वर्ष बदलली, टीमा बदलल्या, पण साऊथ आफ्रिकेशी मॅच म्हणल्यावर हेच प्लेअर्स आठवतात…

वानखेडे स्टेडियम खचाखच भरलेलं, भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका वनडे मॅच. दुपारचं ऊन वगैरे किरकोळ गोष्टींचं कौतुक कुणालाच नव्हतं. आफ्रिकेनं टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली. त्यांची पहिली विकेट स्वस्तात गेली आणि मग फाफ डू प्लेसिस आणि क्विंटन डी कॉकनं खतरनाक हाणामारी केली. डी कॉक शंभर मारुन आऊट झाला तेव्हा आफ्रिकेचा स्कोअर २ आऊट १८७ होता, स्टेडियममध्ये खतरनाक कल्ला सुरु झाला आणि हा आनंद विकेट पडली म्हणून नव्हता. हा कल्ला सुरु होता, कारण आता बॅटिंगला येणारा प्लेअर होता एबी डिव्हिलिअर्स. सगळं वानखेडे एका सुरात ‘एबीडी, एबीडी’ ओरडत होतं.

या मॅचमध्ये एबीडीनं ६१ बॉलमध्ये ११९ रन्स मारले, त्यात ३ फोर होत्या आणि ११ सिक्स. थोडक्यात एबीडीनं भारतीय बॉलिंगचा बाजार उठवला होता, मात्र तरीही प्रत्येक सिक्सनंतर त्याच्या नावाचं चिअरिंग व्हायचं, जे एबीडी आऊट झाल्यावर पॅव्हेलियनमध्ये जाईपर्यंत थांबलं नाही.

त्या मॅचमध्ये आफ्रिकेनं ४३८ रन्स मारले, भारताचा डाव २२४ वर खंगाळला, आपण २१४ रन्सनं हरलो. तरीही मेजॉरिटी भारतीय चाहते दु:खी नव्हते, ही होती आफ्रिकन क्रिकेट टीमची ताकद…

२८ सप्टेंबरपासून भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका टी२०सिरीज भारतात खेळवली जाईल. आता आफ्रिकन टीमची आधीसारखी दहशत राहिली नाही हे खरं. पण भारतीय चाहतेही या सिरीजचा लोड घेत नाहीत. मीडियातही ‘क्रिकेट का घमासान’, ‘अब होगा बदला’ असल्या बातम्या दिसत नाहीत, कारण आफ्रिकन टीम भारतीय चाहत्यांना काही प्रमाणात का होईना पण ‘आपली’ वाटते.

आता याची कारणं तशी बरीच आहेत, पण मेन कारण म्हणजे प्लेअर्स. साऊथ आफ्रिकन टीमशी मॅच म्हणल्यावर काही प्लेअर्स आपल्याला फिक्स आठवतात.

१) पहिलं नाव अर्थात एबी डिव्हिलिअर्स –

मिस्टर ३६० म्हणून एबीडीची सगळ्या क्रिकेट जगतात हवा आहे. गडी ग्राऊंडच्या कुठल्याही कोपऱ्यात किरकोळीत शॉट्स हाणू शकायचा, फिल्डिंगला थांबला तरी बादशहाच असायचा. त्यात आयपीएलमध्ये आरसीबकडून  खेळताना त्याला प्रचंड प्रेम मिळालं. त्यानं बँगलोरला लई मॅचेस जिंकून दिल्या म्हणून नाही, तर तो भारी खेळायचा म्हणून.

 एबीडीचं मैदानाबाहेरचं वागणं, प्रचंड टॅलेंट असून अजिबात माज नसणं या गोष्टी त्याला भारतीयांच्या फेव्हरिट बनवत गेल्या. म्हणूनच भले रिटायर झाला असला, तरी आजही भारतात असलेल्या एबीडीच्या क्रेझला कुणीच तोड देऊ शकलेलं नाही.

२) फिल्डिंगचा बादशहा जॉन्टी ऱ्होड्स –

जॉन्टी बाबत एक गोष्ट कायम सांगितली जाते की, त्याला फक्त फिल्डिंगच्या जोरावर टीममध्ये चान्स मिळाला असता. जॉन्टीची भारतातली लोकप्रियता सांगायची झाली, तर आजही गल्ली क्रिकेटमध्ये एखाद्या प्लेअरनं ‘डाय’ मारुन कॅच घेतला की त्याचं कौतूक जॉन्टीच्याच नावानंच केलं जातं.

 आयपीएलमध्ये वेगवेगळ्या टीम्सचा फिल्डिंग कोच म्हणून जॉन्टी रिटायरमेन्ट नंतरही आपल्याला दिसत राहिला, त्यात भावानं आपल्या पोरगीचं नाव ‘इंडिया’ ठेवलं आणि भारतीय चाहते सुखावले.

३) स्टेनगन –

ऍक्शन, स्पीड आणि अचूकता या तिन्ही पातळ्यांवर डेल स्टेनचा नाद नव्हता. स्टेनची फास्ट बॉलिंग बघणं म्हणजे भारी विषय असायचा. त्यात जेव्हा त्याचा आऊट स्विंगर बॅट्समनचं दांडकं उडवायचा तेव्हा तर विषय कट. स्टेननं भारतीय बॅटिंगचाही अनेकदा बाजार उठवला होता. पण तरीही स्टेन आवडण्याची दोन मेन कारणं होती, ज्या खुंखार स्टाईलनं तो भारतीय बॅट्समन्सचे स्टम्प्स उडवायचा त्याच स्टाईलनं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या बॅट्समनचेही आणि भिडू जगातली सगळी सुखं एका बाजूला आणि या तीन देशांच्या खतरनाक बॅट्समन्सला बोल्ड होताना पाहण्याचं सुख एका बाजूला. हे सुख आपल्याला देण्यात स्टेन टॉपला होता. दुसरं कारण म्हणजे स्टेननं भारतीय बॉलर्स घडवण्यात कधी हातचा राखला नाही. भारताचा सगळ्यात फास्टेस्ट बॉलर म्हणून नावारुपाला येत असलेला उमरान मलिकही स्टेनच्याच हाताखाली घडतोय.

