कंगना म्हणते त्याप्रमाणे भगतसिंगांच्या फाशीला गांधीजी जबाबदार होते का..?

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले असं म्हणणाऱ्या थोर इतिहासकार कंगना राणावत यांनी काल इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. त्या म्हणाल्या

“महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंग यांना फाशी व्हावी अशी महात्मा गांधींची इच्छा होती असे काही पुरावे दर्शवतात. त्यामुळे तुम्ही तुमचे हिरो योग्यपणे निवडले पाहिजे. कारण या सर्वांना तुमच्या आठवणींच्या एकाच बॉक्समध्ये ठेवणं आणि प्रत्येक वर्षी जयंतीला शुभेच्छा देणं पुरेसं नसून खरंतर मूर्खपणा, बेजबाबदारपणा आहे. प्रत्येकाला आपला इतिहास आणि आपले हिरो माहिती असायला हवेत”

कंगनाने लिहिलेल्या पोस्टमुळे जुन्या वादाला तोंड फुटले. खरंच गांधीजी भगतसिंग यांच्या फाशीला जबाबदार होते का ? 

२४ मार्च १९३१.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कराची येथील अधिवेशनासाठी महात्मा गांधी मालीर स्टेशनवर पोहोचलेले असतात. त्यावेळी ‘भारत सभे’चे क्रांतिकारक कार्यकर्ते गांधीजींच्या विरोधात घोषणा देत त्यांना काळ्या कपड्यापासून बनवलेले फुल देऊन त्यांचा निषेध करतात.

‘गांधीजींनी त्यांना शक्य असून देखील भगतसिंगांची फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत’ असा भारत सभेच्या या क्रांतिकारक कार्यकर्त्यांचा दावा असतो. त्याविरोधातच त्यांचं हे विरोध प्रदर्शन सुरु असतं.

गांधीजी या युवकांकडून विरोध प्रदर्शनासाठी निवडण्यात आलेल्या  ‘गांधीगिरी’च्या मार्गाचा सन्मान करत त्यांच्याकडून देण्यात आलेल्या निषेधाच्या काळ्या फुलाचा  स्वीकार करतात. एवढंच नाही तर ही फुलं ते आपल्या आश्रमात पाठवून देतात.

हा प्रसंग आपल्यापैकी बहुतेकांनी ‘द लिजेंड ऑफ भगतसिंग’ या चित्रपटात बघितलेला असेलच. चित्रपट जरी बघितला नसलात तरी गेलाबाजार एखादं व्हॉटसअॅप फॉरवर्ड तर तुम्हाला मिळालंच असणार, ज्यात गांधीजींनी कसं शक्य असूनसुद्धा भगतसिंगांची फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, असा दावा करण्यात आला असेल.

‘द लिजेंड ऑफ भगतसिंग’ या चित्रपटात गांधीजींच्या संदर्भातील हा प्रसंग जितक्या वाईट पद्धतीने चित्रित करण्यात आलाय, ते म्हणजे ऐतिहासिक तथ्यांचं विद्रुपीकरण करण्याचा उत्तम नमुना होता. खरं तर भगतसिंगांच्या फाशीसाठी गांधीजींना जबाबदार ठरवून त्यांची प्रतिमा खराब करण्याचा खेळ गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु होता, पण चित्रपटातील ‘त्या’ दृश्यापासून हे प्रमाण कैक पटीने वाढलं.

हे दृश्य म्हणजे सोशल मिडीयाच्या जगात खऱ्या-खोट्याची कसलीही शहनिशा न करता, केवळ आपल्या विरोधकाची प्रतिमा हनन करण्यासाठी, व्हॉटसअॅप युनिव्हर्सिटीतून फॉरवर्ड करायला अनेकांना रेडीमेड मटेरीयलच्या स्वरुपात लागलेली लॉटरीच होती. या दृश्यात कुठेही थेटपणे या प्रकरणात गांधीजी दोषी असल्याचा दावा करण्यात आलेला नसला (किंबहुना गांधीजींचं स्पष्टीकरण त्यात असलं) तरीही गांधीजींना जितक्या असहाय पद्धतीने चित्रित करण्यात आलंय, त्याने अप्रत्येक्षपणे गांधीजींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.

