रुपया गडगडला आहे पण यांचे देखील फायदे आहेत…

आजही रुपयामध्ये घसरण झाली, भारतीय चलनाचं अवमूल्यन झालं, दिवसेंदिवस डॉलरचं मूल्य वाढतच चाललं आहे… अशा बातम्या आपण आजकाल रोजच ऐकतोय. शिवाय जसं आंतराराष्ट्रीय स्तरावर रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झालं आहे तेव्हापासून आतापर्यंत जवळपास २६ वेळा रुपयाची पडझड झाल्याची माहिती मिळते. 

गेल्या अनेक दिवसांपासून डॉलरची वाढणारी किंमत बघून अनेक अर्थतज्ज्ञांनी अंदाज वर्तवला होता की, लवकरच डॉलर ८० रुपये पार जाऊ शकतो. 

अगदी तसंच झालंय.

अर्थतज्ज्ञांच्या भाकितानुसार डॉलर खरंच ८० रुपयांवर गेलाय. काल १४ जुलैला १ अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास ८० रुपये १५ पैसे अशी किंमत झाली होती. 

रुपया घसरल्याच्या बातम्या दाखवतानाच अशा दाखवल्या जातात की घाबरल्या सारखं होतं. पण खरंतर फार घाबरायचं कारण नसतं! कारण, डॉलरच्या तूलनेत रुपयाचं मूल्य कमी होणं याचे जसे तोटे असतात तसे त्याचे फायदे सुद्धा असतात. कुठले? जाणून घेऊया.. 

१. निर्यात वाढते 

रुपयाचं मूल्य कमी झालं की भारतातील वस्तू परदेशी खरेदीदारांसाठी स्वस्त होतात. अशात ते जास्तीत जास्त वस्तू भारतातून आयात करण्याला प्राधान्य देतात. म्हणजे भारताच्या वस्तूंची परदेशी बाजारपेठेत मागणी वाढते. यामुळे निर्यातीला वाव मिळतो. 

टेक्सटाईल, लेदर, हॅन्डीक्राफ्ट्स, मारिन इंडस्ट्री, कृषी क्षेत्र यातील भारताच्या उत्पादनांची युरोपमध्ये मोठी बाजारपेठ आहे. सोबतच आयटी, मेटल आणि फार्मासारखे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात भारतातून निर्यात करतात. 

रुपया स्वस्त झाल्याने या भारतीय कंपन्यांना जास्तीत जास्त निर्यात करण्याला प्रोत्साहन मिळतं. रुपयाच्या अवमूल्यनामुळे त्यांना फायदा असा होतो की, डॉलरसाठी त्यांना जास्त रुपये मिळतात. त्यामुळे देशातील निर्यातदारांचं उत्पन्न वाढतं.

उदाहरणार्थ… एखाद्या उत्पदनासाठी आयटी कंपन्यांना जर १ लाख डॉलर मिळत असतील तर आधीच्या ७५ रुपये प्रति डॉलर प्रमाणे भारतीय रुपयात त्याचं मूल्य व्हायचं ७५ लाख. मात्र आता ८० रुपये प्रति डॉलर प्रमाणे त्याचे ८० लाख होतील. ५ लाख रुपयांचा प्रॉफिट होईल. 

इनपुट कॉस्ट तितकीच राहिली मात्र त्याचं कन्व्हर्जन जास्त होतं. अशाप्रकारे जे एक्स्पोर्ट ओरिएंटेड बिजनेस असतात त्यांना फायदा होतो. 

२. स्थानिक बाजारपेठेला उभारी मिळते 

रुपया ढसाळल्याचा सगळ्यात मोठा तोटा होतो तो म्हणजे ‘आयात कमी होते’. पण याच तोट्याचा फायदा सुद्धा होतो. आयात महाग झालेली असते. मग आयात उत्पादनासाठी स्वस्त वस्तूंचा पर्याय शोधायला सुरुवात होते. अशावेळी लोक देशांतर्गत बाजारपेठेकडे वळतात. कारण आयात उत्पादनांच्या तुलनेत स्थानिक उत्पादनं स्वस्त वाटू लागतात.   

यामुळे काय होतं तर देशांतर्गत मागणी वाढते. मागणी वाढली की स्थानिक व्यवसायांना चालना मिळते आणि स्थानिक बाजारपेठेला वर येण्यास मदत मिळू शकते. 

३. भारतातील फॉरेन पर्यटनात वाढ होते 

रुपया स्वस्त झाल्याने फॉरेनर्स लोकांना भारतात प्रवास स्वस्त होतो. म्हणजे कसं तर… अगोदर जी गोष्ट त्यांना १ डॉलरला करता येत होती त्यासाठी त्यांना आता त्यापेक्षा कमी पैसे लागतील. 

समजा त्यांनी दोन नारळ पिले आणि बिल झालं १०० रुपये. जेव्हा ७५ रुपये डॉलर होता तेव्हा त्यांना १ डॉलर आणि शिल्लक २५ रुपये द्यावे लागत होते. आता त्याच नारळाची त्यांना ८० रुपये प्रमाणे १ डॉलर आणि शिल्लक २० रुपये द्यावे लागतील. म्हणजे ५ रुपये त्यांचे वाचतील. अशाप्रकारे सगळ्याच ठिकाणी त्यांना फायदा होईल. म्हणून ते भारतात वरचेवर पर्यटनाला भर देतील. याने भारताचं पर्यटन क्षेत्र फायद्यात येईल. 

सोबतच स्थानिक उद्योगांना देखील फायदा होऊ शकतो. पर्यटनावर स्थानिक उद्योग आधारित असतात. जर पर्यटनाचा विकास झाला तर आपोआप स्थानिक उद्योगांचा देखील विकास होईल. 

