काश्मीरच्या या लंगड्या राणीने गझनीला दोन वेळा पराभूत करून पळवून लावलं होतं

आपल्या देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जेव्हा जेव्हा ऐरणीवर राहतो तेव्हा तेव्हा देशातल्या महिलांची वीरगाथा सांगितली जाते. तसा भारताला महिलांच्या वीरगाथेचा मोठा इतिहास आहे. यात राणी लक्ष्मीबाईंचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. या झाशीच्या राणीने इंग्रजांना लोखंडाचे चणे चावायला भाग पाडलं.

पण त्यात अजून एका लंगड्या राणीचं नाव ऍड करावं लागेल जिला चेटकीण राणीचा तर खिताब मिळालाच, पण तिने तिच्या हुशारीने भल्या भल्यांना तिच्यासमोर वाकायला लावलं.

ही राणी होती, काश्मीरची राणी दिद्दा..अशी राणी, जिच्याविषयी ना कधी कोणी ऐकलं, ना कधी कोणी बोललं.

लोहार राजवंशात जन्माला आलेली (ज्यात आजचा हरियाणा, पंजाब ,पुंज राजोरी हा भाग येतो) अपंग मुलगी जिला स्वतःच्या आई वडिलांनीच सोडून दिल. तिला एका दासीने सांभाळून मोठं केलं. आपल्या अपंगत्वाचं ओझं न वाटून घेता दिद्दा सर्व युद्धकौशल्यांमध्ये पारंगत झाली.

एके दिवशी शिकारीवर निघालेल्या काश्मीरच्या क्षेमगुप्ताची नजर तिच्यावर पडली. ती लंगडी आहे हे माहित असूनही तो तिच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न केलं. त्याने तिच्या प्रेमाखातर एक नाणं सुद्धा काढलं. ह्या राणीच्या नवऱ्याने स्वतःच्या नावापुढं तीच नाव लावलं होत, दिद्दक क्षेमगुप्ता असं.

ही राणी एवढी हुशार हुशार होती कि, आपल्या नवऱ्याच्या मृत्यनंतर जेव्हा तिच्या शत्रूंनी तिला सती घालवण्याचा कट रचला, तेव्हा दिद्दाने सेनगुप्ताच्या पहिल्या पत्नीलाच सती घालवलं. आणि स्वतःच्या बळावर काश्मीरची राजगादी मिळवून जवळजवळ ५० वर्ष राज्य केलं.

दिद्दा एवढी तीक्ष्णबुद्धीची राणी आजवर भारतानंच काय अख्या जगानं पाहिली नसेल. आज आपण जो गनिमी कावा ऐकतो ना, त्याचा शोध या लंगड्या दिद्दा राणीनंच लावला होता अस म्हणतात. तिचा इतिहास थोडा उलथा पालथा करून बघितला तर समजत की, या राणीनं ३५००० एवढ्या मोठ्या सैन्यबळाला फक्त ५०० च्या फौजेनिशी हरवलं होत, आणि ते ही फक्त ४५ मिनिटांत.

राज्याची गादी मिळवल्यानंतर दिद्दाच्या राज्यावर बऱ्याच राजांनी आक्रमण केलं. पण दिद्दाने सर्वांना पछाडून टाकलं. अशातच एक प्रसंग असा आला ज्याचे किस्से आज ही काश्मीर मध्ये ऐकवले जातात.

महंमद गझनी नावाचा खुंखार सुलतान भारतावर आक्रमण करायची आणि भारताची संपत्ती लुटून नेण्याची कधी नव्हे ते वाट बघत होता. ज्यावेळी क्षेमगुप्ताचा मृत्यू झाला आणि दिद्दा गादीवर आली त्यावेळी गझनीला वाटलं आता आपला मार्ग मोकळा आहे. आपण उत्तर भारत म्हणजेच काश्मीर मार्गे भारतात एंट्री मारून आक्रमण करू शकतो.

तो जवळजवळ ३५००० हजारांचा सैन्य घेऊन भारताच्या दिशेनं कूच करू लागला. यावर दिद्दाने लढायचं ठरवलं. तिने स्वतःची युद्धाची टेक्निक शोधून काढली होती. ज्याचं नाव होत गनिमी कावा. काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यात सैन्याला लपण्यासाठी मुबलक जागा होती. त्याचा वापर करून दिद्दाने आपल्या अवघ्या ५०० सैनिकांनिशी गझनीच्या सैन्याचा धुव्वा उडवला. गझनीचं सैन्य सैरावैरा वाट दिसेल तिकडे पळू लागलं. आणि हे तिने अवघ्या ४५ मिनिटांच्या वेळात आटोपलं.

झालं, गझनीचा भारतावर आक्रमण करायचा पहिला डाव तर फसला. त्याने दुसऱ्यांदा पूर्ण तयारी करून काश्मीरवरच आक्रमण केलं. पण दिद्दाने तेव्हा ही घाबरून न जाता गझनीच्या सैन्याचा पराभव केला. शेवटी गझनीने कंटाळून काश्मीर मार्गे भारतावर आक्रमण करण्याचा नाद सोडून दिला. आणि शेवटी त्याने गुजरात मार्गे भारतावर आक्रमण केले.

आपला देश मोठ्या मोठ्या पराक्रमी आणि शूर राजांचा देश आहे. पण दिद्दा सर्वांचीच महानायक होती. कारण तिच्यापुढं महंमद गझनी सारखा सुलतान सुद्धा नतमस्तक झाला होता. आणि या सुलतानाला आणि इतर राजांना जेव्हा दिद्दाचा पराभव करता आला नाही, तेव्हा त्यांनी तिला चेटकिणीचा खिताब दिला.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.