या तीन गोष्टी पूर्ण झाल्या की जाहीर केलं जातं, मान्सून केरळात दाखल झालाय

मान्सूनबद्दल जो अंदाज देण्यात आला होता तो अखेर खरा ठरला आहे. यंदा मान्सून भारतात लवकर म्हणजेच निर्धारित वेळेच्या आधी दाखल होणार, असं हवामानशास्त्र विभागाने सांगितलं होतं. मान्सून भारतात दाखल झाला हे तेव्हा म्हटलं जातं जेव्हा त्याचं आगमन केरळ राज्यात होतं. त्यानंतर हो हळूहळू संपूर्ण देश व्यापतो. साधारणतः १ जून ही केरळात मान्सूनच्या दाखल होण्याची तारीख समजली जाते.

यंदा मात्र मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केरळात मान्सून येईल, असा अंदाज होता. त्यानुसार रविवार २९ मे रोजी मान्सून केरळात आला आहे. तीन दिवस अगोदर मान्सूनचं आगमन झालं आहे.

यात एक प्रश्न मात्र सलग पडत राहतो. तो म्हणजे…

मान्सून दाखल झाला म्हणेज नक्की काय? कोणत्या गोष्टी घडून आल्या की मान्सून केरळात, भारतात आला असं घोषित केलं जातं? त्याचे निकष काय असतात?

उत्तर आपण सविस्तर जाणून घेऊ, त्याआधी नेमकं मान्सून म्हणजे काय? हे माहित असणं गरजेचं आहे…

मान्सून म्हणजे ठराविक काळाने दिशा बदलणारे वारे. दिशा बदलणारे हे वारे सहा महिने नैर्ऋत्येकडून तर बाकी सहा महिने ईशान्येकडून वाहतात. यातील नैऋत्य मोसमी वारे मान्सून पावसासाठी कारणीभूत असतात. 

मे-जून महिन्यात भारतीय द्वीपकल्पात उष्णता तापू लागते, तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आसपास आणि दक्षिणेकडील तापमान तुलनेने कमी असतं. तापमानातील या फरकामुळे समुद्रातील पाण्याचे ढग जड होतात.

ते प्रमाणाने उत्तर भारताकडे जातात आणि तिथे जाताना संपूर्ण भारतात पाऊस पडतो, याला मान्सून पाऊस म्हणतात.

आशिया खंडामध्ये ठरावीक काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात येणारा पाऊस असा त्याचा साधारण अर्थ होतो.

मान्सून हा मुळात अरेबिक शब्द असून त्याचा संदर्भ ‘ऋतू’ या शब्दाशी जोडला जातो. शेकडो वर्षांपूर्वीपासून अरबी समुद्रावर होणाऱ्या वाऱ्यांच्या बदलांना मासेमारी करणाऱ्या लोकांनी ही संकल्पना वापरल्याचे सांगण्यात येते. 

मग केरळात मान्सून दाखल झाला, हे कसं कळतं?

भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हणजेच आयएमडीने याचे तीन निकष सांगितले आहेत… 

१)  पाऊस 

केरळ आणि लक्षद्वीपमधील १४ नामांकित हवामान केंद्रांपैकी किमान ६०% हवामान केंद्रांमध्ये १० मे नंतर कधीही सलग दोन दिवस किमान २.५ मिमी पावसाची नोंद झाली तर मान्सूनची सुरुवात झाल्याचं आयएमडी जाहीर करत असतं. 

अशा परिस्थितीत, केरळवरील सुरुवात दुसऱ्या दिवशी जाहीर केली जाते, जर विशिष्ट वारा आणि तापमानाचे निकष देखील पूर्ण होत असेल तर.

मिनीकॉय, अमिनी, तिरुअनंतपुरम, पुनालूर, कोल्लम, अलाप्पुझा, कोट्टायम, कोची, त्रिशूर, कोझिकोड, थलासेरी, कन्नूर, कासारगोड आणि मंगळुरू ही १४ नोंदणीकृत स्टेशन्स आहेत. यातील काही स्टेशन्स समुद्र सपाटीला आहेत, काही त्यापेक्षा उंचीवर आहे तर काही उत्तरेच्या दिशेने आहेत, काही पूर्वेच्या दिशेने आहेत.

२) वाऱ्याचं क्षेत्र

विषुववृत्ताने 10ºN अक्षांशाला बांधलेल्या प्रदेशात वेस्टर्लीजची खोली ६०० हेक्टरपर्यंत आणि रेखावृत्त 55ºE ते 80ºE पर्यंत असावी. 5-10ºN अक्षांश आणि 70-80ºE रेखावृत्ताने बांधलेल्या क्षेत्रावरील विभागीय वाऱ्याचा वेग 15-20 नॉट्स (28-37 किमी प्रतितास) च्या क्रमाने 925 एच.पी.ए. असणं आवश्यक आहे.

