तरी वाईतच यावं लागतं”

गंगाजल आपल्यापैकी प्रत्येकाने पाहिलाय. बिहारच्या भागलपूरचे आंख फुडवा कांड या सत्यघटनेवर आधारित सिनेमा. अजय देवगणचा दबंग एसपी, गुंडांच्या डोळ्यात ऍसिड टाकून तेजपूर को पवित्र कर देंगे म्हणणारा बच्चा यादव आणि त्याची टीम बिहारच्या बाहुबलींची चड्डी ओली करायला लावते हे पडद्यावर बघायला भारी वाटतं.

पण गंमतीची गोष्ट ही की हा सिनेमा बनवणाऱ्या प्रकाश झा याला इच्छा असूनही बिहार मध्ये शूटिंग करायला जमलं नव्हतं.

बिहार म्हणजे भारतातलं सर्वात मागासलेलं राज्य. गंगेच्या वाहत्या स्पर्शाने संपन्न असलेला हा भाग मात्र राजकारण, गुंडगिरी, जातीयवाद याच्यात अडकून पडून जंगलराज बनला. अजूनही बिहारमध्ये असे काही भाग आहेत जिथे सरकारचा नाही तर तिथल्या बाहुबलीचा आदेश चालतो. पोलिसांना देखील तिथे पाय ठेवायला भीती वाटते.

अशावेळी या बाहुबलीच्या गुंडगिरीवर, त्यांच्या डोळ्यात ऍसिड टाकण्याच्या घटनेवर बनवलेला सिनेमा ते का सहन करतील? शूटिंग सुरक्षितपणे व्हावी म्हणून प्रकाश झा यांनी स्वतः बिहारचे असूनही सिनेमा महाराष्ट्रात तेही वाई येथे शूटिंग करायचे ठरवले.

वाईच का?

सह्याद्रीच्या कुशीत महाबळेश्वर, पाचगणीच्या पायथ्याशी कृष्णामाईच्या तिरी वसलेल्या नितांत सुंदर वाईचा इतिहास महाभारता एवढा मोठा जुना आहे. स्कन्दपुराणात वैराजक्षेत्र म्हणून उल्लेख आलेल्या वाईची ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांत गणना होते. स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानाची छावणी येथेच पडली होती.

शिवशंभूच्या पराक्रमाने पावन झालेली ही भूमी.   

छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपतींची गादी साताऱ्याला आणल्यापासून या गावचा विकास झाला. बाजीराव पेशव्याचे व्याही सावकार भिकाजी रस्ते यांनी कृष्णाकाठावर अनेक फरसबंद घाट बांधले. उमामहेश्वर (पंचायतन), महागणपती, काशीविश्वेश्वर, गोविंद-रामेश्वर, विष्णू, लक्ष्मी, भद्रेश्वर, केदारेश्वर, इ. सुरेख मंदिरे उभारली, वाडे बांधले आणि किवरा ओढ्यावर छोटी धरणे बांधून बागायतीस उत्तेजन दिले व पिण्याच्या पाण्याची योजना केली.

निसर्गाचा आशीर्वाद लाभलेली वाई संपन्न झाली. खुद्द पेशव्याचे कारभारी नाना फडणवीस यांचा देखील वाडा मेणवली येथे उभारला आहे. इथले मेणेश्वराचे मंदिर, पोर्तुगीजांची घण्टा, कृष्णाघाट हे तर विशेषतः प्रेक्षणीय आहे. स्वदेस सारख्या अनेक सिनेमाचं शूटिंग इथेच झालं आहे.

गंगाजल-स्वदेस या सिनेमाच्या शूटिंगनंतर वाई विशेषतः चर्चेत आली. मात्र इथल्या शुटिंगचा इतिहास देखील खूप जुना आहे.

असं म्हणतात की मदर इंडिया या सिनेमापासून वाई हिंदी सिनेमासृष्टीच्या डोळ्यासमोर आले. उत्तर भारतातील एक शेतकरी कुटूंब, त्यांना छळणारा सावकार, बदल्याच्या आगीत दरोडेखोर झालेला मुलगा ही या सिनेमाची स्टोरी होती. पण याच्या फिल्मिंगसाठी दिग्दर्शक मेहबूब खान आपले सगळे युनिट घेऊन युपीला गेले होते.

काही दिवस शूटिंग झाले आणि गंगा नदीला प्रचंड मोठा पूर आला. याचा खूप मोठा फटका सिनेमाच्या प्रोडक्शनला बसला. कलाकारांची सॅलरी, शूटिंगचा वाढत खर्च यामुळे सिनेमाचे बजेट २५ लाखावरून ६० लाखाला पोहचले. मेहबूब खान यांनी परत मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. काही इनडोअर सिनचं शूटिंग मेहबूब स्टुडिओमध्ये झालं.

तर आऊट डोअरसाठी कोणी तरी मेहबूब खान यांना वाईला जाण्याचा सल्ला दिला.

वाईचे सुंदर घाट, तिथले लोकेशन यांना पाहून मेहबूब खान यांना गंगेवरचे घाट आठवले. त्यांनी बऱ्याच सीनचे वाईमध्ये शूटिंग केले. काही सीन गुजरातमधल्या खेड्यात देखील झाले. एका पूर आलेल्या सीन साठी तर शेतकऱ्यांनी ५०० एकर शेत मेहबूब खान यांना देऊन टाकले.

