वसिम जाफर क्रिकेटला धर्म मानतो, मग त्याच्यावर क्रिकेटमध्ये धर्म आणल्याचे आरोप का झाले?

वसिम जाफर. दोन वर्षांपूर्वी त्याच नाव चर्चेत आलं होतं तेव्हा त्यानं विदर्भाला रणजीची पहिली ट्रॉफी मिळवून दिली होती, त्याहून विशेष होत ते म्हणजे हि कमाल त्यानं वयाच्या ४१ व्या वर्षी केली होती. ती देखील सलग दोन वेळा. रणजीमध्ये अमोल मुझुमदार यांना मागं टाकत त्यानं सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

त्यामुळेच त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकीर्दीएवढीच रणजीमधील कामगिरी पण तेवढ्याच अभिमानाने सांगितली जाते. आणि ही गोष्ट तो देखील नाकारत नाही.

मुंबईच्या अत्यंत गरीब घरातून आलेल्या वसिमने कोणत्याही वशिलेबाजीशिवाय क्रिकेटच्या विश्वात आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. लहानपणी वडील म्हणत असलेल्या,

“जाफर नाम अपने देश के टीम मे मुझे देखना है” 

या वाक्याला त्यानं खरं करून दाखवलं, एवढचं काय तर एका आंतरराष्ट्रीय संघाचं प्रशिक्षक पण होऊन दाखवलं.

अशा या आयुष्यभर क्रिकेट या खेळाला आपला धर्म मानणाऱ्या जाफरच्या आयुष्यात सध्या त्याच क्रिकेटमध्ये धर्माच्या आधारवर भेदभाव केल्याची टीका होऊ लागली आहे, त्यामुळे लेखाच्या सुरुवातीला सांगितलेल्या पहिल्या घटनेनंतर जाफर आता पुन्हा दुसऱ्यांदा चर्चेत आला आहे.

त्याच झालं असं की,

वसिमला जून २०२० मध्ये उत्तराखंडच्या क्रिकेट टीमचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली. या नियुक्तीला आत्ता ८ महिने उलटल्यानंतर संघ निवडीत आपल्या स्वातंत्र्य न देता क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याचे सांगत वसिमने राजीनामा दिला.

या आरोपांच्या उत्तरात क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडच्या सेक्रेटरी महिम वर्मा, निवड समितीचे अध्यक्ष रिजवान शमशाद आणि टीम मॅनेजर नवनीत मिश्रा यांनी जाफरवर आरोपांची रीघ लावली. यात टीमच्या निवडित धार्मिक भेदभाव केल्याचा आणि बायो-बबलमध्ये ट्रेनिंगदरम्यान कँपमध्ये नमाजसाठी मौलवींना बोलव्याचे प्रमुख आरोप आहेत.

हे सगळे आरोप हिंदीमध्ये होते, पण गंभीर होते. त्यामुळे संध्याकाळपर्यंत जाफरने त्यावर स्पष्टीकरण दिले, यानंतर जस जशी रात्र होत गेली तसं बरेच क्रिकेटर्स जाफरच्या समर्थनार्थ पुढे आले.

क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडने वसिम जाफरवर नेमके कोण-कोणते आरोप केले आहेत?  

महिम वर्मा आणि रिजवान शमशादने आरोप केला की, जाफरने कुणाल चंदिलाच्या जागी इकबाल अब्दुल्ला याला कर्णधार बनवले. इकबालला पुढे नेण्यासाठी सलामीला फलंदाजी करायला पाठवले आणि ओपनर चंदिलाला मिडल ऑर्डरला पाठवले.

तसेच, बायो-बबलम ट्रेनिंग कँपमध्ये मौलवी बोलवून जाफरने संघाचा स्लोगन ‘राम भक्त हनुमान की जय’ बदलायला लावला. जाफरने कथितरित्या याला ‘गो उत्तराखंड’ केले.

यावर स्पष्टीकरण देताना वसिम जाफर म्हणाला आहे, 

हे आरोप अत्यंत गंभीर आहेत, त्यामुळेच मला माझी बाजू मांडावी लागणार आहे.  मी माझ्या इमेल मध्ये याआधीच राजीनाम्याची सर्व कारण दिली आहेत, आणि मी त्याच्यावर ठाम देखील आहे. पण यानंतर या प्रकरणाला धार्मिक रंग देणं आणि त्यावर मला सप्ष्टीकरण द्यायला लावणं ही खूप, खूप दुःखद गोष्ट आहे.

इतक्या मोठ्या कालावधीसाठी खेळल्यानंतर देशाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर मला असल्या तुच्छ गोष्टीवर डिफेन्ड करावं लागत आहे.

