जशी आईला बाळंतपणासाठी सुट्टी मिळते, तशी वडिलांनाही बाळंतपणाची सुट्टी मिळायला हवी का?

नोव्हेंबर महिन्यात एक बातमी आली, ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांची निवड झाली. तेव्हा पराग यांच्या विषयी अनेक बातम्या आल्या. त्यांची हिस्ट्री, जिओग्राफी सगळे चर्चेचे विषय होते. पुढं काही दिवस त्यांचं नाव बातम्यांमधून गायब झालं. नुकतंच हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. त्याचं कारण आहे सुट्टी. आता तुम्हाला वाटलं असेल की सणासाठी सुट्टी घेतली आणि चर्चा रंगली, तर असं अजिबात नाहीये.

३७ वर्षीय अग्रवाल हे लवकरच दुसऱ्यांदा वडील बनणार आहेत, यावेळी आपल्या बायको आणि नवजात बाळासोबत राहता यावं म्हणून ते काही आठवड्यांच्या सुट्टीवर जाणार आहेत. स्वतः ट्विटरनंच ही बातमी शेअर केली. अनेक लोकांनी पराग यांच्या निर्णयाचं कौतुक केलं, अगदी काही लोकांनी त्यांच्या निर्णयावर टीकाही केली.

आता एवढ्या मोठ्या कंपनीचा सीईओ ‘पॅटर्नल लिव्ह’ (बाळाच्या जन्मासाठी वडिलांना मिळणारी सुट्टी) घेतो, म्हणल्यावर खरंच कौतुक केलं पाहिजे भिडू. कारण मागं कितीही व्याप असला, तरी गड्यानं आपल्या कुटुंबाला प्राधान्य देण्याचं ठरवलंय.

पराग अग्रवाल यांचं लोकांनी कितीही कौतुक केलं असलं, तरी याआधी भारतातल्या एका सेलिब्रेटीनं पॅटर्नल लिव्ह घ्यायचं जाहीर केलेलं तेव्हा त्याच्यावर मजबूत टीका झाली होती. तो म्हणजे विराट कोहली.  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिरीज दरम्यान कोहली एक कसोटी खेळून आपल्या बाळाच्या जन्मासाठी मायदेशी परतला होता. तेव्हा त्याच्यावर पार चाहत्यांपासून माजी क्रिकेटर्सपर्यंत सगळ्यांनी टीका केली. लोकांचा सूर असा होता, की वडिलांच्या निधनानंतर खेळणारा कोहली, बाळाच्या जन्माचं कारण सांगून सुट्टीवर का गेला?

पण हा सगळा वाद बाजूला ठेवला, तर बाळंतपणासाठी वडिलांना सुट्टी मिळण्याबाबत नियम काय सांगतात?

भारताबद्दल बोलायचं झालं, तर भारतात मॅटर्निटी लिव्ह देण्याबाबत कायदा असला, तरी पॅटर्नल लिव्हबाबत सक्ती करणारा कायदा नाही. खाजगी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना पॅटर्नल लिव्ह देण्याचं बंधनही नाही. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मात्र एक तरतूद करण्यात आली आहे. जर पुरुष कर्मचाऱ्याला दोन पेक्षा कमी मुलं असतील, तर बाळाच्या जन्माच्या आधी किंवा बाळ सहा महिन्यांचं होईपर्यंत १५ दिवसांची पितृत्व रजा मिळू शकते. पण फक्त पहिल्या दोन बाळांच्या जन्मावेळीच या तरतुदीचा लाभ घेता येऊ शकतो.

त्यामुळं खाजगी कंपन्यांमध्ये बाळाच्या वडिलांना किती दिवस सुट्टी द्यायची, हे त्या त्या कंपनीनुसार ठरतं. आयकिया या फर्निचर बनवणाऱ्या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्याची पितृत्व रजा देण्याचं जाहीर केल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. सोबतच झोमॅटोही २६ आठवड्यांच्या पॅटर्नल लिव्ह पॉलिसीमुळे चर्चेत आलं होतं. फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांना १५ दिवसांची रजा मिळते आणि सोबतच वर्क फ्रॉम होम सारखे पर्यायही उपलब्ध होतात.

मिशो, रेझरपे सारख्या नव्या कंपन्याही पुरुष कर्मचाऱ्यांना आपल्या बाळासोबत वेळ घालवण्यासाठी रजा देण्यास प्राधान्य देत आहेत. भारतातल्या काही कंपन्यांमध्ये पितृत्व रजा देण्याचा ट्रेंड वाढतोय, याचं कर्मचारी वर्गाकडून स्वागत केलं जातंय.

बाहेरच्या देशांबद्दल बोलायचं झालं, स्पेनमध्ये १६ आठवड्यांची सुट्टी मिळते. जर्मनी, ग्रीस, इटली, नेदरलँड, रोमानिया सारख्या देशांमध्ये फक्त १० दिवसांचीच रजा मिळते. अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये पॅटर्नल लिव्ह मिळत असली, तरी तिथंही भारताप्रमाणं कोणताही कायदा नाही. युनिसेफनं जाहीर केलेल्या अभ्यासानुसार, मातृत्व रजे इतकीच पितृत्व रजाही बाळाच्या संगोपनासाठी गरजेची असते.

पितृत्व रजा म्हणजेच पॅटर्नल लिव्ह गरजेची का असते?

बाळाच्या वाढीसाठी आई आणि वडील दोघांचं योगदान तितकंच गरजेचं आहे. बऱ्याचदा एकट्या आईवर कामाचा, बाळाला सांभाळण्याचा अशा गोष्टींचा ताण पडू शकतो, त्यामुळं वडिलांची साथ मिळणंही तितकंच गरजेचं आहे. पितृत्व हा कोणत्याही पुरुषाच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण असतो, त्यामुळं तो अनुभवायला तो तिथं असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा कामामुळं वडिलांना मुलांना वेळ देता येत नाही आणि त्यामुळं बाप आणि बाळाच्या नात्याची वीण फारशी घट्ट राहत नाही, त्यामुळं सुरुवातीपासूनच एकमेकांचा लळा असणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

पराग अग्रवाल यांच्या निर्णयाचं फक्त कौतुक होणार की त्यापासून प्रेरणा घेत खाजगी कंपन्या आणि सरकार पॅटर्नल लिव्ह बाबत ठोस भूमिका घेणार हे आता पाहावं लागेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.