वसंतदादा पाटील आणि शालिनीताईंच्या लग्नाची गोष्ट.

वसंतदादा आणि शालिनीताईंची ओळख सांगण्यासाठी ओळी खर्च करण्याची गरज नाही. दादाचं राजकारण उभ्या महाराष्ट्राला माहिती. शालिनीताईंसोबत त्यांनी केलेला दूसरा विवाह, त्यामुळे सांगली कोल्हापूर भागात उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया. समाजाने व नातेवाईंकांनी केलेली टिकाटिप्पणी.

पुढे ताणले, न ताणले गेलेले संबध व चर्चा या पलिकडे आज बोलभिडूच्या वाचकांसाठी वसंतदादा आणि शालिनीताईंची “लव्हस्टोरी” सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. 

कारण आजही अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की शालिनीताईंची आणि वसंतदादांची भेट कधी झाली, ते कुठे भेटले. प्रश्नांची उत्तर मिळतं नाहीत म्हणून अफवा सुरू होतात. म्हणून शंभर टक्के खरी माहिती. 

शालिनीताई आणि वसंतदादांची पहिली भेट. 

एप्रिल १९५७. सांगली जिल्हा लोकल बोर्ड निवडणुकीत बोरगाव मतदारसंघातून शालिनीताई उभा राहिल्या होत्या. हूशार असणाऱ्या शालिनीताईंना कॉंग्रेसने उमेदवारी दिली होती. तर संपुर्ण सांगली जिल्ह्याच्या लोकल बोर्ड निवडणुकांची जबाबदारी वसंतदादा पाटील यांच्याकडे होती. 

शालिनीताई तेव्हा कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून BA ची परिक्षा देवून आल्या होत्या. इकडे येताच त्या बोरगाव मतदारसंघातून उभा राहिल्या. त्या वेळी शालिनीताईंच लग्न झालं होतं. वसंतदादांच्या पत्नी मालतीताईं पद्माळे येथे रहायला असत. मालतीताईंची तब्येत बिघडलेली असल्याने त्या अंथरुणावरच असत. या पार्श्वभूमीवर निवडणुकिच्या प्रचाराचानिमित्ताने इस्लामपूर येथील दादासाहेब मंत्री यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. याच भेटीत शालिनीताईं पाटिल आणि वसंतदादा पाटील यांची पहिली भेट झाली. 

या पहिल्या भेटीबद्दल शालिनीताईंना नेमकं काय वाटलं? याबद्दल राजा माने यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार वंसतदादा या पुस्तकात लिहलं आहे. शालिनीताईंच्या शब्दातच पहिल्या भेटीचे वर्णन करण्यात आले आहे.  

शालिनीताई म्हणतात,

त्या वेळी ते वयाच्या पन्नाशीच्या आसपास होते. पोटाचा मोठा घेर सोडला तर त्यांची प्रकृती दणकट दिसत होती. चेहरा आकर्षक आणि देखणा होता. मागे विंचरलेले कुरळे केस अशा थाटातला तो चेहरा प्रसिद्ध अभिनेते अशोककुमार यांच्यासारखा दिसत होता. 

शालिनीताई आणि वसंतदादांची हि पहिली भेट. शालिनीताई या निवडणुकीत निवडून आल्या. त्याच वर्षी त्या BA च्या परिक्षा देखील पास झाल्या. लोकल बोर्डावर निवडुन आल्यामुळे वसंतदादा आणि शालिनीताईंचा संपर्क येवू लागला. 

शालिनीताई आणि वसंतदादा यांच्यातील संबध अधिक दृढ होत गेले.

पुढे १९६४ साली शालिनीताई एकट्या पडल्या. त्यांची मुले लहान होती. पैसा अडका वगैरे सारख्या गोष्टी सोबत नव्हत्या. त्यांनी वकिलीच शिक्षण घेतलं होतं पण त्यावर लगेच प्रॅक्टिस सुरू करुन पैसा उभा करण त्यांना शक्य वाटत नव्हतं. 

त्याच वेळी मालतीताईंची देखील तब्येत बिघडलेली असायची. मालतीताईं पद्माळे येथे रहात. फिरतीवर असताना जिथे मिळेल ते खायचं असाच त्यांचा दिवस जायचा. अशा वेळी शालिनीताईंसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव खुद्द वसंतदादांनी समोर ठेवला आणि शालिनीताईंनी तो तात्काळ मान्य केला. 

मुंबईच्या निवासस्थानी आठ माणसांच्या उपस्थितीत लग्न झालं. 

