‘वेटर होण्याची लायकी नाही’ ऐकलेल्या पोरानं ३० देशात हॉटेल्सचं साम्राज्य उभं केलं….

माणसाचा अपमान झाला की तो तीन गोष्टी करतो. एक तर नैराश्यग्रस्त होतो, दुसरी गोष्ट म्हणजे पेटून उठतो आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ग्रँड असं काही तरी करून दाखवतो. या दोन्हीत न बसणारे ‘या कानानं ऐकतो आणि त्या कानानं सोडून देतो. पण यातील यशस्वी अशी ज्यांना ओळख मिळते ते असतात दुसऱ्या प्रकारातील.

असाच दुसऱ्या प्रकारात बसणारा एक १५ वर्षीय पोरगा ज्यानं एका अपमानाचा बदला म्हणून जगभरातील ३० देशांमध्ये हॉटेल्सच साम्राज्य उभं केलं होतं.

त्याचं नाव म्हणजे सेजार रित्झ

साधारण १८६५ च्या काळात स्वित्झर्लंडच्या ब्रिग शहरात १५ वर्षाचा सेजार एका हॉटेलमध्ये वाईन वेटर म्हणून काम करत होता. घरची परिस्थिती तशी बेताची. १३ भावंडांच्या सगळ्यात लहान असलेला सेजार आपल्या कामात काहीसा चंचल स्वभावाचा होता. त्यामुळे वरच्या वर त्याच्याकडून चुका देखील होत असायच्या.

पण अखेरीस तो दिवस उजाडलाच. एका ग्राहकाची ऑर्डर व्यवस्थित पूर्ण न करू शकल्यानं हॉटेलचे मालक चांगलेच चिडले. सेजारला समोर उभं केलं आणि सरळ सांगून टाकलं,

मूर्खा निघून जा इथून, तुला आताच्या आता कामावर काढून टाकलं जातं आहे. एका पाठोपाठ एक चुका, खूप झालं. तुला अनेकदा समजावलं. पण तुझं काहींचं होऊ शकतं नाही. तू या हॉटेलसाठी काय कोणत्याच हॉटेलसाठी बनलेला नाहीस. तुझी लायकी नाही वेटर होण्याची. परत इथं तोंड दाखवू नकोस.

वाढत वय, आणि झालेल्या अपमानामुळे सेजारच्या मनाला चांगलीच ठेच पोहचली होती. ती गोष्ट विसरण्याचा प्रयत्न केला पण तो विसरू शकला नाही. शिक्षण देखील तितकंसं झालं नव्हतं कि एक नोकरी गेल्यानंतर दुसरी मिळेल. ज्या चर्चमधून थोडं फार शिक्षण झालं होत तिथंच पुन्हा सेवा करण्यासाठी पोहचला. पण किती झालं तरी तो अपमान विसरू शकला नाही.

गावी जाऊन शेती करण्याचा विचार मनात घोळत होता, पण ते देखील शक्य नव्हतं. हळू हळू लक्षात यायला लागलं की मेहनत केल्याशिवाय आयुष्य पुढं सरकणं अवघड आहे. त्यानं आपल्या एका एका चुकांवर लक्ष द्यायला सुरुवात केली. कधी हटकलं होतं, कधी कौतुक केलं होतं सगळ्याचा विचार सुरु झाला. 

मनात विचार यायचा की एक अशी नोकरी मिळवायची की जिथून कोण काढू शकणार नाही. कामकाजाच्या हिशोबात कोणतेही डाग नसले पाहिजेत. अखेरीस जवळपास वर्षभर वनवास्यासारखं आयुष्य जगल्यानंतर सेजारनं ठरवलं ज्या हॉटेल उद्योगातून अपमानित करून काढलं आहे त्यातच स्वतःला सिद्ध करून दाखवायच.

१८६७ साली त्याला पॅरिसमधील एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाबद्दल समजलं. जगभरातुन पाहुणे तिथं येणार म्हणजे हॉटेल, रेस्टोरंटची गरज पडणार, १६-१७ वर्षाचा तो पोरगा आपलं गाव आणि देश सोडून स्वतःला सिद्ध करण्यासाठी नवा देश फ्रांसमध्ये येऊन दाखल झाला. पॅरिसच्या एका हॉटेलात सहायक वेटर बनला.

नवीन आयुष्य मिळालं, यात त्यानं एक तत्व पाळलं की, सेवा अशी करा की एक तरी अनमोल असं स्मित हास्य मिळेल. ग्राहकाला पटवून द्यायचं की तो माझ्यासाठी किती खास आहे. त्याच्या प्रत्येक गरजेला वेळेआधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतं होता. अनेक हॉटेलमध्ये काम करून या क्षेत्रातील बारीक-बारीक गोष्टी त्याने आत्मसाद करून घेतल्या. अनुभव घेतले.

त्यातूनच तो पुढे जात राहिला आणि १८७३ साली वेटरवरून एका हॉटेलचा मॅनेजर बनला. पुढच्या चार वर्षाच्या काळात सेजारनं आणखी ३ हॉटेल्समध्ये मॅनेजर म्हणून काम शिकून घेतलं.  

एवढ्यावरच तो थांबला नाही. तत्कालीन सुप्रसिद्ध शेफ अगस्ते स्कोफेयर याला मित्र बनवले. यानंतर १८८८ पासून ठिकठिकाणी हॉटेल काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. जर्मनीच्या बडेन-बडेन भागात पहिलं हॉटेल काढलं. त्यानंतर १८९० नंतर १८९६ पर्यन्त गुंतवणूक दारांना आकर्षित करत आधी रोम, फ्रँकफर्ट, जोहान्सबर्ग अशा भागात हॉटेल काढली. 

 १९०५ साली सेजारनं लंडन या सुप्रसिद्ध शहरात आपलं हॉटेल सुरु केलं. सर्व श्रीमंत वर्गासाठी हे अल्पावधीतच आवडत ठिकाण बनलं होतं. १८१८ मध्ये सेजारचं निधन होण्यापूर्वी सुमारे ३० देशांत मिळून एकूण १०० हॉटेल्स बांधली होती. यात जवळपास २८ हजार खोल्या होत्या. वेटरपासून सुरू झालेला जीवनप्रवास हॉटेल क्षेत्रातील राजा होऊन समाप्त झाला.

आज देखील हि हॉटेल दि रिट्झ कार्लटन हॉटेल कंपनी या नावानं उभी आहेत.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.