महाराष्ट्राचा आवडता जैन माणूस !

भारतीय औद्योगिक क्षेत्राचे मराठी पितामह. देशभक्त, दूरदर्शी, हट्टी, प्रेमळ पण तेवढेच चमत्कारिक ! कष्टाळू पण बंडखोर ! वालचंद हिराचंद हे असं अनेक गुणांनी बनलेलं रसायन होतं. एका ओळीत सांगायचं तर भारतातलं पहिलं विमान बनवणारा माणूस. भारतात पहिली कार बनवणारा उद्योजक. इंग्रजांच्या काळात त्यांच्या नाकावर टिच्चून संपूर्ण भारतीय असलेली जहाज कंपनी सुरु करणारा माणूस. 

सोलापूर जिल्ह्यातल्या जैन परिवारात जन्म झालेल्या वालचंद हिराचंद यांना वडलांच्या व्याजबट्ट्याच्या व्यवसायात रस नव्हता. व्याज घेणं त्यांना आवडत नव्हतं. काहीतरी भरीव कामगिरी करून दाखवायची हे त्यांचं ठरलेलं होतं. आणि बंडखोरी अंगात होती. शाळेत असताना ते monitor होते. त्यांना मुलांना वठणीवर आणायला एक छडी दिली होती. पण वालचंद यांनी ती छडी फेकून दिली आणि विद्यार्थ्यांचा संप घडवून आणला. पुढे कर्नाटक इत्यादी ठिकाणी फिरून आतबट्ट्याचे अनेक उद्योग करता करता त्यांना भविष्य सापडलं. 

त्यांचा एक मराठी मित्र होता लक्ष्मण बलवंत फाटक. मैत्री कशामुळे तर दोघांना मराठी साहित्याची, नाटक व चित्रपटाची आवड. [ हे फाटक पुढे जाऊन दादासाहेब फाळके यांच्यासोबत हिंदुस्तान फिल्म कंपनीचे भागीदार झाले. दादासाहेब फाळके आणि फाटक यांनी मिळून चित्रपट उद्योगाचा पाया घातला. ] फाटक पूर्वी रेल्वेत कारकून होते. पुरेशी माहिती घेतल्यावर त्यांनी नौकरी सोडली आणि छोटे मोठे contract घेऊ लागले. 

अचानक इंग्रज सरकार बार्शी जवळ सात मैल लांबीची रेल्वे लाईन बनवण्यासाठी ८० हजार रुपयांचं contract काढणार आहे हे त्यांना समजलं. एवढे पैसे नव्हते तेंव्हा त्यांनी वालचंद यांची भेट घेतली.

वालचंद यांच्या घरच्यांना हा धंदा रिस्की वाटला. पण वालचंद यांनी या क्षेत्रात उडी घ्यायचं ठरवलं. त्यांनी वडलांकडून घेतलेल्या रकमेवर व्याज देऊन नफ्यातली अर्धी रक्कम देण्याचं वचन दिलं. फाटक यांच्या रेल्वेतल्या ओळखीने टेंडर मिळालं. काम सुरु झालं. 

पण फाटक आणि वालचंद दोघे इंजिनियर नव्हते. कामाच्या ठिकाणी जातीने उभं राहून वालचंद यांनी व्यवसाय शिकायला सुरुवात केली. सात मैलाचं अंतर नियमित पायी फिरावं लागायचं म्हणून वालचंद यांनी एक खेचर खरेदी केलं. त्यावर बसून ते कामावर देखरेख करू लागले. पहिलं काम वेळेत पूर्ण केलं. आणि या फाटक वालचंद जोडीची सुरुवात झाली. 

वालचंद स्वस्थ बसणारे नव्हते. त्यांनी मुंबईत मध्य रेल्वेचं बोरीबंदर ते करीरोडपर्यंत चौपदरी रस्त्याचं टेंडर भरलं. हे टेंडर सोपं नव्हतं. मुंबईत अनेक मोठमोठे contractor होते. एक contractor त्यांना म्हणाला,

वालचंद जरा काळजी घ्या. ही मुंबई आहे. सोलापूर नाही. इथं खेडूत लोकांना काही काम नाही. एक दिवस डोक्यावरची पगडी विकायची वेळ येईल तुमच्यावर.’

वालचंद यांना हे फार जिव्हारी लागलं.त्यांनी contract मिळवूनच दाखवलं पण ते काम एवढ उत्तम केलं की ब्रिटीशांची त्यांच्यावर मर्जी बसली. करी रोड ते ठाणे, ठाणे ते कल्याण अशी मोठी कामं त्यांना मिळू लागली. थेट बेळगाव पर्यंत त्यांनी कामं करायला सुरुवात केली. त्यांच्या यशाचं गमक होतं त्यांचा झटपट निर्णय घेण्याचा स्वभाव. 

रेल्वेचं काम करायला स्वतःचा narrow गेज रेल्वे मार्ग सुरु करणारे ते पहिले contractor असतील. त्यांच्या कामाची शैली समजून घ्यायला एक उदाहरण पुरेसं आहे. बेळगावला ते पहिल्यांदाच गेले कामानिमित्त. रेल्वेतून उतरले. कामगारांना स्टेशनवर थांबवून टांग्यात बसले. राहण्याची सोय करायला. त्या चकरेत टांगेवाल्याशी बोलता बोलता त्यांनी त्याच्या टांग्याचा सौदा केला आणि तो विकत घेतला. आपल्या कामगारांना आणायला व न्यायला त्या दिवशी पासून तो टांगा वापरायला सुरुवात झाली. 