लग्नाचा प्रस्ताव मान्य होताच वसंतदादा आणि शालिनीताईंच लग्न मुंबईच्या पटेल चेंबर्स येथील निवासस्थानी पार पडलं. दोघांचा वैदिक पद्धतीने विवाह  झाला व या विवाहास आठ ते दहाजण उपस्थित होते. 

वसंतदादांच्या दूसऱ्या विवाहाची बातमी सांगली जिल्ह्यात धडकली आणि लोकांचा उद्रेक झाला. शालिनीताई ९६ कुळी मराठा आणि वसंतदादा पाटील देखील ९६ कुळी मराठा. मराठा समाजात असा दोघांचाही दुसरा विवाह त्या काळात मान्य होणार नाही अस दादांच्या जवळच्या व्यक्तिंच म्हणणं होतं. त्यातही शालिनीताईंचा दूसरा विवाह मान्य होणारच नाही, या विवाहामुळे वसंतदादांची राजकिय कारकिर्द संपुष्टात येवू शकते अस आप्तेष्टांच म्हणणं होतं. तरिदेखील वसंतदादांनी हा धाडसी निर्णय घेतला होता. 

इतकचं काय तर लग्न झाल्यानंतरही वसंतदादांनी योग्य निर्णय घेवून शालिनीताईंसोबत फारकत घ्यावी अस लोकांच म्हणणं होतं तरिही हा रस्ता मी ठरवलेला आहे असा ठाम निर्णय घेवून वसंतदादा पुढे चालू लागले. 

लग्न झाल्यानंतरच्या वर्षाभरात वसंतदादा आणि शालिनीताईं पाटिल यांच्या जवळच्या आठ दहा व्यक्ती सोडल्या तर सर्वांनीच त्यांच्याशी फारकत घेतली होती.

वसंतदादांना कार्यक्रमाला बोलावणे बंद झाले होते. शालिनीताई आणि वसंतदादांना एकत्र यावे लागले अशा कोणत्याच कौंटुबिक कार्यक्रमात वसंतदादांना बोलावलं जात नव्हतं. 

या वर्षाभरात शालिनीताईंनी देखील स्वत:च्या आर्थिक स्थितीची सोय करावी अस मत पुढं आलं. त्यातूनच सांगली सहकारी कारखान्याच्या माध्यमातून वसंतदादांना एक पर्सनल सेक्रेटरीची सोय करण्यात आली होती. या जागेवर वसंतदादांनी शालिनीताईंची नियुक्ती केली. शालिनीताई सेक्रेटरी प्रमाणे वसंतदादांच्या मिटींग ठरवले, भेटीसाठी वेळ देणे, पत्रव्यवहार संभाळण्याची कामे करु लागल्या. 

वसंतदादांची कामे मिटिंग झाल्या की नात्यातील लोकांनी वाळीत टाकल्याने वसंतदादांचा बराचसा वेळ सिनेमे पाहण्यात जात असे. वसंतदादा आणि शालिनीताईंनी एकत्र पाहिलेला पहिला सिनेमा म्हणजे मुंबईच्या इरॉसला पाहिलेला क्लिओपात्रा. तात्यासाहेब कोरे, आबासाहेब खेबुडकर यांच्या सोबत वसंतदादा आणि शालिनीताईंनी हा सिनेमा पाहिला होता. 

एकांतवासातच बराचसा काळ गेला. दरम्यानच्या काळात वसंतदादांना वेळच्या वेळी ओधषे मिळत होती. जेवणाचा प्रश्न सुटला होता. त्यांच्या आयुष्यात एक निटनेटकेपणा आला होता. काही काळ गेला आणि लोकांनी देखील हे नातं मान्य करत समंजसपणा दाखवला.हळुहळु सर्वांसोबत संबंध ठिक होवू लागले. 

या काळात साहित्यिक वि.स.खांडेकर यांनी वसंतदादा आणि शालिनीताईंच्या विवाहाबद्दल लेख लिहून त्यांच्या लग्नाचे समर्थन केले. आचार्य अत्रेंनी दोघांना जेवणासाठी घरी आमंत्रित केलं होतं. तर या सर्व प्रकरणात वसंतदादांसोबत तात्यासाहेब कोरे, आबासाहेब शिंदे, वसंतराव फाळके, लक्ष्मणराव विचारे, आबासाहेब खेबुडकर अशी जवळची मंडळी उपस्थित राहिली होती.  

हे हि वाच भिडू.  

2 Comments
  1. Amol patil says

    चांदोली कि खुजगाव हा दादा बापू वाद काय होता

  2. Jitendra says

    शालीनी पाटील यांच्या पहिल्या नवऱ्याचे नाव काय होते व ते आता कुठे असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.