म्हणून त्यांचा उल्लेख पश्चिम बंगालचे देवेंद्र फडणवीस असाच करावा लागेल…

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मागच्या ८ वर्षांपासून भाजपचं नेतृत्व करत आहेत. आधी प्रदेशाध्यक्ष, नंतर मुख्यमंत्री आणि आता विरोधी पक्ष नेता या नात्यानं. या काळात त्यांनी राज्यात केवळ पक्ष वाढवलाच नाही तर सत्तेत देखील आणला. आता पण सत्तेत नसले तरी राज्यात सगळ्यात जास्त आमदार निवडून आणत त्यांनी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपला पुढे आणलं आहे.

मोदी-शहांच्या स्वप्नातील ‘शत-प्रतिशत भाजप’, ‘पंचायत से पार्लमेंट’ या घोषणांना त्यांनी अगदी तंतोतंत उतरवलं आहे.

असेच अजून एक देवेंद्र फडणवीस भाजपला मिळाले आहेत, पश्चिम बंगालमध्ये. ते म्हणजे सध्याचे तिथले भाजपचे अध्यक्ष

दिलीप घोष.

मागच्या चार ते पाच वर्षांपासून भले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पश्चिम बंगालमध्ये झालेल्या आणि होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये स्टार प्रचारक राहिले असतील. पण इथं घोष हे मागच्या काही वर्षांपासून पाय रोवून उभे असल्यामुळेच डावे आणि काँग्रेसला बाजूला करत भाजप या घडीला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आहे.

आता याच ताकदीवर पक्ष २०० पेक्षा जास्त जागा जिंकत सत्ता बनवणार असल्याचा दावा करत आहे. 

२०१५ मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनण्यापूर्वी दिलीप घोष हे नाव सामान्य लोकांमध्ये तितकसं परिचित नव्हतं. पण त्यांच्या राजकीय आणि संघटनात्मक कौशल्याने हे नाव आता आपसूकच बंगालमधल्या घराघरात पोहचवलं आहे, आणि आज त्यांना बंगालमध्ये भाजपाची सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पण मानला जात आहे.

असा राहिला आहे दिलीप घोष यांचा….

१९६४ साली जन्म झाल्यानंतर घोष यांचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं, त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांची रवानगी मामाच्या गावी झाली. पुढे २ वर्ष पॉलिटेक्निकचं शिक्षण घेतल्यानंतर २ वर्ष महिंद्रा आणि महिंद्रा मध्ये काम केलं. 

पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या डोक्यात काही तरी वेगळच चालू होतं.

१९८४ मध्ये ते २० व्या वर्षीच संघाच्या संपर्कात आले आणि पूर्णवेळ प्रचारक बनले. आई-वडिलांना सांगितलं ते घर बनवण्यात नाही तर राष्ट्र बनवण्यात योगदान देऊ इच्छितात. 

त्यानंतर घोष यांनी बराच काळ अंदमान निकोबार बेटावर संघाचं काम केलं. २००४ मध्ये तिथं आलेल्या त्सुनामी दरम्यान संघाच्या बचाव कार्याच्या मोहिमेची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. त्यासोबतच तिथं सरकारशी संबंधित नसलेल्या विदेशी संघटनांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवायचं काम देखील करायचे.

संघाचे प्रचारक म्हणून काम करत असताना त्यांचा बराच काळ हा पूर्व भारतात गेला, पण त्यांनी पश्चिम आणि दक्षिण भारतात देखील काम केलं आहे. संघाचे तत्कालीन प्रमुख केएस सुदर्शन यांनी घोष यांना आपल्या कार्यालयाच सचिव बनवलं.  तेव्हापासूनच त्यांना संघाच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये गणलं जाऊ लागलं. 

