जाफरने सिद्ध केलेय, तो अजूनही संपलेला नाही.

काल तो विदर्भासाठी खेळायला उतरला तेव्हा त्याचा हा दिडशेवा रणजी सामना होता.  याच वर्षी त्याने विदर्भाला रणजी कप जिंकुन दिला होता.  अनेकांना धक्का बसला वासिम जाफर अजून खेळतोय? आता तो एकेचाळीस वर्षाचा झालाय.

आपण त्याला विसरून जवळपास दहा वर्षे झाली असतील.

१६ फेब्रुवारी १९७८, वसीमचा जन्म मुंबईच्या बांद्रयाच्या एका चाळीत झाला. त्याचे वडील अब्दुल कादिर जाफर हे एक बस ड्रायव्हर होते. पण त्यांना क्रिकेटचे खूप वेड. वसीमला लहानपणीची आठवण म्हणजे कायम रेडीओला कान लावून कॉमेंट्री ऐकणारे वडील. त्यांना कधी क्रिकेट खेळायला मिळालं नाही पण त्याचं स्वप्न होत आपला एक तरी मुलगा देशासाठी खेळावा.

“जाफर नाम अपने देश के टीम मे मुझे देखना है”

वसीमचा मोठा भाऊ कलीम हा सुद्धा चांगला खेळायचा. पण जेव्हा वसीम खेळू लागला तेव्हा दोन मुलांचा कोचिंगचा, बॅट-पॅड अशा साहित्याचा खर्च त्यांच्या वडिलाना झेपेना झाला. अखेर मनावर दगड ठेवून कलीमने आपल्या भावासाठी क्रिकेट बंद केलं. घरच्या खर्चाला हातभार लावावा म्हणून तो रिक्षा चालवू लागला. आईने बनवलेले लोणचे विकू लागला.

अवघा बारा वर्षाचा असतानाच वसिमच्या लक्षात आले आता आपल्याला चांगली बॅटिंग करण्यावाचून पर्याय नाही. 

वडीलांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी फक्त आपल्यावरच आहे. भावाच्या त्यागाचं ओझ सुद्धा त्याच्या खांद्यावर येऊन पडल होत.

वसीम जाफर आपल्या वडिलांच्या समवेत source- rediff

क्रिकेटसाठी फेमस असणाऱ्या अंजुमन इस्लाम शाळेत त्याला दाखल करण्यात आलं.  शाळेत सुद्धा तो हुशार होता. पण दिवसभर तो फक्त आणि फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत होता. त्याचा भाऊ त्याचा सराव करून घ्यायचा.

अंजुमन कडून खेळताना वसीम एका सामन्यात ७७ धावावर खराब फटका मारून बाद झाला. पॅव्ह्लीन मध्ये आल्या आल्या त्याच्या भावाने त्याला एक जोरदार कानाखाली दिली. वसीम खाड करून जागा झाला. असं बेजबाबदार खेळन त्याला परवडणार नव्हत. त्याच सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने धडाकेबाज  ४०० धावा केल्या. मुंबईच्या शालेय क्रिकेटवर्तुळात त्याची चर्चा झाली. तरी त्याची सोळा वर्षा खालीलच्या मुंबई संघात निवड होऊ शकली नाही.

पंधरा वर्षाचा वसीम त्या दिवशी खूप रडला. क्रिकेट हा बेभरवशाचा खेळ आहे. यापुढे हे तो अनुभवणारच होता त्याचा अनुभव त्याला पहिल्यांदाच आला.

मुंबईच्या खेळाडूना खडूस म्हणतात. ते सहजासहजी हार मान्य करत नाहीत. वसीम मध्ये ही चिकाटी पुरेपूर उतरली होती. त्यानंतर पुढच्या काही वर्षात त्याने जो खेळ केला त्याला थेट मुंबई रणजी टीममध्ये घेण्यावाचून सिलेक्शन कमिटी पुढे दुसरा पर्याय नव्हता.

आपल्या दुसऱ्याच रणजी सामन्यात त्याने ट्रिपल सेंच्युरी ठोकली. उजव्या हाताने खेळणारा वसीम तांत्रिकदृष्ट्या तगडा खेळाडू होता. ओपनिंगला येऊन नव्या चेंडूवर गोलंदाजी करणाऱ्या सुपरफास्ट बॉलरना खेळणे त्याची खासियत होती. बॅकफुटवर खेळून मनगटाने बॉलची दिशा बदलवण्याचा त्याच्या स्टाईलमुळे त्याला पुढचा अझरूद्दीन अशी ओळख मिळाली होती.

फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये नाव कमावल्यावर २०००साली त्याला दक्षिण आफ्रिकेच्या सिरीजमध्ये चान्स मिळाला. एवढी वर्षे त्याच्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं होत. वडिलांच्या डोळ्यात दिसणारा अभिमान तो कधीच विसरू शकला नाही.

त्या सिरीजमध्ये त्याला विशेष कामगिरी बजावता आली नाही त्यामुळे त्याचं टीम मधून स्थान गेलं. पण वसीम देशांतर्गत स्पर्धेत खोऱ्यान धावा बनवतच राहिला.  त्याच्याकडे क्षमता आहे हे सगळ्यांना माहित होते. यामुळेच २००२चा वेस्ट इंडीज आणि इंग्लंड दौऱ्यात त्याला संधी दिली गेली पण आपल्या क्षमतेनुसार खेळता न आल्याने त्याला परत बाहेर बसवण्यात आलं.

अखेर २००६ साली त्याला फायनल चान्स मिळाला. त्याला सुद्धा ठाऊक होत आपल्याला परत संधी मिळणार नाही. त्या सिरीजमध्ये त्याने आपले पहिले शतक ठोकले. २००६ ते २००८ ही तीन वर्षे त्याच्यासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हती. याकाळात जाफरने दोन द्विशतके मारली. आपल्या इथे तांत्रिक दृष्ट्या सक्षम खेळाडूना टेस्ट प्लेयरचा शिक्का मारला जातो. म्हणून त्याला वनडे मध्ये जास्त चान्स मिळाला नाही.

२००८ साली भारतिय टीम ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेली. त्यावेळी ब्रेटलीच्या वेगवान माऱ्यापुढे वसीम टिकू शकला नाही. तिथे त्याला मिळालेलं अपयश त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधली कारकीर्द संपण्यास कारणीभूत ठरलं. कसोटीत सेहवागची ओपनिंग जोडी गंभीर बरोबर जमली. तिथून पुढे कधीच जाफर भारताकडून खेळू शकला नाही.

पण त्याने हार मानली नाही. तो रणजी मध्ये रन्स ठोकतच होता. मुंबईला त्याने दोन रणजी ट्रॉफी मिळवून दिली. हजारो रन्स बनवल्या पण निवड समितीच्या दगडाला पाझर फुटला नाही. वर्षानुवर्षे फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये आपल्या धावांचा रतीब तो घालतच राहिला.

जाफर फॉर्म मध्ये होता पण त्याच वय होत चालल होत. त्याला किती वर्ष खेळवणार त्याच्या ऐवजी नव्या खेळाडूला चान्स द्यावा असं मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या मनात आलं. पण त्या आधीच वसीमने आपल्या लाडक्या मुंबई रणजी टीमचा अलविदा घेतला. सर्वाना वाटले जाफर आता रिटायरमेंट घेतोय. पण त्याने विदर्भाशी करार केला होता.

विदर्भाकडून मात्र त्याला जखमी झाल्यामुळे पहिला सीजन खेळताच आला नाही. त्यांनी त्याला इंज्युर्ड असून देखील त्या सिझनचे मानधन दिले. ही गोष्ट वसीमच्या मनात खूप घर करून राहिली होती. त्याने पुढचा अख्खा हंगाम खेळताना त्याने विदर्भ क्रिकेट असोशिएश्न कडून एक रुपया देखील घेतला नाही. 

२०१८ साली त्याने विदर्भाला पहिली रणजी जिंकून दिली. विदर्भ रणजी जिंकू शकतो हे कोणालाच पटत नव्हते. त्यावर्षी त्यांनी इराणी चषक सुद्धा जिंकला. त्यांची ही विजयी घोडदौड या वर्षीसुद्धा चालूच राहिली. यावर्षीसुद्धा विदर्भच रणजी चँम्पीयन ठरला.  याकाळात जाफर ने फर्स्ट क्लास क्रिकेटचे अनेक विक्रम बनवले. भारतातर्फे सर्वात जास्त प्रथम श्रेणी क्रिकेटधावा बनवणारा तो खेळाडू ठरला. सर्वाधिक शतक ,अर्धशतक त्याच्याच नावावर आहे. काल त्याने सर्वाधिक रणजी सामने खेळण्याचा विक्रम केला.

आजही तो मुंबईत लोकलने प्रवास करतो. त्याच्या रिटायरमेंटच्या चर्चा हसत हसत ऐकतो.

आपल्याबरोबर जे काही घडले याचा त्याबद्दल त्याचं त्याला काहीच दुःख नाही.

“उपरवाले ने मुझे उम्मीदसे ज्यादा सब कुछ दिया. अपने देस के लिये खेलना ,मेरे अब्बा की ख्वाईश पुरा करना, दस रणजी ट्रॉफी जितना ये सब एक सपने से भी ज्यादा है.”

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.