दोन सिटांच्या जोरावर बिहारच्या राजकारणात भौकाल?

सरकार बदलणार, सत्ता पलटणार हे शब्द महाराष्ट्राच्या जनतेसाठी काही नवीन नाहीत. गेल्या काही दिवसांत बिहारमधल्या जनतेच्या कानावरही हे शब्द सारखेच पडतायत. लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी असा दावा केलाय की, पोटनिवडणुकीत आमची दोन सीटं निवडून आली, तर बिहारच्या राजकारणाची सूत्रं आम्हीच हलवणार.

आता इथं शंभरच्यावर सीटं येऊन विरोधात बसावं लागतंय किंवा तीन पक्ष एकत्र येऊन सत्ता मिळवावी लागतेय. तिकडं तेजस्वीभाऊ दोन सिटांच्या जोरावर खळबळ कशी करणार? राजकारणात काही अशक्य नसतंय म्हणा. तेजस्वी यादवांनी मांडलेलं गणित तुम्हाला सांगतो.

सध्या बिहारमध्ये भाजप आणि जनता दल यांचं अल्पमतातलं सरकार आहे. त्यांच्याकडे १२५ आमदारांचं संख्याबळ आहे. तर सर्वाधिक ७५ जागा मिळवलेलं राजद, काँग्रेस आणि डाव्यांसोबत आघाडी करूनही विरोधी बाकांवर आहे.

बिहारचं राजकारण तापलंय ते पोटनिवडणूकांमुळे. जनता दलाचे आमदार मेवालाल चौधरी आणि शशी भूषण हजारी यांच्या मृत्यूमुळे दोन जागा रिक्त झाल्या आहेत. तेजस्वी यांनी या दोघांच्या मृत्यूसाठी नितीशकुमार सरकारला दोषी धरलं आहे. राज्यात अपुऱ्या आरोग्यसुविधा असल्यानं व्यवस्थेनं त्यांचा बळी घेतल्याचा आरोप तेजस्वी यांनी केला.

आता या पोटनिवडणुका आम्हीच जिंकणार असा आत्मविश्वास राजदकडे आहे. तेजस्वी म्हणतात, ‘आम्ही दोन्ही जागा जिंकलो तर येत्या काही महिन्यांत तुम्हाला एक खेळ पाहायला मिळेल.’ आता दणक्यात प्रचार, फुल्ल जोश असला तरी ही दोन सीटं सहज जिंकणं अवघड आहे. कारण विषय असा झालाय की, राजदच्या आघाडीत सामील असणाऱ्या कॉंग्रेसनंही या जागांवर आपले उमेदवार उभे केलेत. त्यामुळं त्यांच्यातच दहीहंडी होणार आणि भाजपचा उमेदवार लोणी खाणार अशी चर्चाही आहे.

ही दोन्ही सीटं मारली, तरी राजद-काँग्रेस-डाव्यांच्या महागठबंधनचं संख्याबळ होणार ११२ आमदारांचं. सत्तेची मॅजिक फिगर तरी कमी राहणारच. पण तेजस्वीभाऊ जितक्या आत्मविश्वासानं भिडतायत बघता त्यांच्या डोक्यात मोठं बुद्धीबळ सुरू असणार हे फिक्स.

येत्या काळात बिहारमध्ये फोडाफोडी, इनकमिंग-आऊटगोईंग होणार का? तेजस्वी यादव म्हणतात तशी राजकीय उलथापालथ होणार का? हे बिहारच्या मतदारांच्याच हातात आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.