वालचंद असे घाईत निर्णय घेत त्यामुळे फाटक एकदम घाबरून जायचे. त्यांची बरीच कारकीर्द रेल्वेत कारकून म्हणून गेली होती. त्यामुळे वालचंद यांचा असा धाडस पत्करण्याचा स्वभाव फाटक यांना घाबरवून टाकायचा. मिळालेली सगळी संपत्ती एका रात्रीत जाईल असं वाटायचं. म्हणून शेवटी चौदा वर्षांनी फाटक यांनी भागीदारी मोडली. वालचंद एकटे पडले. पण वालचंद यांनी शेवटपर्यंत कंपनीचं नाव फाटक वालचंद लिमिटेड असंच ठेवलं. 

वालचंद यांना प्रवासाची खूप आवड. त्यांच्या आयुष्यातले बहुतेक मोठे निर्णय प्रवासात घेतलेले होते. पुण्याहून मुंबईला जायला एकदा ते स्टेशनवर आले. आणि तिथं त्यांना कळल की खडकीला इंग्रज सैन्यासाठी दारुगोळा कारखान्याजवळ बिल्डींग बांधायच्या आहेत. पण दारुगोळा कारखान्यापाशी सुरुंग लावून जमिनी खोदण्यात, इमारती उभ्या करण्यात खूप रिस्क होती. मोठमोठे contractor तयार नव्हते. वालचंद यांनी मुंबईला जाण रद्द केलं आणि थेट खडकीला जाऊन contract साईन केलं. 

असंच एकदा ते उत्तर भारतातून रेल्वेने येताना watson नावाच्या एका ऑफिसरच्या आणी त्यांच्या गप्पा चालू होत्या. बोलता बोलता watson म्हणाले की ग्वाल्हेरच्या महाराजांनी आपली बोट विकायला काढली आहे. वालचंद मुंबईला पोचल्यावर थेट गोदीमध्ये ती बोट बघायला गेले. बायकोला घरी पाठवून दिलं. बोट बघून झाल्यावर आणि ती २५ लाखात विक्रीला आहे हे कळल्यावर वालचंद थेट आपल्या मित्रांकडे गेले आणि कर्ज मिळवायची तयारी केली. बोट सिंदिया यांची होती. वालचंद यांनी हुशारीने कंपनीला तेच नाव दिलं. सिंदिया स्टीम navigation कंपनी.

खरंतर त्याआधी साठ वर्षात जमशेदजी टाटा यांच्यापासून ते अनेक मोठमोठ्या लोकांनी जहाज उद्योगात हातपाय मारून बघितले. पण सगळ्यांना अपयश आलं होतं. ब्रिटीशांच राज्य होतं. आणि ब्रिटीश स्टीमशिप कंपनीने १८६० ते १९२५ या काळात एकूण ४६ कोटी भांडवल असलेल्या १०२ भारतीय जहाज कंपन्या एकापाठोपाठ एक दिवाळखोरीत काढायला लावल्या होत्या. धाक दाखवून, भाव पाडून. तरीही वालचंद यांनी साहस केलं. बोट घेतली. एका झटक्यात. 

पण बोट ताब्यात आल्यावर लक्षात आलं तिला दुरुस्त करायला दहा लाख रुपये खर्च येईल आणि सहा महिने लागतील. सिंदिया कंपनीला फक्त एक वर्षांची परवानगी होती बोट चालवायची. सहा महिने दुरुस्तीत गेले तर कमवणार काय? सगळे पार्टनर वालचंद यांच्या अर्धवट माहितीवर संतापले. 

पण वालचंद यांनी इंग्लंडमध्ये बोट दुरुस्तीची आयडिया काढली. काम दीड महिन्यात होईल अशी माहिती मिळाली. आणि खर्च एक दीड लाख. ठरलं. तात्पुरती दुरुस्ती करून प्रवासी भरून बोट लंडनला न्यायची ठरली. पेपर मध्ये जाहिरात दिली गेली. सिंदिया कंपनीची बोटीची पहिली फेरी लंडनला जाणार. लोकांनी गर्दी करून बुकिंग केलं. पण इथेही वालचंद यांची घाई नडली. बुकिंग करणाऱ्या लोकांकडून advance पैसे घेण्याचं पण डोक्यात आलं नाही. आणि बोट निघायच्या दिवशी अनेक जागा रिकाम्या राहिल्या. एक लाख रुपये नुकसान. 

तरी ती द loyalty नावाची बोट निघाली. गांधीजींनी या स्वदेशी बोटीच कौतुक केलं. बोटीत काश्मीरचे महाराजा हरिसिंग,मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असे काही मोठे लोक होते. काय झालं या बोटीचं ? इंग्रजांनी कशी अडकवली ही बोट? वाचूया पुढच्या भागात.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Jogi says

    Dusara bhag krupaya post karal Ka?

Leave A Reply

Your email address will not be published.