४. परदेशात काम करणाऱ्यांच्या घरच्यांना फायदा होतो

याला रेमिटंस म्हणतात. म्हणजे काय तर कुठला तरी भारतीय परदेशात काम करतोय आणि इकडे पैसे पाठवतोय. 

ज्या लोकांच्या कुटुंबातील सदस्य परदेशात नोकरीला असतील आणि जर ते त्यांच्या घरी पैसे पाठवत असतील तर त्यांना रुपयाची किंमत कमी होण्याचा फायदा होऊ शकतो. समजा एखादा व्यक्ती अमेरिकेत नोकरीला आहे आणि तो दर महिन्याला घरी २ हजार डॉलर पाठवतोय. तर दोन-तीन महिन्यांपूर्वी अशी परिस्थिती होती की या २ हजार डॉलरचे ७५ रुपये प्रति डॉलरप्रमाणे भारतात व्हायचे दीड लाख रुपये. 

आता जेव्हा ८० रुपये प्रति डॉलर असं गणित झालं आहे तेव्हा त्याच २ हजार डॉलरचे त्याच्या घरच्यांना मिळत आहेत १ लाख ६० हजार. याचा अर्थ १० हजार रुपये शिल्लक मिळत आहेत. पाठवणारा व्यक्ती तितकेच पैसे पाठवतोय मात्र इकडे जास्त रुपये मिळत आहे. 

याने त्यांची सेव्हिंग वाढू शकते. किंवा एक्सट्रा १० हजार रुपये येत आहेत म्हटल्यावर इथल्या बाजारपेठेत सुद्धा गुंतवणूक वाढू शकते. 

५. व्यापारी तूट भरून निघू शकते 

निर्यात आणि आयात यांच्यातील जी तफावत असते त्याला ‘व्यापारी तूट’ असं म्हणतात. भारतात आयात ही आपल्या निर्यातीपेक्षा नेहमीच जास्त राहिली आहे ज्यामुळे व्यापारी तूट निर्माण होते. मार्केटच्या भाषेत त्याला ‘बॅलन्स ऑफ ट्रेड’ असं संबोधलं जातं. रुपयाचं अवमूल्यन झाल्याने हाच व्यापार समतोल सुधारत असतो. कसं?

समजा १०० रुपयांचं पेट्रोल आपण इराणवरून भारतात मागवलं आणि आपल्या इथून इराणला आपण एक पेन निर्यात केला, ज्याची किंमत आहे १ डॉलर. आधीच्या १ डॉलर बरोबर ७५ रुपये या गणिताने आपण इराणला पेन निर्यात केला. याठिकाणी काय झालं… निर्यात आहे ७५ रुपयांची आणि आयात आहे १०० रुपयांची. म्हणजे आपल्या खिशातले एक्सट्रा २५ रुपये गेलेत. 

पण आता १ डॉलर बरोबर ८० रुपये झाले आहे. तर गणित कसं होतंय… पेट्रोल १०० चं मागवलं आणि पेन ८० रुपयाने गेलाय. म्हणजे आता २० रुपयांचा डिफरंस आहे. ५ रुपये आपले भरून निघत आहेत. यालाच म्हणतात व्यापारी तूट भरून निघणं. 

या पाच फायद्यांव्यतिरिक्त अजून एक फायदा सांगितला जातो तो म्हणजे – फॉरेन डायरेक्ट इन्वेस्ट्मेंट  सुधारणं. म्हणजे परकीय गुंतवणूक सुधारणं.

जेव्हा केव्हा कोणत्याही देशाच्या चलनाचं मूल्य कमी होतं तेव्हा त्या देशात परकीय गुंतवणूक वाढल्याचं निरीक्षक सांगतात. कारण बाहेरच्या इन्वेस्टर्सना आधीच्या दरात अगोदरपेक्षा जास्त काम मिळतं. भारताच्या रुपयाचं उदाहरण घेऊन सांगायचं तर…

समजा अगोदर १ डॉलर गुंतवला तर त्यांचं ७५ रुपयांचं काम होत होतं. मात्र आता १ डॉलर गुंतवला तर ८० रुपयांचं काम होतंय, म्हणजे एक्सट्रा ५ रुपयांचं काम होतंय. अशाने ते जास्तीत जास्त इव्हेस्ट करू शकतात.

मात्र भारतात परकीय गुंतवणूक ही अनेक वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. FDI साठी भारतीय बाजारपेठेमधले व्याजाचे दर, सरकारची धोरणं, पायाभूत सेवासुविधा हे महत्वाचे घटक ठरतात. या सर्वांचा विचार करून फॉरेन इन्वेस्टर्स इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणून नेहमीच त्याचा फायदा होईल, याबद्दल अनेक अर्थतज्ज्ञांना साशंकता आहे. 

म्हणून रुपया घसरण्याचा FDI हा फायदा म्हणून अजून तरी सांगता येत नाही.

अशाप्रकारे चलनाची किंमत घसरण्याचे फायदे देखील होत असतात. मात्र यातील सर्व फायदे उचलण्यासाठी अर्थव्यस्थाही निर्यातक्षम असली पाहिजे. चीनची अर्थव्यवस्था निर्यातीवर जास्त अवलंबून आहे त्यामुळे वेळोवेळी चीननं पडणाऱ्या चलनाचा फायदा उचलल्याचं आपल्याला दिसतं. चीनने बऱ्याचवेळा स्वतःहून चलनाचं अवमूल्यन केलं आहे.

मात्र भारत एक्स्पोर्ट पेक्षा इम्पोर्ट जास्त करत असल्याने पडणारा रुपया भारताच्या पथ्यावर पडेलच असं नाही.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.