आपण बाटल्या भंगारात टाकतो, या गड्यांनी त्याच कचऱ्यातून बिझनेस उभा केला
लेदरचा शूजची एक जोडी बनवायला किती लिटर पाणी लागत माहित आहे का ? एकदा युट्युब वर, गुगल करून माहिती काढा. तुमचा विश्वासच बसणार नाही. लेदरच्या एका शूजची जोडी बनवायला ९ हजार लिटरपेक्षा जास्त पाणी लागत.
वाचून फ्युज उडाले ना ? इथं मराठवाडा, विदर्भात एक हंडा पाणी मिळविण्यासाठी किती कष्ट उपसावे लागतात हे तुम्हाला माहितीच असेल. म्हणजे तुम्ही घालत असलेल्या लेदर शूजला तयार करायला किती पाणी हे तुमच्या लक्षात आलं असेलच.
हे सगळं लक्षात घेऊन पाणी बचत, पर्यावरणाची हानी याबद्दल जागरूक असणाऱ्या दोघांनी स्टार्टअप अंतर्गत एक फूटवेअर ब्रँड तयार केलाय. नीमन्स हा भारतातील पहिला फुटवेअर ब्रँड आहे जो शूज, चप्पल बनवतांना नैसर्गिक, रिसायकल, प्लस्टिकच्या टाकाऊ वस्तुंचा वापर करतो.
नैसर्गिक, हलके, लवचिक, गंध-प्रतिरोधक, उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार अशी निमन्सच्या शूजचे वैशिष्टय आहे.
शूज तयार करणाऱ्या ढीगभर कंपन्या भारतीय बाजारात आहेत. मात्र, यातील एकही ब्रँड हा पाणी बचत, पर्यावरणाला हानी होणार नाही याचा विचार करून शूज बनवत नाही. आपल्या ब्रँडची वस्तू अधिक काळ टिकावी याच हेतूने शूज कंपन्या काम करतात. पर्यावरणाची हानी किती होते याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत. यात राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय, ब्रँडचा देखील समावेश आहे.
तरण छाबरा आणि अमर प्रीत सिंग या तरुणांनी पहिला भारतीय पर्यावरणपूरक फुटवेअर ब्रँड तयार केला आहे. आई वडिलांच्या नावावरून त्यांनी या ब्रँडला नीमन्स असे नाव दिले.
नीमन्सची उठाठेव ही वैयक्तिक गरजेतून
सध्या आपण जे शूज वापरतो ते मृत प्राण्यांच्या चामडं, दूषित रंग या पर्यावरणासाठी हानिकारक असणाऱ्या वस्तूंपासून बनविण्यात येतो. मात्र, छाबरा यांच्या डोक्यात फुटवेअर कंपनी सुरु करण्याचा विचार केला तेव्हा त्यांनी ठरवले होते की, इतर कंपन्या ज्या प्रकारे शूज तयार करून पर्यावरणाचा ऱ्हास करतात ते आपण करायचे नाही. अशा वस्तू वापरायच्या की, ज्यामुळे प्रदूषण होणार नाही.
त्यापूर्वी २०१६ मध्ये तरण छाबरा हे एका कामानिम्मित स्पेन जाणार होते. ऑफिसचे काम आणि एक फॅमिली प्रोग्रामला असं त्यांचं नियोजन होते. ऑफिससाठी आणि फॅमिली प्रोग्रॅमसाठी असे दोन वेगळे शूज सोबत घ्यावे लागले. त्यामुळे त्यांना इतर वस्तू कमी नेता आल्या.
त्यानंतर त्यांच्या डोक्यात आले की, सर्व ठिकाणी एकच शूज घालता येईल असे खूप कमी पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. तसेच त्यांनी प्रवासात अनेकांना विचारलं की, तुम्ही शूज घेतांना काय विचार करता. सगळ्यांच्या उत्तरात एक साम्य होते.
दिवसभर घातला तरी कुठलाही त्रास होणार नाही. अशा प्रकारचे शूज आम्ही खरेदी करतो.
तरण छाबरा आणि अमर प्रीत सिंग यांच्या डोक्यात ही गोष्ट फिक्स घुसली. कम्फर्ट शूज कसा तयार करता येईल याकडे त्यांनी सगळे लक्ष वळविले. डोक्यातलं खूळ त्यांना शांत बसू देत नव्हतं. त्यावेळी त्यांनी भारतीय मार्केट मध्ये उपलब्ध असणाऱ्या ब्रँडचा अभ्यास केल्यावर समजले की, यातील एकही कंपनी पर्यावरण पूरक काम करत नाही.
तरण आणि अमर यांनी पर्यावरणाशी समतोल साधणारा शूज ब्रँड तयार करावा असे ठरविले. याच प्रयत्नानंतर २०१८ मध्ये नीमन्स फुटवेअर ब्रँड बाजारात आणले. नीमन्स हे नाव त्यांच्या आई वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. आईचे नाव नीलम तर वडिलांचे नाव मनजीत आहे.
नीमन्सकडून तयार करण्यात येणारे स्नीकर्स हे कचऱ्यातील पाणी बॉटल, टायर आणि टाकून देण्यात आलेल्या कापडाचा पुनर्वापर करून तयार करण्यात येतात. हे शूज केवळ पर्यावरण पूरकच नाही तर टिकाऊ असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येते.
आदिदास, नाईकी, वुडलँड, बाटा सारख्या ब्रँडचा बाजारात दबदबा कायम आहे. एखादा नवीन ब्रँड बाजारात येऊन जम बसविणे सोपं काम नसतं. निमन्स बाजारात आपला वेगळा ठसा उमटवला सून मागच्या १२ महिन्यात कंपनीची ग्रोथ १५ टक्क्यांनी वाढली आहे.
कचऱ्यातील १० लाख पाणी बॉटल आणि टायर वापरून मागच्या तीन वर्षात ३ लाखांपेक्षा अधिक शूज जोड्या विकण्यात आल्याचे तरण छाबरा सांगतात.
निमन्सची पर्यावरण संदर्भात असणारी आस्था पासून तेलंगणा सरकारकडून त्यांना आशादायक स्टार्टअप म्हणून गौरव केला आहे.
हे ही वाच भिडू
- स्टार्टअप इकोसिस्टिमचा ‘बॅड बॉय’ म्हणून आजही या स्टार्ट-अप फाउंडरचं नाव घेतलं जातं.
- या भावड्याच्या स्टार्टअपने अमेरिकेच्या शार्क टॅंकमधून गुंतवणूक मिळवलीय
- कुमार सानू ते द्रविड ; क्रेड ला 90’s जॉनर कळला अन् कंपनी सुसाट सुटली