क्रिकेटचा देव खरंच निर्दोष होता का..?

T20 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशचा भारताविरुद्ध पराभव झाला. संघाच्या या पराभवानंतर नुरुल हसनने मोठा आरोप केला आहे. भारतीय संघाकडून विराट कोहलीने फेक फिल्डिंग  केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट हातात बॉल नसतानाही थ्रो करत असल्याची अॅक्टिंग करत आहे. 

या निमित्ताने २००१ मध्ये ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरवर बॉल टेंपरिंगचा आरोप करण्यात आला होता. 

नेमकं काय झालं होतं..?

२००१ च्या नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. पहिली कसोटी भारताने गमावली होती. दुसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस. सचिन बॉलिंग करत होता आणि इतर कुठल्याही बॉलरपेक्षा सचिनला अधिकचा स्विंग मिळतोय असं लक्षात येत होतं.

थोडासा संशय आल्याने टी.व्ही. प्रोड्यूसरने आपल्या कॅमेरामनला सचिनच्या हातापाशी कॅमेरा झूम करायला सांगितला. त्यातून जे फुटेज बाहेर आलं त्यात सचिन आपल्या हाताच्या नखाने  बॉलसोबत छेडछाड करत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. 

हे फुटेज ज्यावेळी थर्ड अंपायर रुडी कर्टझन यांनी बघितलं त्यावेळी त्यांनी ते मॅच रेफ्री माईक डेनिस यांच्याकडे रेफर केलं. हे फुटेज बघून डेनिस यांनी सचिनला बॉल टेंपरिंगच्या प्रकरणात दोषी ठरवलं. त्याच्यावर सामन्यात मिळणाऱ्या मानधनापैकी ७५ टक्के दंड आणि एका कसोटीची बंदी घालण्यात आली.

sachin ball tempering 3
Youtube

खरं तर प्रकरण एवढ्यावर थांबायला पाहिजे होतं, पण असं होणार नव्हतं. कारण या घटनेमुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली. सचिन असं काही करू शकतो या गोष्टीवर विश्वास ठेवायलाच क्रिकेटप्रेमी तयार नव्हते. देशभरात याविरोधात निदर्शने झाली. मॅच रेफ्री माईक डेनिस यांचे पुतळे जाळण्यात आले. बीसीसीआयने पुढच्या कसोटीतून माईक डेनिस यांना हटवण्याची मागणी केली.

डेनिस यांना हटवण्यात आलं नाही तर भारतीय संघ दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतेल, अशी धमकी देण्यात आली.  हे बीसीसीआयचं ब्लॅकमेलिंग होतं, कारण भारतीय  संघ दौरा अर्धवट सोडून परत आला असता तर आफ्रिकन मंडळाचं त्यात प्रचंड मोठं आर्थिक नुकसान होणार होतं. सहाजिकच बीसीसीआयच्या दबावासमोर आफ्रिकन क्रिकेट मंडळ झुकलं.

माईक डेनिस यांना हटवण्यात आलं आणि डेनिस लिंडसे यांची मॅच रेफ्री म्हणून नियुक्ती केली.

मात्र या प्रकरणातला ड्रामा एवढ्यावरही संपयला तयार नव्हता, कारण आयसीसी माईक डेनिस यांच्या हटविण्याच्या विरोधात होती. आयसीसीने डेनिस लिंडसे यांच्या नियुक्तीस मान्यता देण्यास नकार दिला. त्यामुळे दौऱ्यातील तिसरी कसोटी पार तर पडली परंतु आयसीसीची मान्यता नसल्याने हा सामना दोन देशातील अनौपचारिक सामना म्हणून जाहीर करण्यात आला.

त्यामुळे क्रिकेटच्या अधिकृत रेकॉर्डबुकमध्ये ३ सामन्यांचा हा दौरा भारताने १-० असा गमावल्याचीच नोंद झाली. नंतर यथावकाश या प्रकरणात आयसीसीने चौकशी केली आणि त्यात सचिनला निर्दोष ठरविण्यात आलं. त्याच्यावरील एका सामन्याची बंदी देखील उठविण्यात आली.

खरंच सचिन निर्दोष होता का..?

सचिनने बॉल टेंपरिंग केलं किंवा नाही याबाबतीत दोन मतप्रवाह बघायला मिळतात. काही जणांच्या मते सचिनने बॉल टेंपरिंग केलं होतं, तर बऱ्याच जणांना असं वाटतं की सचिन असं काही करूच शकत नाही. कुणीही स्पष्टपणे सचिनने असं केलंच नव्हतं हे सांगत नाही.

सचिनने बॉल टेंपरिंग केलंच नव्हतं, असं मानणाऱ्यांच मत हे प्रामुख्याने सचिन असं काही करूच शकत नाही या गृहितकावर आधारलेलं आहे. टोनी ग्रेग या माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने यावर आपलं मत व्यक्त करताना एकदा असं म्हंटलं होतं की, “तुम्ही जर सचिनचं फुटेज बघितलं असेल आणि तुम्हाला जर क्रिकेट कळत असेल तर सचिनने बॉल टेंपरिंग केलंच नव्हतं, असं म्हणण्याचं धाडस तुम्ही करणार नाही”

सचिनने ‘प्लेयिंग इट माय वे या आपल्या आत्मचरित्रात मात्र या प्रकरणावरचं मौन सोडलंय. “डेनिस यांच्या आरोपानंतर आपल्याला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. फिल्डवरील अंपायरने आपल्याविरोधात कुठलीही तक्रार दिली नसताना अशा प्रकारचा आरोप होणं, हे अपमानजनक होतं. आपण संपूर्ण कारकिर्दीत प्रामाणिकपणे क्रिकेट खेळलेलो आहोत” असं सचिनने या प्रकरणावरील आपलं मत व्यक्त करताना म्हंटलय होत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.