म्हणून आषाढी एकादशीनंतर शिळ्या विठोबाचं दर्शन घेण्याची प्रथा आहे…

अवघा रंग एक झाला…!

टाळ मृदुंगाच्या नादात आणि विठ्ठल रखुमाईच्या गजरात आषाढी एकादशी पार पडली. पंढरपूर आणि तिथे उपस्थित असणारे १० लाख भाविक तृप्त झाले, धन्य झाले. पण लोकहो हा सोहळा अजूनही संपलेला नाही.

आज लोकं शिळ्या विठोबाचं दर्शन मोठ्या भक्तिभावाने घेताना आपल्याला दिसतायत.

पण आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शिळ्या विठोबाचं दर्शन घेण्याची प्रथा नेमकी काय आहे? शिवाय आषाढी एकादशीनंतर सुरु होणारी परतीची म्हणजेच माघारी वारी काय असते हे सगळं आज समजून घेऊ..

आता विठोबाला आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शिळा विठोबा जरी म्हणत असले तरी विठोबा कधी शिळा होत नसतो असं आजी म्हणते.  पण मग हा शब्दप्रयोग आला कुठून? तर आषाढी एकादशीचा दिवस म्हणजे लाखो भाविकांची गर्दी असलेला दिवस असतो. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण जनसागर पंढरपुरात दाखल झालेला असतो. विठ्ठलाच्या पायाशी आपल्याकडे असलं नसलेलं सगळं भाविक अर्पण करत असतात. आपल्याला स्वतःला जे जे काही आवडतं ते सगळं देवाला देतात. मग ती शिळी भाकरी का असेना.

संत मंडळी सुद्धा पूर्वी याच भोळ्या भावनेने देवाला न्हाऊ, माखू घालत असत. देवाचा साज शृंगार करत असत. देवाला नेसायला वस्त्र, झोपायला गादी, पांघरूण आणि जेवायला नानाविध पदार्थ असं सारं काही अर्पण करत असत आणि आषाढी एकादशीचा दिवस संपन्न होत असे. अजूनही ही प्रथा अशीच सुरु आहे…

जो आषाढी एकादशीच्या दिवशी भक्तांची भेट घेऊन दमलेला असेल, दुसऱ्या दिवशी उशिरा उठला असेल, अशा थकलेल्या विठोबाचा शीण घालवण्यासाठी म्हणून त्याला पेलाभर पाणी, दूध आणि तुळशीची माळ अर्पण करून त्याचं दर्शन घ्यावं, असा नियम भाविकांनी आखला असल्याचं सांगितलं जातं.

म्हणूनच आषाढीच्या दिवशी विठोबाचं दर्शन तर घेतातच, पण आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा दमलेल्या विठोबाचं म्हणजेच शिळ्या विठोबाचं दर्शन घेण्याची पद्धत असल्याचं सांगितलं जातं.

बरं विठ्ठलाचं दर्शन घेऊन झाल्यावर जी माघारी वारी निघते ती सुद्धा देखणी असते.

सुमारे 18 ते 20 दिवस वारकरी नाचत, गात, आनंदात पंढरपूरला पोहोचतात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी उत्सव साजरा करतात. उत्सव साजरा करणं म्हणजे भजन कीर्तनात सहभागी होणं, पांडुरंगाचं दर्शन घेणं, आपले नित्योपचार करणं असं एकंदर स्वरूप असतं.

लोकांना असं वाटतं वारी आषाढी एकादशीला संपते, पण ही वारी आषाढी एकादशीला संपत नाही… आषाढी एकादशीला पंढरपुरात यायचं, तिथे सेवा करायची आणि एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा असे पाच दिवस पंढरपूरमध्ये विविध उपचार होतात. त्यात नगर प्रदक्षिणा होते, संत विसावतात.

गुरु पौर्णिमेच्या दिवशी, आषाढ पौर्णिमेच्या दिवशी पंढरपुराच्या वाळवंटात ही संत मंडळी जमा होतात, काला होतो. सगळ्यांच्या मुखात अत्यंत प्रेमाने काल्याचा प्रसाद भरवला जातो. सर्व जाती धर्माची लोकं एकत्र येतात. सर्व वारकरी मंडळी एकमेकांना नमस्कार करतात आणि काल्याचा सोहळा संपन्न होतो. काल्याबरोबर आषाढ वारीचा समारोप होतो.

       तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला हेतो

पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे…

म्हणजेच कितीही पाषाण हृदयाचा माणूस असेल तरीही तो माणूस वारीत सहभागी झाला, चालत राहिला, नाचत राहिला, गात राहिला तर पंढरपूर सोडताना त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही असं सांगितलं जातं. 

काल्याने वारीचा समारोप होतो आणि वारकरी मंडळी परतीच्या प्रवासाला लागतात. अनेक वारकरी असतात जे आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन झालं कि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी उपवास सोडतात आणि मग पंढरपूर सोडण्याचं त्यांचं नियोजन असतं. काही वारकरी असतात जे गुरु पौर्णिमेला काला करतात आणि मग परतीच्या प्रवासाला लागतात. पण काही मंडळी, अत्यंत निष्ठावंत असणारी मंडळी संतासोबत आळंदी देहूवरून पंढरपूरला चालत येतात आणि परत संतांना घेऊन पंढरपूरवरून आळंदी देहूला चालत जातात.

आळंदीवरून, देहूवरून पंढरपूरला येताना सुमारे 18 ते 20 दिवस लागतात. पण हा परतीचा प्रवास 18 ते 20 दिवसांचा नसतो. तर तो दहा दिवसांचा असतो. आगोदारची म्हणजेच पंढरपूरला येण्याची जी वारी असते ती वैभवाची वारी समजली जाते आणि पंढरपूरहून परत जी वारी जाते तिला वैराग्याची वारी असं समजलं जातं. कारण ही वैराग्याची वारी म्हणजे अधिक खडतर असते. 18 दिवसांचा जो प्रवास झालेला असतो तो दहा दिवसात पूर्ण करावा लागतो.

या माघारी वारीची सुरवात कधी होते किंवा या माघारी वारीसाठी वारकरी किती वाजता उठतात?

तर पहाटे दोन अडीच वाजता वारकरी या परतीच्या वारीत चालायला सुरवात करतात. एका दिवसात साधारणपणे ३०-३५ किलोमीटर पर्यंतचं अंतर हे वारकरी एका दिवसात पूर्ण करतात. ८ ते १० दिवसात पुन्हा देहूला परततात. ही वारी सुद्धा अत्यंत आनंद देणारी वारी समजली जाते.

ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये शेकडो दिंड्या आणि विणेकरी सहभागी असतात आणि परतीच्या वारीमध्ये या दिंड्यामधला किमान एक विणेकरी तरी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्यासोबत असतो.

जेव्हा आळंदी आणि देहू गावांमध्ये या संतांच्या वाऱ्या येतात तेव्हा गावकरी त्यांचं स्वागत करतात. तिथे हजेरी होते. हजेरी होते म्हणजे काय तर देवाच्या समोर आपण आपली सेवा समर्पित करणं. या हजेरीनंतर नारळ आणि प्रसादाचं वाटप होतं. देव मंदिरात येऊन विसावतात आणि मग खऱ्या अर्थाने वारीचा समारोप होतो.

आषाढी एकादशीपासून गुरु पौर्णिमेपर्यंत असे चार पाच दिवस आणि नंतरचे ८-१० दिवस हे वारीचे हे उत्तरंग आहेत जे मानवी जीवन समृद्ध करणारे आहेत अशी सर्वत्र मान्यता आहे.

आत्ताच्या काळात लोकांना १८ दिवसांची सुट्टी मिळत नाही आणि अशा वेळी परतीची वारी म्हणजेच माघारी वारी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. परतीची वारी म्हणजे वैराग्याची आणि संतांच्या जवळ नेणारी वारी असते असं समजलं जातं.

त्यामुळे ही परतीची, माघारी वारी सुद्धा आयुष्यात एकदा तरी करायलाच हवी असं थोरा मोठ्यांकडून नेहमी सांगण्यात येतं..

हे ही वाच भिडू :

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.