आरोपांबद्दल सांगायचं झालं तर, 

मी महिम आणि शमशाद म्हणालो होतो की, संघाचा कर्णधार जय बिष्टाला बनवले जावे. तो तरुण आहे आणि कर्णधार होण्यास तयार आहे. ते त्यावेळेस तयार झाले, पण टूर्नामेंटसाठी आल्यानंतर त्यांनी इकबालला कर्णधार बनवण्यास सांगितले. याच कारण त्यांनी सांगितलं की, इकबाल सिनिअर आहे आणि त्याच्याकडे आयपीएल खेळल्याचा अनुभव देखील आहे.

मौलवी, मौलाना यावर जाफर म्हणाला, हे सगळे शुक्रवारी आले होते. मी त्यांना बोलवलं नव्हतं. त्या लोकांना इकबाल अब्दुल्लाने कॉल करुन बोलावलं होत. शुक्रवारी जुम्मा नमाज असती. जर मी धार्मिक असतो तर त्या दिवशी सकाळी ९ त १२ प्रॅक्टिस ठेवली असती, आणि १: ३० वाजता जावून २ पर्यंत जुम्मा नमाज अदा केला असता.

मी हे सगळं करु शकत होतो. पण आम्ही रोज १२-१२:३० वाजता प्रॅक्टिसला सुरुवात करायचो. फक्त शुक्रवारसाठी इकबालने परवानगी घेवून ठेवली होती. कारण तिथं तीन-चार जण अजून होती. प्रॅक्टिस संपवल्यानंतर फक्त शुक्रवारी ड्रेसिंग रुममध्ये आम्ही पाच मिनीटांची नमाज अदा करायचो. या व्यतिरीक्त काहीच झालं नाही आणि बायो बबलच उल्लंघन कधीच झालेलं नाही.

यावेळी जाफरने स्लोगन ‘राम भक्त हनुमान की जय’ वरही स्पष्टीकरण दिलं. तो म्हणाला की, ‘जय श्री राम किंवा जय हनुमान’ स्लोगन मी कँपमध्ये कधीच ऐकले नाही. प्रॅक्टीस मॅच दरम्यान काही खेळाडू ‘रानी माता सच्चे दरबार की जय’ घोषणा द्यायचे. ही शिख समाजातील घोषणा असून, संघातील दोन शिख खेळाडू ही घोषणा द्यायचे.’

‘सैयद मुश्ताक अली टूर्नामेंटसाठी आम्ही बड़ौदात गेल्यानंतर चंद्रकांत पंडित आणि काही खेळाडूंच्या सांगण्यावरुन मी ‘गो उत्तराखंड’, ‘लेट्स डू इट उत्तराखंड’, ‘कम ऑन उत्तराखंड’च्या घोषणा देण्याबद्दल सुचवले होते, मला जर तिथं काही धार्मिक भेदभाव करायचा असता, तर मी अल्ला-हु-अकबर म्हणायला लावले असते,.

या सगळ्या आरोप – प्रत्यारोपानंतर जाफरच्या समर्थनार्थ अनेक खेळाडू पुढे आले आहेत.

यात पाहिलं नाव आहे भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि कॅप्टन अनिल कुंबळे यांचं.

त्यांनी ट्विट करत आपण वसिम सोबत असल्याचं म्हंटल आहे. 

माजी बॉलर इरफान पठानने पण वसिम सोबत असल्याचं म्हंटल आहे. 

‘दुर्भाग्याची गोष्ट आहे की, यावर तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागत आहे.

 

बंगाल आणि भारतासाठी खेळणाऱ्या मनोज तिवारीने तर ट्विट करत थेट,

या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. 

माजी क्रिकेटर डोडा गणेश यांनी देखील जाफरच्या समर्थनामध्ये ट्विट केलं आहे. 

ते म्हणतात,

वसिम जाफर, तुम्ही खेळातील एक महान अम्बेसडर राहिले आहात. आणि अगदी गर्वाने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. या गोष्टीवर विश्वास बसत नाही कि, तुमच्यासोबत असं काही घडत आहे. 

आता या सगळ्याचा शेवट जो काही असेल, पण एक गोष्ट नक्की आहे की, यांच्यात दोन्ही बाजूंवर तेवढीच चिखलफेक झाली आहे. त्यानंतर क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडचे सचिव महिम वर्मा म्हणाले देखील असतील की, त्यांनी जाफरला कधीच धार्मिक म्हंटलेलं नाही, पण त्याआधी जे व्हायचं ते नुकसान होऊन गेलं आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.