या ऐतिहासिक द्विशतकी खेळीने वसिम अक्रमने अनेक विश्वविक्रम आपल्या नावे केले…!!!

 

आपण त्याला ओळखतो ते आपल्या ‘रिव्हर्स स्विंग’च्या जोरावर जगभरातील दादा बॅटसमनना गुडघे टेकवायला लावणारा तेजतर्रार बॉलर म्हणून. तसा तो उत्तम बॅटिंग करू शकत होता, पण त्यापूर्वी बॅटिंग करताना त्याने फार काही करामती कधीच घडवल्या नव्हत्या. अर्थात १९९० साली त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध झळकावलेलं कारकिर्दीतील त्याचं पहिलं-वहिलं शतक अपवाद होतंच. पण एका प्रसंगी  मात्र त्याने आपल्या बॅटच्या सहाय्याने इतिहास घडवताना आठव्या क्रमांकावर येऊन द्विशतकी खेळी साकारली होती. या खेळीसह आठव्या क्रमांकावरील कुठल्याही बॅटसमनने काढलेल्या सर्वाधिक रन्सचा विक्रम देखील त्याने आपल्या नावे केला होता, जो आजतागायत त्याच्याच नावे आहे. ‘वसिम अक्रम’ त्याचं नांव.

२० ऑक्टोबर १९९६. झिम्बाब्वे संघाचा पाकिस्तान दौरा. शेखुपुरा येथील पहिलीच कसोटी. झिम्बाब्वेचा कॅप्टन ‘अॅलिस्टर कॅम्बेल’ने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता, पण शाहीद नझीरच्या भेदक माऱ्यासमोर झिम्बाब्वेचा संघ ढेपाळताना दिसत होता. अशा वेळी त्यांच्या मदतीस आले ‘ग्रँड फ्लॉवर’ आणि ‘पॉल स्ट्रँग’. दोघांनी झळकावलेल्या शतकाच्या जोरावर झिम्बाब्वेचा डाव सावरला गेला आणि त्यांनी ३७५ रन्स उभारले. प्रत्युत्तरात पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली परंतु अर्धशतकानंतर सलीम मलिक परतला आणि पाकिस्तानच्या  संघाला गळती लागली. एकामागून एक विकेट पडू लागल्या आणि दुसऱ्या दिवसाखेर १८९ रन्सवर ६ अशी त्यांची अवस्था झाली. क्रीझवर होते वसिम अक्रम आणि मोईन खान. अक्रम त्यावेळी पाकिस्तानचा कॅप्टन देखील होता.

तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला आणि चांगली पार्टनरशिप होऊ लागलीये असं दिसत असतानाच टीमचा स्कोअर २३७ असताना मोईन खानला पॉल स्ट्रँगने पॅव्हेलिअनमध्ये पाठवलं. पाकिस्तानचा संघ पुन्हा अडचणीत आला. त्यानंतर आपल्या कॅप्टनला साथ द्यायला सकलेन मुश्ताक मैदानात आला. मुश्ताक मैदानात आल्यानंतर काही वेळातच अक्रमच्या लक्षात आलं होतं की, हीच वेळ आहे ज्यावेळी शक्य तितक्या रन्स चोपल्या जाऊ शकतात. कारण त्यानंतर कुणाकडून बॅटिंगच्या माध्यमातून फार काही अपेक्षा ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता. वसिम अक्रमने ग्राउंडच्या चौफेर फटकेबाजी सुरु केली आणि  पाहता-पाहता त्याने आपल्या कारकिर्दीतलं दुसरं शतक झळकावलं. मुश्ताक सांभाळूनच खेळत होता. तिसऱ्या दिवसाखेर पाकिस्तानचा स्कोअर बोर्ड होता ७ बाद ३९५ रन्स. अक्रम १४४ आणि मुश्ताक ३७.

akram 2

चौथ्या दिवशीचा खेळाच्या सुरुवातीपासूनच अक्रम आक्रमक होता. झिम्बाब्वेच्या जवळपास सर्वच बॉलर्सचे त्याने पिसे काढले होते. तोपर्यंत सकलेन मुश्ताकने देखील आपल्या कारकिर्दीतील पहिलीच फिफ्टी ठोकली होती. सकलेन मुश्ताक ज्यावेळी ७९ रन्सवर आउट झाला तोपर्यंत अक्रम-मुश्ताक जोडीने टीमसाठी ३१३ रन्स जोडले होते. त्यावेळी आठव्या विकेटसाठीच्या  सर्वोत्तम पार्टनरशिपचा रेकॉर्ड या जोडीने आपल्या नांवे केला होता, जो  पुढे २०१० साली जोनाथन ट्रॉट आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी पाकिस्तानविरुद्धच लॉर्डस कसोटीत ३३२ झावांची पार्टनरशिप साकारताना मोडीत काढला. तोपर्यंत वसिम अक्रमने देखील आपले द्विशतक झळकावून इतिहास घडवला होता आणि तो त्रिशतक झळकावण्याच्या दिशेने वाटचाल करत होता.

सकलेन मुश्ताक परतल्यानंतर वकार युनुस मैदानात आला. दोन दिवसांपासून पॅव्हेलिअनमध्ये पॅड बांधून आपल्या बॅटिंगची वाट बघत बसलेल्या वकार युनुस विषयी अक्रमने ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हंटलय की, “ प्रत्येक सेशननंतर आम्ही ज्यावेळी पॅव्हेलिअनमध्ये जायचो त्यावेळी वकार कुठेतरी खुर्चीवर बसलेला असायचा, झोपलेला असायचा किंवा टीव्हीसमोर असायचा. प्रत्येकवेळी तो मला विचारायचा की अजून किती वेळ मला असंच पॅड बांधून पॅव्हेलिअनमध्येच बसायला लागणार आहे…? प्रत्येक्षात जेव्हा वकार युनुस बॅटिंगसाठी ग्राउंडवर आला आणि पहिल्याच बॉलवर बोल्ड झाला, त्यावेळी मी खूप हसलो होतो. अर्थात मला वकारविषयी वाईट वाटलं होतं, पण मला हसणं थांबवता येत नव्हतं”

वकार युनुस परतल्यावर आलेला शाहीद नझीर पण आला तसा परतला त्यामुळे पाकिस्तानचा डाव ५५० रन्सवर संपुष्टात आला. २५७ धावांवर नाबाद राहिलेल्या अक्रमने आपल्या द्विशतकी खेळीदरम्यान अनेक रेकॉर्ड मोडीत काढले. या इनिंगमध्ये त्याने १२ सिक्स आणि २२ फोरचा पाऊस पाडला. आठव्या क्रमांकावरील सर्वाधिक  रन्सचा रेकॉर्ड तर त्याच्या नांवे जमा झालाच पण कसोटीच्या एका डावात सर्वाधिक सिक्सर्स ठोकण्याचा रेकॉर्ड देखील त्याच्याच नावावर जमा आहे. याशिवाय कसोटीत पाकिस्तानी कर्णधाराने साकारलेली ही एका डावातील सर्वोच्च धावसंख्या देखील ठरली. ३०० पेक्षा अधिक विकेट्स नावावर असणाऱ्या बॉलरने एका डावात काढलेल्या सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड देखील अक्रमने या खेळीद्वारे आपल्या नांवे केला. ही कसोटी अनिर्णीत अवस्थेत संपली.

Leave A Reply

Your email address will not be published.