भगतसिंगांची फाशी आणि महात्मा गांधी या प्रकरणाकडे आपल्याला कधीच फक्त ‘ब्लॅक अँड व्हाईट’ शेडमधून बघता येत नाही. या प्रकरणाकडे बघताना स्वतांत्र्यलढ्यासाठी दोघांनी निवडलेल्या वेगवेगळ्या मार्गाच्या अनुषंगाने त्यांच्यातील वैचारिक मतभेदाकडे देखील बघावं लागतं आणि दोघांमध्ये परस्परांबद्दल असलेल्या आदराच्या भावनेचा देखील विचार करावा लागतो.

गांधी-भगतसिंग या दोघांमध्ये वैचारिक ‘मतभेद’ होते, पण ‘मनभेद’ नव्हते. दोघांनाही एकमेकांच्या राष्ट्रीय कार्याबद्दल आणि ध्येय्याबद्दल परस्पर आदर होता.  गांधीजी भगतसिंगांच्या धैर्याने आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण पणाला लावण्याच्या वृत्तीने प्रभावित होते, तर भगतसिंगांना गांधीजींनी कामगार आणि कष्टकऱ्यांसाठी उभारलेल्या चळवळीबद्दल आदर होता. दोघांचंही ध्येय्य एकंच असलं तरी दोघांचेही मार्ग मात्र वेगवेगळे होते.

गांधीजींनी अनेकवेळा सांगितल्याप्रमाणे आणि त्यांनी तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड आयर्विनला लिहिलेल्या पत्रांवरून त्यांनी भगतसिंगांना वाचविण्यासाठी करता येतील तितके प्रयत्न केले होते, हे मात्र ठामपणे सांगता येतं. फक्त पत्रातूनच नाही तर या फाशीपूर्वीच्या घटनाक्रमात गांधीजींनी जेव्हा कधी लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली त्या प्रत्येक वेळी त्यांनी ही फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी यासाठी लॉर्ड आयर्विनमार्फत प्रयत्न केले होते.

खुद्द लॉर्ड आयर्विननेच आपल्या डायरीत लिहिलंय की भगतसिंगांच्या नियोजित फाशीच्या आदल्या दिवशी (२३ मार्च) गांधीजींनी त्यांना पत्र लिहून ही फाशीची शिक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात यावी आणि भगतसिंग व त्यांच्या साथीदारांना जिवंत राहण्याची संधी देण्यात यावी, अशी विनंती केली होती.

खरं तर गांधीजींनी भगतसिंगांना फाशीच्या शिक्षेपासून वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु ब्रिटिशांना त्यांच्या गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाली होती की जर भगतसिंगांची फाशीची शिक्षा आमलात आणली गेली तर त्याविरोधात संपूर्ण देशभरात हिंसक आंदोलन उभं राहिलं. अहिंसावादी असणारे गांधी या ‘हिंसक’ आंदोलनाला आपलं समर्थन देणार नाहीत. त्यामुळे संतप्त आंदोलक गांधी आणि काँग्रेसपासून दुरावले जातील आणि भारताचा स्वतांत्र्यलढा मोडून काढायला ब्रिटिशांना मदत होईल.

भगतसिंगांच्या फाशीच्या शिक्षेसाठी गांधीजींना दोषी ठरवताना मुख्यतः ‘गांधी-आयर्विन करारा’चा दाखला दिला जातो. या करारात गांधीजींनी भगतसिंग आणि साथीदारांच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी अशी अट ठेवायला पाहिजे होती, असा दावा करण्यात येतो. पण मुळात एका गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं की या करारान्वये गांधीजींनी अनेक भारतीय राजकीय कैद्यांची सुटका करवून घेतली होती.

भगतसिंग आणि साथीदारांना  इंग्रज अधिकारी सॉडर्सच्या हत्येच्या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे ब्रिटीश सरकार कुठल्याही किमतीवर भगतसिंग आणि साथीदारांची फाशी रद्द करण्याच्या मनस्थितीत नव्हतं.