४) हॅन्सी क्रोनिए –

नाव ऐकल्यावर सगळ्यात आधी मॅच फिक्सिंगची काँट्रोव्हर्सीच आठवते, खरं क्रोनिए प्लेअर म्हणून भारी होता. त्यानं आफ्रिकन टीमला मोठ्या ट्रान्झिशन फेजमधून पुढं आणलं. नवे प्लेअर्स घडवले, त्याच्याच काळातली आफ्रिकन टीम कुणालाही पद्धतशीर भिडायची. क्रोनिएमुळं फिक्सिंगचं मोठं रॅकेट उघडकीस आलं, ज्यात दुर्दैवानं भारतीय खेळाडूंवरही आरोप झाले, पण तरीही क्रोनिए कायम आठवणीत राहिला. 

हॅन्सी क्रोनिएबद्दल बोल भिडूनं लिहून ठेवलंय, जे तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन वाचू शकता.

क्रोनिए हिरो की व्हिलन याचं उत्तर मिळतं, पण त्याच्या मृत्यूच्या कारणावर विश्वास बसत नाही

५) पॉल अ‍ॅडम्स –

बेडूक अ‍ॅक्शनवाला बॉलर भिडू. तो असा काळ होता जेव्हा फास्ट बॉलर स्पीडमुळं आणि स्पिनर कार्यकर्ते टर्नमुळं लक्षात राहायचे. पण हा गडी अ‍ॅक्शनमुळं लक्षात राहीला. साऊथ आफ्रिकेत इम्रान ताहीर, केशव महाराज असे मोजकेच स्पिनर्स नावाजले गेले, पण विकेट्स-बिकेट्सच्या पलीकडे जाऊन पॉल अ‍ॅडम्सनं मार्केट खाल्लं होतं. शारजावर झालेल्या आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं भारतीय बॅटिंगचा पार धुरळा उडवला होता, पण आफ्रिकेचा स्पिनर रनअप घ्यायला लागला की पहिलं आठवणारं नाव अ‍ॅडम्सचंच असतंय.

जुन्या आठवणींची ट्रिप मारायची असली, तर खाली दिलेली लिंक एकदा बघून घ्या..

पॉल अ‍ॅडम्सची बेडूक अ‍ॅक्शन बघून बॅट्समनला चक्कर यायची.

६) गॅरी गुरूजी –

एबीडीपेक्षा कुठल्या आफ्रिकन क्रिकेटरमुळं आपण जास्त खुश झाले असू तर गॅरी कर्स्टन. कर्स्टन प्लेअर म्हणून नाही पण कोच म्हणून फिक्स लक्षात राहतो. २००७ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघानं पार खराब माती खाल्ली होती, तिथनं थेट २०११ च्या वर्ल्डकप विजयापर्यंत भारतीय टीम गेली आणि तेही थाटात. याचं जितकं श्रेय प्लेअर्सचं, तितकंच कोच म्हणून टीम बिल्ड करणाऱ्या, थंड डोक्याच्या कोच गॅरी कर्स्टनचंही होतं.

आणखी प्लेअर्स सांगायचे झाले तर, सेम द्रविडसारखा खेळणारा, आपल्या दाढीमुळं लक्षात राहिलेला भारतीय वंशाचा हाशिम आमला, आजही जगातले सगळ्यात बाप ऑलराउंडर अशी ओळख असणारे जॅक कॅलिस आणि शॉन पोलॉक, कॅप्टन परफेक्ट ग्रॅम स्मिथ, चेन्नईचा लाडका फाफ डू प्लेसिस, ज्याची बॉलिंग बघून भीती वाटायची असा मखाया एण्टीनि, भले भारतीय पोलिसांच्या रडारवर असला तरी हँगओव्हरमध्ये असूनही ऑस्ट्रेलियाचा माज मोडणारा हर्शेल गिब्स.. 

नावं घ्याल तितकी कमी…

आजही भारत विरुद्ध आफ्रिका मॅच म्हणलं तरी आपल्याला हेच चेहरे आठवतात, ज्यांनी अनेकदा भारताला हरवलं असेलही, पण क्रिकेटचा आनंद लुटायलाही यांनीच शिकवलं, हे काय आपण विसरत नसतोय.

आता हे प्लेअर्स आवडण्याची सोपी कारणं होती, या पोरांनी कधीच माज दाखवला नाही, हे कधी भारतीयच नाही तर कुठल्याही टीमला उगाचच स्लेज करायच्या नादात कधी पडले नाहीत आणि हा कितीही नाही म्हणलं तरी, फायनल-सेमीफायनलला जाऊन थोडक्यात हरणाऱ्या आफ्रिकन टीमबद्दल आपल्याला थोडी का होईना सहानुभूती होतीच…

बाकी हे प्लेअर्स मैदानात असो किंवा मैदानाबाहेर पातळी सोडून वागले नाहीत म्हणून चांगल्या आठवणींमुळे लक्षात राहीले, अपवाद फक्त श्रीशांतला नडणाऱ्या आंद्रे नेलचा… त्या वाढीव गड्याबद्दल नंतर कधीतरी…

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.