रोनाल्डो एवढा मोठा प्लेअर, पण भारतात सगळ्यात जास्त चर्चा त्याच्या लफड्याचीच झाली…

ख्रिस्तिआनो रोनाल्डो, नाव ऐकलं की गाव हलतंय. भाऊच्या पायात बॉल असला की श्वास रोखला जातो. आपली नजर खिळून राहते, आपण ऑपोझिट टीमला सपोर्ट करत असलो, तरी असं वाटत राहतं की या बाबाचा गोल बसावा. त्याच्या पायाला लागून बॉल गोलपोस्टमध्ये गेला की जशी काय काही क्षणांसाठी दुनिया बदलती. स्टेडियममधले फॅन्स उसळतात, तो सेलिब्रेशन करायला लागला की असं वाटतं भूकंप आलाय, आणि मग त्याची ती जगप्रसिद्ध उडी… माहौल!

याला म्हणतात हवा करणं भिडू. कट्टर क्रिकेट फॅन्स असणाऱ्या भिडूंना फुटबॉल हा खेळ भारी वाटतो, त्याचं श्रेय रोनाल्डोच्या प्रत्येक गोलला जातं. नव्वद मिनिटं हे पोरगं श्वास रोखून धरायला लावतं, बाथरुमला जायचं म्हणलं तरी दहा वेळा विचार करावा लागतो, कारण आपण जाऊन येईपर्यंत एखादा गोल मिस झाला… तर त्याची सर हायलाईट्सला येणार नसती.

त्यामुळंच त्याचे पाय हलायला लागले, की बुडाला फेवीक्विक लावल्यासारखे आपण खुर्चीला चिटकून बसलेले असतो. म्हणूनच म्हणलं ख्रिस्तीआनो रोनाल्डो… नाव ऐकलं की गाव हलतंय.

आज जगातले कोणत्याही खेळातले टॉप खेळाडू काढायचे ठरवलं तर पहिल्या ३ नंबरमध्ये रोनाल्डो येणार म्हणजे येणार. रोनाल्डो आज एवढा भारी प्लेअर झाला असला, तरी त्याच्या बालपणात एक वाढीव किस्सा झाला होता. त्याला फुटबॉलचं येड तसं फार आधीच लागलं, पण एक दिवस समजलं की त्याच्या ह्रदयाचे ठोके अनियमित आहेत. कुठल्याही खेळाडूची ताकद त्याच्या स्टॅमिनामध्ये असते, मात्र या आजारामुळं रोनाल्डोच्या फुटबॉल खेळण्याबाबतच शंका व्यक्त होऊ लागली. १५ वर्षांच्या रोनाल्डोचं ऑपरेशन झालं आणि गडी पुन्हा एकदा मैदानात उतरला.

आज रोनाल्डोच्या खात्यात ८०० हुन जास्त गोल्स आहेत. पुरस्कारांची यादी काढली तर लय मोठी आहे आणि फिटनेसचं विचाराल तर विषयच गंभीर. एवढी अजस्त्र ताकद पण अंगावर कुठं जास्तीचं मांस नाही.

सलमान आणि शाहरुखच्याही आधी आपल्या पोरांना सिक्स पॅकचं येड लावण्यात रोनाल्डोचा रोल लय मोठा आहे.

आता सांगतो त्याची भारतात गाजलेली लव्हस्टोरी…

रोनाल्डोनं जिंदगीत लय प्रेमप्रकरणं केली आणि हा लपून-छपून नाय तर खुलेपणानं केली. आता भारताबाहेरच्या लफड्यात इकडच्या लोकांना फार रस असण्याचं काय कारण नव्हतं. पण एकदा रोनाल्डो भाऊचं नाव जोडलं गेलं, बिपाशा वैनींसोबत. आता तेव्हा बिपाशा बासू आपली वैनी होती… कारण जॉन अब्राहम म्हणजे जिम लावलेल्या पोरांचं काळीज, प्रेरणास्थान. बिपाशा आणि जॉन ही जोडी २००३ मध्येच जुळलेली. त्यांचं अफेअर फुल्ल फॉर्ममध्ये सुरू होतं.

मग आला कहानी में ट्विस्ट…

२००७ मध्ये एक कार्यक्रम होता, ज्यात जगातली नवी सात आश्चर्य सांगितली जाणार होती. रोनाल्डो आणि बिपाशा बासूनं एकत्र स्टेजवर एंट्री केली. जरा हात बित हलवले, थोडेसे बोलबच्चन दिले. कार्यक्रम झाला.. सगळं काय निवांत होतं.

दुसऱ्या दिवशी मात्र राडा झाला, एका इंग्लिश पेपरनी बातमी छापली की रोनाल्डो आणि बिपाशानं पार्टीत किस केलं. गोष्ट बातमीवरच थांबली नाय, तर त्यांचे किस करतानाचे फोटोही व्हायरल झाले. रोनाल्डो बिपाशा क्युट आहे असं म्हणाला. त्यावर बिपाशा म्हणाली, ‘रोनाल्डोला भेटणं स्वप्न पूर्ण होण्यासारखं होतं. कार्यक्रम झाल्यावर आम्ही क्लबमध्ये गेलो आणि हा मस्त अनुभव होता. तो खरंच खूप क्युट आहे आणि तो मला क्युट म्हणला याचं जरा आश्चर्यच वाटतं. तो आता माझा मित्र आहे आणि त्यानं मला प्रॉमिस केलंय की तो मला त्याच्या मॅचेसला बोलवेल.’

बिपाशा काय रोनाल्डोच्या मॅचेसमध्ये दिसली नाही, पण या सगळ्यामुळं जॉन भाऊ मात्र चांगलेच खवळले. तो बिपाशावर चिडल्याच्या अफवा आल्या, पण त्यानंतरही ते पाच वर्ष डेट करत होते. त्यावेळेस प्रत्येक पोराच्या तोंडी, त्यांच्या अफेअरचीच चर्चा होती.

पण कसंय भिडू, अफेअरचा मुद्दा सोडला, तरी रोनाल्डोचं महत्त्व कधीच कुणी कमी करु शकत नाही. त्याच्या पायात बॉल आला की दुनिया थांबते आणि सगळ्या जगाला फुटबॉलचं वेड लावण्यात त्याचाच नंबर पहिला येतो.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.