हिंसेच्या प्रकरणात अडकलेल्या राजकीय कैद्यांना सोडण्यात येणार नाही, अशी ब्रिटीशांची देखील अट होती.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे ‘गांधी-आयर्विन’ करारात गांधीजींच्या सगळ्या अटी मान्य करायला इंग्रज काही गांधीजींचं ऐकून भारताचा कारभार चालवत नव्हते, हे आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे. शिवाय ज्यामुळे ब्रिटीश साम्राज्याच्या राजकीय हितसंबंधांना बाधा निर्माण होईल, असा कुठलाही निर्णय ते घेणार नव्हते.

असं असूनही गांधीजींनी लॉर्ड आयर्विन यांना अनेकवेळा विनंती केली आणि ही शिक्षा टाळावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले परंतु त्यात त्यांना अपयश आलं. त्याबद्दल गांधीजींनी खंत देखील व्यक्त केलेली आहे.

भगतसिंग ज्या मार्गावरून निघाले होते त्याचा शेवट फाशीच असल्याची कल्पना भगतसिंगांना देखील होतीच की. त्यामुळेच तर असेम्ब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर तिथून पळून जाणं  शक्य असून देखील त्यांनी तसं केलं नाही. आपल्याला देशवासियांना जे काही सांगायचंय त्यासाठी व्यासपीठ म्हणून ते आपल्यावर चालविण्यात येणाऱ्या खटल्याचा उपयोग करू इच्छित होते. या खटल्याच्या माध्यमातून ते आपलं म्हणणं जगासमोर मांडू पाहत होते. तसं करण्यात ते यशस्वी देखील ठरले.

महात्मा गांधी असोत किंवा भगतसिंग असोत, दोघांचीही आपल्या तत्वांवर आणि विचारांवर अविचल निष्ठा होती. कुठल्याही परिस्थितीत आपल्या तत्वांशी तडजोड करण्याची त्यांची तयारी नव्हती.

भगतसिंगांना स्वतःला देखील कुणी त्यांच्या फाशीसाठी इंग्रजांसमोर झुकावं हे मान्य नव्हतं. म्हणूनच तर आपल्या मुलाची फाशी रद्द करण्यात यावी, अशी विनंती जेव्हा त्यांच्या वडिलांनी ब्रिटिशांना केली त्यावेळी ते आपल्या वडिलांवर देखील चिडले होते. आपल्या फासावर जाण्याने जे काही साध्य होऊ शकतं ते कदाचित जिवंत राहून साध्य होऊ शकणार नाही, या निष्कर्षप्रत ते पोहोचले होते.

२६ मार्च १९३१ रोजी म्हणजेच आपला मुलगा फासावर गेल्यानंतरच्या तिसऱ्या दिवशी ज्यावेळी भगतसिंगांचे वडील किशनसिंगजी काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झाले त्यावेळी त्यांनी देशवासियांना आवाहन केलं की

सर्वांनी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला स्वातंत्र्यलढ्यात साथ द्यावी. तरच मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा महासंग्राम यशस्वी होऊ शकतो.

गांधीजींबाबतीत बोलायचं झालं तर अहिंसेचा पुजारी असणारा हा माणूस भगतसिंगांच्याच काय तर कुणालाही दिल्या जाणाऱ्या फाशीच्या शिक्षेच्याच विरोधात होता. फाशीच्या शिक्षेने आरोपी व्यक्तीकडून स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा त्याचा अधिकार हिरावला जातो. शिवाय कुठल्याही माणसाचे प्राण हिरावून घेण्याचा अधिकार फक्त त्याच्या निर्मात्याला म्हणजेच ईश्वराला आहे, असंही गांधीजींचं मत होतं. त्यामुळे अशा व्यक्तीला मातृभूमीसाठी शहीद झालेल्या भगतसिंगांच्या फाशीसाठी दोषी धरणं, हे फक्त आपल्या वैचारिक दारिद्र्याचं आणि करंटेपणाचंच लक्षण ठरतं.

अजित बायस

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Lakhan Sakhare says

    हो

Leave A Reply

Your email address will not be published.