वसीम अक्रमला भारताचा कोच बनवायची गांगुलीची इच्छा पूर्ण झाली नाही पण…

भारत पाकिस्तान आजवर जितक्या मॅचेस झाल्या त्या प्रत्येक मॅचला दोन्ही संघाच्या चाहत्यांनी लोकप्रियतेच्या कळसावर नेऊन ठेवलं. जितकी खुन्नस या दोन देशांमध्ये क्रिकेट खेळताना असायची ती इतर कोणत्याही देशांमध्ये आढळून येत नाही. मैदानावर काही वेळा भिडणारे प्लेअर अशा सामन्यांचा रोमांच वाढवत असत.

आजचा किस्सा आहे वसीम अक्रमचा. वसीम अक्रम हा एकेकाळी भारताचा कर्दनकाळ म्हणून पुढे आला होता. त्यानंतर मात्र जेव्हा जेव्हा तो भारतात आला तेव्हा त्याच्या बॉलींगचं कौतुक व्हायचं पण त्याने महत्वाच्या विकेट मिळवल्या म्हणून भारतीय प्रेक्षक त्याला तुफ्फान शिव्या घालायचे.

वसीम अक्रम हे नाव क्रिकेट विश्वातील एक महत्वाचं नाव आहे. वसीम अक्रमच्या बॉलिंगची धार बघून भले भले बॅट्समन नांग्या टाकत असे.  डावखुऱ्या हाताने तो बॉलिंग करत असे. रिव्हर्स स्विंगचा वापर वसीम अक्रम इतका कोणाला प्रभावीपणे करता आला नाही. त्याने फेकलेल्या यॉर्करवर कितीही चांगला बॅट्समन असो तो चारीमुंड्या चीत व्हायचा.

जगातल्या सर्वोत्तम फास्ट बॉलरच्या यादीत पहिल्या पाच लोकांमध्ये वसीम अक्रमचा नंबर लागतो.

स्विंग बॉलिंगचा सुलतान म्हणून वसीम अक्रम जगभरात ओळखला जातो.

भारतीय क्रिकेट संघ वसीम अक्रमला जास्तच मानतो. कारण त्याने त्यावेळच्या युवा भारतीय गोलंदाजांना बॉलिंग टेक्निक्स सांगून बरीच मदत केली.

पाकिस्तानने आजवर जितके सामने जिंकले त्यात वसीम अक्रमचा मोठा वाटा आहे. १९९२ च्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला जेतेपद मिळवून देण्यात अक्रम आघाडीवर होता. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात त्याने १८ चेंडूत ३३ धावा फाटकावल्या होत्या आणि बॉलिंगमध्ये ४९ धावा देऊन ३ विकेट मिळवल्या होत्या. अंतिम सामन्यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळाला होता.

१९९९ सालच्या वर्ल्डकप वेळी पाकिस्तान संघाचा कर्णधार म्हणून अक्रमची निवड झाली. कर्णधार पदाला साजेशी कामगिरी करत त्याने पाकिस्तानला वर्ल्डकप फायनल पर्यंत नेलं पण ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तान पराभूत झाला. या सामन्यानंतर वसीम अक्रम वर आरोप लावण्यात आले कि त्याने हि मॅच अगोदरच फिक्स केली होती. 

२००३ च्या वर्ल्डकपमध्ये भारताकडून क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाल्याचे खापर अक्रम वर फोडण्यात आले. या घटनेमुळे एकेकाळचा गोलंदाजीचा बादशाह समजल्या जाणाऱ्या वसीम अक्रमला फेअरवेल मॅच सुद्धा खेळायला मिळाली नाही. तो निवृत्त झाला.

वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये ४००हुन अधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड अक्रमच्या नावे आहे.

नंबर ८ वर खेळत असूनही त्याने द्विशतक झळकावलं होतं.

भारत पाकिस्तानच्या सामन्यांदरम्यान सौरव गांगुली वसीम अक्रमच्या बॉलिंगवर कायम खुश असायचा. त्याने फेकलेला रिव्हर्स स्विंग आणि यॉर्कर जगात यापेक्षा बेहतर काहीही नाही असं गांगुलीला वाटायचं. जहीर खानला त्याने अक्रमकडून गोलंदाजीच्या टिप्स घ्यायला सांगितलं होतं. पुढे त्या भारताला उपयोगी आल्या.

भारताचा पेस अटॅक मजबूत करायचा असेल तर वसीम अक्रम भारताचा कोच व्हायला हवा अशी गांगुलीची प्रचंड इच्छा होती.

पण काही कारणास्तव तसं घडू शकलं नाही म्हणून सौरव गांगुलीने २०१० सालच्या आयपीएल स्पर्धेच्या वेळी वसिम अक्रमला कोलकाता नाईट रायडर्स संघाचा बॉलिंग कोच म्हणून निवडलं. भारताच्या युवा गोलंदाजांना वसीम अक्रमच्या अनुभवाचा चांगला फायदा झाला. 

पाकिस्तान आणि भारतात जितके स्विंग बॉलर आहेत त्यांच्यामध्ये वसीम अक्रमची झलक दिसते. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कोच असताना २०१२ आणि २०१४ साली आयपीएल स्पर्धा जिंकण्यात त्यांना यश आलं.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यावर वसीम अक्रम आपल्याला बऱ्याच वेळा क्रिकेट कॉमेंट्री करताना दिसून येतो. एकेकाळी त्याच्या स्विंग आणि यॉर्करने जी खळबळ माजवली होती ती जगभर चर्चेचा विषय होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.