नेहरूंच्या हलगर्जीपणामुळे भारताचा संघ फुटबॉल विश्वचषक खेळू शकला नव्हता ?
फ्रान्स फुटबॉल विश्वचषक जिंकला पण चर्चा झाली ती क्रोएशियाची. क्रोएशियाची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या यांची तुलना केली जाऊ लागली. त्यानंतर भारताचं फुटबॉलमधलं स्थान चर्चेला आलं. यात चर्चेत हरभजन सिंग पासून ते अनेक सेलिब्रिटींनी आपआपली मतं मांडली.
वास्तविक दर चार वर्षांनी ही चर्चा चघळण्यासाठी उत्तम असतेच. पण यावेळीच्या चर्चेत खास होतं.
खास असं की,
नव्याने ‘राष्ट्रीय आरोपी’ झालेले पंडीत जवाहरलाल नेहरूंना प्रत्येक गोष्टीप्रमाणे या गोष्टीत देखील आरोपी करण्यात आलं आहे.
“भारताच्या संघाला साधे बुट मिळवुन देणं सुद्धा पंडित नेहरूंना शक्य झालं नाही. त्यामुळेच भारताच्या फुटबॉलची वाट लागली !”
हे जे विधान आहे, ते कितपण सत्य आहे ते जाणुन घेऊयात.
हा बुटाचा किस्सा नेमका काय आहे.
१९४८ सालची ऑलिम्पिक स्पर्धा इंग्लंडमधल्या लंडन शहरात पार पडली होती. स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच मोठी स्पर्धा भारत एक स्वायत्त देश म्हणून खेळत होता. या स्पर्धेतील भारतीय फुटबॉल संघाने संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. कारण संघातील बहुतांश खेळाडू हे बुटाशिवाय, तर काही खेळाडू हे फक्त सॉक्स घालून खेळले होते. या घटनेनंतर फिफाने भारतीय संघाला बजावलं होतं की, विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला बुटाशिवाय खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही.
याच कारणासाठी भारताला प्रवेश १९५० च्या विश्वचषकासाठी प्रवेश नाकारण्यात आला का..?
तर नाही.
सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं की भारताला प्रवेश नाकारण्यात आला नव्हता तर पात्र ठरून देखील भारतीय फुटबॉल संघटनेने विश्वचषकात न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
मुळात भारतीय संघ विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचा किस्साच रंजक होता.
१९५० च्या विश्वचषक स्पर्धेसाठी आशिया खंडातील एका संघाला प्रवेश द्यायचा होता, आणि आशिया खंडातील इतर राष्ट्रांनी (फिलिपाईन्स, इंडोनेशिया आणि म्यानमार) स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय संघ आपोआपच स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. त्यामुळे आशिया खंडातून स्पर्धेत सहभागी होऊ शकत असलेल्या एकुलत्या एक संघाला अशा कारणास्तव ‘फिफा’ स्पर्धेत प्रवेश नाकारणार नव्हतीच.
मग पात्र ठरून देखील भारतीय संघाने स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय का घेतला…?
या प्रश्नाच्या उत्तरा दाखल अनेक कारणं सांगितली जातात. पहिलं कारण असं की, हा विश्वचषक ब्राझीलमध्ये होणार होता. भारतातून ब्राझीलपर्यंतचा प्रवास करणे भारतीय संघासाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हत. परंतु हे कारण अशा साठी पटण्यासारखं नाही कारण विश्वचषकाचे आयोजक ब्राझीलने प्रवासासाठीचा खर्च उठविण्याची तयारी दर्शविली होती. कारण भारताचा सहभागच स्पर्धेतील आशिया खंडाला प्रतिनिधित्व मिळवून देणारं होता.
त्यावेळच्या भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार सैलेन मन्ना यांनी यांनी मात्र ‘स्पोर्ट्स इलुस्ट्रेटेड’ला दिलेल्या मुलाखतीत भारताच्या विश्वचषकात न खेळण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत बुटाची थेअरी किंवा आर्थिक कारण या दोन्ही गोष्टी नाकारल्यात. त्यांच्यामते, “त्यावेळी भारतीय फुटबॉल संघटना विश्वचषक स्पर्धेबाबतीत फारशी गंभीर नव्हती आणि सर्व लक्ष १९५२ साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीवर देण्यात आलं होतं. आमच्यासाठी ऑलिम्पिकपेक्षा मोठं काहीच नव्हतं.”
थोडक्यात प्रत्येक गोष्ट त्या त्या काळामध्ये पाहिली जाते. जेव्हा कर्णधारच म्हणतात, तेव्हा विश्वचषक नाही तर ऑलिम्पिक महत्वाच होतं. असो आत्ता या गोष्टीला नेहरु कसे जबाबदार ठरले ते आपआपल्या अभ्यासाप्रमाणे प्रत्येकानं ठरवावं.