३) ओएलआर 

आउटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशन मूल्य म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभाग, महासागर आणि वातावरणाद्वारे अंतराळात उत्सर्जित होणाऱ्या उर्जेचं मोजमाप असतं. ते 5-10ºN अक्षांश आणि 70-75ºE अक्षांशाने मर्यादित असलेल्या बॉक्समध्ये 200 वॅट प्रति चौरस मीटरपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

आता हे खूपच टेक्निकल झालं असणार. तेव्हा सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आम्ही…

हवामानतज्ज्ञ उदय देवळाणकर यांच्याशी संपर्क साधला.

त्यांच्या भाषेत सांगायचं तर… बाष्पाचं प्रमाण, द्रोणीय अवस्था आणि हवेचा दाब या तीन गोष्टी असतात. 

ऑफशोर ट्रफ म्हणजे समुद्र आणि जमिनीच्यामध्ये एक द्रोणीय रेषा तयार होते, ज्यामुळे समुद्री हवा पृथ्वीकडे निरंतर ढकलण्याची प्रक्रिया सुरु होते. या उर्जेला केल्विन सायकल असं म्हणतात. समुद्रावरील हवेच्या दाबापेक्षा पृथ्वीचा दाब कमी तयार होतो. साधारणतः भारतीय उपखंडात जास्त हवेचा दाब असतो त्यामुळे आपल्याकडून समुद्राकडे हवा जात असते.

जेव्हा ही परिस्थिती अगदी विरुद्ध होते म्हणजे समुद्राकडून आपल्याकडे हवा यायला सुरुवात होते तेव्हा मान्सून सुरु झाला असं घोषित केलं जातं. 

त्यासाठी वरती सांगितलेल्या निर्धारित १४ स्टेशनमध्ये वेदर डेटा कलेक्ट केला जसं की, हवेचा दाब, मॉइश्चर म्हणजे बाष्पाचं प्रमाण, हवेची दिशा, पडणाऱ्या पावसाचं प्रमाण हे सगळं १४ स्टेशन्सला समान झालं की, त्याला मान्सून म्हणतात. 

वेगवेगळ्या दिशेवरून आलेला पाऊस जेव्हा उत्तरेच्या एकाच दिशेने चालतो तेव्हा तो मान्सून आहे असं म्हणतात. मान्सून नसताना देखील बाष्प आपल्याकडे असतं मात्र मान्सूनच्या बाष्पाला एक शिस्त असते, दिशा असते, विशिष्ट हवेचा दाब असतो आणि बाष्पाचं प्रमाण असतं, त्याला मान्सून म्हणतात. 

मान्सून हवा आल्यानंतर जवळपास ७० ते ८० टक्क्यांच्या पुढे मॉइश्चर असतं. केरळमध्ये सध्या विंड शेअर म्हणजे बाष्पाची चादर तयार झाली आहे जी पडणाऱ्या सूर्यकिरणांना वरच्या वर ढकलत आहे. आउटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशन याचे रिफ्लेक्शन या भागातून दिसत नाहीत. म्हणजे सूर्याची किरणं पृथ्वीला आदळून परत आसमंतात जाण्याचं प्रमाण कमी आहे. २०० वेव्ह मॅट्रिकच्या खाली जाते ती. हा ओएलआर काउंट कमी झाला की, मान्सून आला असं घोषित करतात.  

असं सर्व हवामानतज्ज्ञ उदय देवळाणकर सरांनी सांगितलं. 

वरील सगळ्या टेक्निकल गोष्टींची पूर्तता झाली की मान्सून केरळात दाखल झाला असं म्हणतात. १ जूनला दाखल झाला तर १५ जुलैपर्यंत तो संपूर्ण देश व्यापात असतो. मात्र यंदा मान्सून लवकर आल्याने तो भारतभर लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. 

शिवाय या मान्सून हंगामात जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता आयएमडीने दिलीये. महाराष्ट्राबद्दल सांगायचं तर, चांगल्या पावसाचे संकेत आहेत. विशेषतः मराठवाड्यात हे प्रमाण जास्त असू शकतं. म्हणजे जवळपास ७० टक्क्यांपेक्षा जास्त असून, राज्यात इतर ठिकाणी तीच शक्यता ३५ ते ४५ टक्के आहे, असं हवामानशास्त्र विभागाने सांगितलंय. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.