शिवराज सिंग यांचं काय सांगता, या नेत्याने तर मोदींच्या खिश्यात तंबाखू लपवली होती.. 

काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान शेजाशेजारी बसले आहेत. कोणत्यातरी कार्यक्रमाचं स्टेज आहे आणि पाठीमागून घोषणा होत आहेत. इतक्यात शिवराज सिंग चौहान आपल्या जॅकेटच्या खिश्यातून काहीतरी काढतात. मळतात आणि तोंडात टाकतात. तोच मोदींची नजर त्यांच्याकडे वळते.. 

आत्ता सांगणारे सांगतायत की मोदींच्या समोर तंबाखू खाण्याचा शिवराज सिंग चौहान यांचा अटेम्प्ट होता.

आत्ता शिवराज सिंग मुख्यमंत्री असले तरी मोदी काय छोटी असामी नाहीत. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या शेजारी बसून तंबाखूचा बार लावणं म्हणजे साधी गोष्ट नाही. साहजिक अखिल तंबाखू लव्हर्स ग्रुपकडून त्यांच कौतुक होतय. 

हा किस्सा खुद्द नरेंद्र मोदींनीच सांगितला होता.

निमित्त होतं २४ जुलै २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या चंद्रशेखर द लास्ट आयकॉन ऑफ आयडॉलॉजिकल पॉलिटिक्स या पुस्तकाच्या प्रकाशनाचं. 

या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी चंद्रशेखर यांना भेटण्याचा पहिला प्रसंग सांगितला होता. झालेलं अस की भैरोसिंग शेखावत आणि नरेंद्र मोदी यांच चांगल जमायचं. शेखावत देखील मात्तब्बर नेते होते. मात्र त्या वेळी मोदी राजकीय पटलावर आले नव्हते. दिल्लीत ते राजकीय स्पेस शोधत होते. एका कार्यक्रमाला जाण्यासाठी शेखावत यांनी आपल्याला सोबत असावी म्हणून नरेंद्र मोदींना सोबत घेतलं. मोदींना देखील ही एक संधी वाटली, त्यांनी तात्काळ होकार दिला आणि ही जोडगोळी दिल्लीच्या विमानतळावर आली.. 

शेखावत आणि मोदींच्या गप्पा चालू होत्या. शेखावत मज्जेत होते तोच एका व्यक्तिला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. मोदींना काही समजण्याच्या आतच शेखावत यांनी आपल्या खिश्यातील तंबाखूची पुडी मोदींच्या खिश्यात लपवली. मोदींना देखील काहीच समजत नव्हते. अचानक शेखावत अस का करू लागलेत.

तोच तिथे चंद्रशेखर आले. चंद्रशेखर तेव्हा जनता पक्षाचे अध्यक्ष होते. चंद्रशेखर यांनी आल्या आल्या शेखावत यांच्या खिश्याची झडती घेण्यास सुरवात केली. झडतीत काहीच सापडलं नाही म्हणल्यानंतर चंद्रशेखर खूष झाले आणि त्यांनी शेखावत यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सोबत तंबाखू सोडण्यावर लेक्चर दिलं आणि तिथून निघून गेले.. 

चंद्रशेखर तिथून गेल्यानंतर शेखावत यांनी हळुवारपणे मोदींच्या खिश्यातून आपली तंबाखूची पुडी काढली व स्वत:जवळ ठेवली.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.