घोष यांचं काम पाहून भाजपचे अनेक केंद्रीय नेते त्यांना पक्षात घेऊ इच्छित होते, पण सुदर्शन यांनी त्यासाठी परवानगी दिली नाही. सोबतच ते स्वतः देखील संघासोबतच्या कामात समाधानी होते. त्यानंतर त्यांना संघाच्या हिंदू जागरण मंचचं पूर्व भारताचं प्रमुख बनवलं. तिथं २०१५ पर्यंत काम केल्यानंतर त्यांना भाजपमध्ये पाठवण्यात आलं. 

२०१५ साली त्यांना बंगाल भाजपचं महासचिव बनवण्यात आलं आणि काही दिवसातच तत्कालीन अध्यक्ष राहुल सिन्हा यांना हटवत पक्षाचं नेतृत्व दिलं गेलं.

ज्यावेळी पक्षाची जबाबदारी दिली तेव्हा बंगाल भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीनं टोक गाठलं होतं. 

त्यानंतर घोष यांनी संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करतं, जिल्हा पातळीपर्यंतचे सर्व पदाधिकारी बदलले. त्यांनी स्वतः २०१६ मध्ये विधानसभा निवडणूकीत पूर्व मेदिनीपुर जिल्ह्याच्या खडगपूर जागेवरून उभं राहतं काँग्रेसचे दिग्गज नेते आणि ७ वेळचे आमदार ज्ञानसिंग सोहनपाल यांचा पराभव केला.

घोष यांच्या म्हणण्यानुसार २०१३ च्या पंचायत निवडणुकीमध्ये पक्ष एकूण ५८ हजार ६९२ पैकी ९ हजार जागांवर उमेदवार उभे करू शकत होती. पण २०१८ मध्ये त्यांनी केवळ ३४ हजार पेक्षा जास्त जागांवर नुसते उमेदवार उभेच केले नाहीत तर, जवळपास साडे सहा हजार जागांवर विजय मिळवत तृणमूल नंतर दुसऱ्या क्रमांकावर पक्ष आणला आहे. वोट शेयरमध्ये देखील २०१३ मधल्या ३ टक्क्यांच्या तुलनेत २३ टक्क्यांपर्यंत आणून ठेवलं. 

अगदी त्याच प्रमाणे लोकसभा निवडणुकांमध्ये देखील २ जागांवर असलेल्या पक्षाला घोष यांनी १८ जागांवर नेऊन ठेवलं. सोबतच पक्षाच्या मतांची टक्केवारी ४०. २५ टक्क्यांपर्यंत नेऊन ठेवली आहे.

२०१९ मध्ये घोष यांनी देखील लोकसभेची निवडणूक लढवत ती तब्बल ८८ हजारांच्या मताधिक्यानं जिंकली, पण त्यानंतर देखील ते जास्तीत जास्त वेळ पश्चिम बंगालमध्येच असतात. असं सांगितलं जातं की त्यांना त्यावेळी केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिली होती, पण आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत त्यांनी बंगालमध्येच राहणं पसंत केलं होतं.

भाजपचे एक महासचिव सांगतात,

मी याआधी कधीच कोणत्याही नेत्याला पक्षाच्या कामात एवढं व्यस्त असल्याचं बघितलेलं नाही. सकाळपासून रात्री उशिरा पर्यंत ते कार्यकर्त्यांना भेटतं राहणं, सभांना संबोधित करणं हे चालू असतं. त्यांचा संपूर्ण दिनक्रम पक्षासाठीच असतो.

खरंतर घोष यांनी नेतृत्व हातात घेतल्यानंतर राज्यात पक्षानं तृणमूला आक्रमक स्वरूपात उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. मुळात घोष यांची ओळखच एक आक्रमक नेता म्हणून आहे. ते छोट्यातील छोट्या गोष्टीला देखील आक्रमक मुद्दा बनवतं राज्य सरकारला घेरतं असतात.

त्यामुळेच सध्या राज्यात भाजप सत्तेसमीप जाऊन पोहचला असून सध्याच्या परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये दिलीप घोष यांच्याकडेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार म्हणून बघितलं जात असल्याचं ते महासचिव सांगतात.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.