वाळवा तालुक्याला बापूंनी हातातून कुऱ्हाड टाकून पुस्तक घ्यायला लावली.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका हा एकेकाळी फक्त कुऱ्हाडीसाठी प्रसिद्ध होता . खून, मारामाऱ्या, आक्रमक आणि संतापी अशी या तालुक्याची ओळख होती. या तालुक्याच्या हातातली कुऱ्हाड टाकायला लावून स्कूलबोर्डाचे अध्यक्ष असताना १९५२ साली राजारामबापू पाटलांनी या तालुक्यातल्या मुला-बाळांच्या हातात पाटी-पुस्तक दिली.

तालुक्यात तसेच जिल्ह्यात शाळा काढल्या. शेतीसाठी विहिरी खोदल्या, साकव बांधले, वाळवा तालुक्याची तसेच सांगली जिल्ह्याची मानसिकता बदलून टाकली.

वाळवा तालुक्याला याअगोदर गुन्हेगारांचा तालुका म्हणूनच ओळख निर्माण झाली होती. तालुक्यात शेतीच्या वादासाठी खून पडायचे, किरकोळ कारणांसाठी खून मारामाऱ्या होत होत्या. शिक्षणाची व्यवस्था नव्हती .

त्याकाळात विकासाची एक प्रयोगशाळा बापूंनी इथे सुरू केली होती. त्याचे पहिले शिक्षक बापूच झाले.

स्कूल बोर्ड आणि लोकल बोर्ड याचे अध्यक्ष म्हणून राजाराम बापूंनी एवढा निधी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्याकडे वळवला. त्यावेळच्या मोरारजी सरकारने प्रश्न विचारला,

‘हा माणूस आहे कोण?’

बापूंनी लोकल बोर्डात ठराव करून जिल्हाभर फिरण्याकरिता एक जीप घेतली होती. त्यावेळच्या मुंबई सरकारने अशी जीप घ्यायला हरकत घेतली होती.

त्यांच्या चौकशीला अधिकारी आले. त्यांनी राजारामबापूंचे काम पाहिले आणि थेट मोरारजी देसाईंकडे अहवाल दिला.

‘एवढे काम उभे केले आहे की, त्यांना जीप देणे गरजेचे आहे.’

आणि मग त्यावेळच्या मोरारजी सरकारने मुंबई राज्यातल्या सगळय़ा लोकल बोर्डाच्या अध्यक्षांना जीप घ्यायला परवानगी दिली. त्यावेळी बापूंच्यामुळेच सगळ्या लोकल बोर्डाच्या अध्यक्षांना जीप मिळाली होती.

आपल्या स्वत:च्या कामातून सरकारचा निर्णय फिरवणाऱ्या व्यक्तीचे नाव बापूच होते. बापूंचे त्यावेळी एवढे कामच होते की सरकारला निर्णय बदलावा लागत असे.

1959 साली महाराष्ट्रात काँग्रेसला वाईट दिवस होते, त्यावेळी बापूंनी (१९५९ ते ६० ) प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पद सांभाळले होते.

बापूंचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे कोणत्याही राजकीय नेत्यांनी केल्या नाहीत, इतक्या प्रचंड पदयात्रा बापूंनी केल्या आहेत. केवळ तालुक्यापुरत्या नव्हे, तर नागपूरपर्यंतची बापूंची पदयात्रा महाराष्ट्रात १९८० साली गाजली होती. एवढा पायी चाललेला हा देशातला एकमेव नेता असला पाहिजे.

लोकांचे प्रश्न समजून घेण्याकरिता त्यांच्या गावापर्यंत पोहोचायचे, त्याच्या पडवीवरच मुक्काम करायचा, त्यांचीच चटणी-भाकरी खायची, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे, त्याला जे हवे ते सरकारकडून त्याला द्यायचे, यासाठी बापू राब राब राबले. म्हणूनच राजारामबापू पाटील यांना पदयात्री म्हणून ओळखले जाते.

आज महाराष्ट्रात विजेचा लखलखाट आहे. भारनियमन असले तरी ही वीज महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ात पोहोचवण्याचे काम बापू वीजमंत्री असताना झालेले आहे.

१४ हजार खेडय़ांना बापू वीजमंत्री असताना वीज पोहोचवली गेली. बापू उद्योगमंत्री असताना धाटाव, लोटेपरशुराम, जालना, बुटीबोरी, कोल्हापूर, इस्लामपूर या सगळय़ा औद्योगिक वसाहती त्यांच्याच काळात उभ्या राहिल्या. जे खाते आले, त्यावर बापूंची छाप जाणवत होती.

राजकारणाच्या धबडग्यात बापूंनी आपल्या चेह-यावरचे हसू कधीही लुप्त होऊ दिले नाही. वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू हे दोन्ही दिग्गज नेते होते. पण विकासाच्या कामात दादा-बापू एक झाले. बापूंनी उभ्या केलेल्या अ‍ॅसिटोन प्रकल्पाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री असताना वसंतदादा आले आणि सांगून गेले की,

‘बापूंबरोबर कितीही भांडणे झाली तरी विकासाच्या कामात दादा आणि बापू एक आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणातली बहुसंख्य दिग्गज माणसे आणि सहकार चळवळीतले महामेरू हे पश्चिम महाराष्ट्रातलेच आहेत.

कराडचे यशवंतराव, सांगलीचे वसंतदादा, वाळव्याचे राजारामबापू, रेठऱ्याचे यशवंतराव मोहिते, जयंतराव भोसले, वारणेचे तात्यासाहेब कोरे, पंचगंगेचे रत्नाप्पा कुंभार, दत्तशिरोळचे सारे पाटील, भुईंजचे प्रतापराव भोसले, बारामतीचे शरद पवार, संगमनेरचे भाऊसाहेब थोरात अशा सगळय़ा नेत्यांनी सहकाराचा अर्थ समजून घेतला आणि आपल्या भागाची अर्थव्यवस्था सहकारातून मजबूतपणे उभी केली. त्यामुळेच आज पश्चिम महाराष्ट्र पुढे आहे.

  • संतोष कनमुसे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.