मदर इंडियापुर्वी अनेकदा महाबळेश्वर, पाचगणी येथे शुटिंग होत होतं पण त्यानंतर वाई देखील फिल्ममेकर्सचं हक्काचं ठिकाण बनलं. फक्त मराठी सिनेमाचं नाही तर हिंदी सिनेमावाले या भागात हमखास दिसू लागले.

मुंबईपासून जवळ अंतर, गर्दी नाही, शुटिंगला त्रास देणारी गुंडगिरी नाही उलट मदत करणारे उद्यमशील गावकरी यामुळे वाईकडे अनेक निर्माते दिग्दर्शक आकर्षित झाले.

सिनेमावाल्यांना जे मुंबईत मिळत नाही आणि कृत्रिम पद्धतीने तयार पण करता येत नाही ते वाईत निसर्गत: उपलब्ध आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगा, शंभरहून अधिक हेमाडपंथी देवळं, सुंदर बांधलेले आणि उत्तम रखरखाव असलेले नदीवरचे घाट, अगदी उन्हाळ्यात पण वाहती असणारी कृष्णामाई, जंगल, दुतर्फा झाडी असलेले नागमोडी रस्ते, विशेष कॅरेक्टर असलेली गावं आणि गावातली खास सात्तारी कॅरेक्टर्स. आणि हे सगळं मुंबईपासून सोयीच्या अंतरावर.

प्रकाश झा तर मृत्युदंड या सिनेमापासून वाईच्या प्रेमातच पडले. त्यांचा प्रत्येक सिनेमा इथेच बनतो. ते आता गावकऱ्यांना नावानिशी ओळखतात. एक अकृत्रिम बंध त्यांच्यात निर्माण झाला आहे. 

राम तेरी गंगा मैली बनवणाऱ्या राज कपूर यांच्या पासून ते ओंकारा बनवणारे विशाल भारद्वाज, बोलबच्चन वाला रोहित शेट्टी, स्वदेस वाले आशुतोष गोवारीकर, दबंग वाला अरबाज खान अशा कित्येकांना इथल्या लोकेशनने भुरळ घातली. फक्त उत्तरभारतीय गाव म्हणूनच नाही तर तानाजी, बाजीराव मस्तानी अशा ऐतिहासिक सिनेमाचं शूटिंग देखील वाईला झालंय.

इथल्या गावकऱ्यांचा दुसरा व्यवसाय आता शूटिंग झालाय. 

वाईच्या रक्तात आता सिनेमा भिनलाय. शाहरुख घाटावर कुठे बसला होता इथं पासून ते राज कपूर आपल्या हिरोईनला सिन कसे समजावून सांगायचे हे सगळं तिथल्या लोकांना तोंडपाठ आहे. इथल्या एका खवट आज्जीबाईनी जात्याच्या सीन साठी एका दिग्दर्शकाला कस रडवलं आणि दहा हजार रुपये कमवले याच्या स्टोरी तिथले लोक रंगवून रंगवून सांगताना दिसतात.

गर्दीत काम करणारे वाईचे कित्येक स्थानिक कलाकार आता मुख्य भूमिकेकडे वाटचाल करताना दिसत आहेत.

आजही अनेकदा हिंदी सिनेमात उत्तर भारतातल्या स्टोरी असतात. गोपट्ट्यात वसलेल्या युपी बिहार झारखंड येथे जन्मलेले दिगदर्शक देखील तिथे जाऊन शूटिंग करायला धजावत नाहीत. यासगळ्यांसाठी हक्काची जागा म्हणजे वाई.

कधी कधी गंमतीने लोक असंही म्हणतात की बिहार मधला गुंडाराज कमी झाला नाही तर उद्या भोजपुरी सिनेमाचं शूटिंग देखील वाईला सुरु होईल.

गेल्या काही वर्षांपासून  वाईच्या शिकल्या सावरलेल्या तरुणांनी या नव्या संधीचं रुपांतर व्यवसायात केलं आहे. शूटिंगसाठी लोकेशन मिळवून देणं आणि स्थानिक स्तरावर हवी ती मदत मिळवून देण्याची ‘एक खिडकी योजना’ त्यांनी सुरु केली. त्यांनी इतकं चांगलं काम केलं की मुंबईच्या शुटींगवाल्यांची खूप मोठी सोय झाली.

स्थानिक लाइन प्रोड्युसर पोरांची मोठी फळी वाई परिसरात उभी राहिली. त्यातून अनेकांना रोजगार मिळाले. काही जणांनी अत्यंत हुशारीनं गावातली वर्गणीमुळे अडलेली अनेक कामं या शुटींगवाल्यांकडून करवून घेतली. त्यांनी स्वत: पण पैसे कमवले आणि गावालाही कमावून दिले.

आता गरज आहे सरकारने पुढाकार घेण्याची.

मुंबईनंतर वाई कोल्हापूर अशा ठिकाणी चित्रनगरी उभा केली तर स्थानिकांना हक्काचे रोजगार मिळतील.  मध्यंतरी लॉकडाऊनमुळे वाईच शुटिंग थांबलं होतं मात्र आता काही महिन्यापासून सिरीयल आणि सिनेमे यांचं लाईट कॅमेरा ऍक्शन हे नेहमीचे बोल वाईच्या घाटावर ऐकायला मिळू लागले आहेत.    

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.