बाळासाहेबांनी कदमांसाठी काय केलं, गडकरींना विनंती करून मतदारसंघ घेतला
राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत. चर्चेत आहेत त्याच कारण म्हणजे ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन करत असलेल्या टीकेमुळे.
शिंदे गटाच्या वतीने दापोलीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होता. यावेळी रामदास कदम उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले की, मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं किती वेळा सांगणार? काही संशय आहे का? आम्ही कधी नाही म्हटलं आहे का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं कधी कोणी म्हणाल्याचं ऐकलंय का? तुम्हाला बाळासाहेबांचं नाव का सांगावं लागतं? तुमचं काही कर्तृत्व आहे का ?असं सुद्धा म्हणाले होते.
त्याच बरोबर त्यांनी या वादात रश्मी ठाकरे यांना सुद्धा वादात ओढले. आमच्या रश्मी वहिनी मंत्रिमंडळात कशा नाही आल्या याचं आश्चर्य वाटतं. कुठेही गेल्या तरी त्या सोबत हव्यातच. माँसाहेब कधी कोणत्या कार्यक्रमात गेल्या नाहीत, व्यासपीठावर चढल्या नाहीत, असं सुद्धा कदम म्हणाले.
यानंतर कदम यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात येत आहे. त्यांना मागच्या काही वर्षात शिवसेनेत स्थान दिल्याने ते अशा प्रकारची भाषा वापरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मात्र एकवेळ अशी होती जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः कदम निवडून यावेत म्हणून प्रयत्न केले होते. आणि नुसते प्रयत्नच नाही तर तसा नितीन गडकरी यांच्याकडे शब्द देखील टाकला होता.
२००४ साली रामदास कदम सलग चौथ्यांदा खेड मधून निवडून आले होते. याच काळात शिवसेनेत प्रचंड घडामोडी घडल्या. नारायण राणे यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देऊन पक्ष सोडला. त्यानंतर या पदासाठी शिवसेना नेत्यांचा नव्या विरोधी पक्ष नेत्यासाठीचा शोध रामदास कदम यांच्यापर्यंत येऊन थांबला.
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी रामदास कदम यांची नियुक्ती करण्यात आली.
२००९ पर्यंत कदम या पदावर होते. या ४ वर्षांच्या काळात कदम यांनी आपल्या अनेक आक्रमक भाषणांनी, दाव्यांनी विधानसभा गाजवली होती. राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेत त्यांच्याकडे बघितलं जाऊ लागलं.
मात्र २००९ सालच्या विधानसभा निवडणुका ही रामदास कदम यांची सत्त्वपरीक्षा पाहणारी ठरली.
२००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा खेड हा हक्काचा मतदारसंघ राखीव झाला. मग विधानसभेवरच निवडून यायचे असा चंग बांधलेल्या कदम यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना साकडे घालून दापोली मतदारसंघावर दावा सांगितला. मात्र तिथले आमदार असलेल्या सूर्यकांत दळवी यांनी कदम यांच्यासाठी दापोली मतदारसंघ सोडण्यास ठाम नकार दिला.
त्यामुळे अखेर त्यांनी गुहागर मतदारसंघाचा आग्रह धरला. त्यांच्यासाठी बाळासाहेबांनी थेट नितीन गडकरी यांच्याकडे शब्द टाकला. बाळासाहेब ठाकरे म्हणाले,
रामदाससाठी गुहागर विधानसभा मतदारसंघ सोडणे शक्य आहे का?
नितीन गडकरी पेचात होते. कारण एक तर गुहागर हा परंपरागत भारतीय जनता पक्षाचा आणि नातू कुटुंबीयांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. पण दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांचा शब्द नाकारणे गडकरी यांना अशक्य झाले. अखेरीस गडकरी यांनी आमदार डॉ. विनय नातू यांचा गुहागर मतदारसंघ शिवसेनेस बहाल केला.
त्यावेळी तिथं राष्ट्रवादी काँग्रसचे भास्कर जाधव, शिवसेनेचे रामदास कदम आणि भाजपचे बंडखोर डॉ. विनय नातू यांच्यात लढत झाली. मात्र या अटीतटीच्या लढतीमध्ये डॉ. नातू यांच्या बंडखोरीचे परिणाम दिसून आले. रामदास कदम यांचा पराभव करत भास्कर जाधव विधानसभेवर निवडून आले.
मात्र बाळासाहेब यांचा वाघ म्हणून रामदास कदम यांची ओळख होती. त्यांना ते विधिमंडळात हवे होते. त्यामुळे पराभवानंतर देखील रामदास कदम यांना बाळासाहेबांनी मुंबई पालिकेतून विधान परिषदेवर पाठवलं. पुढे २०१४ साली विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवेसना आणि भाजपामध्ये जागा वाटपाची रस्सीखेच सुरू होती तेव्हा रामदास कदम यांनी भाजपला थेट अंगावर घेतल्याचं बघायला मिळालं होतं.
पुढे भाजपाने शिवसेनेशी जुळवून घेतले. मंत्रिमंडळात सेनेचा सहभाग झाला. इथेही रामदास कदम यांचं शिवसेनेतील वजन दिसून आलं. कॅबिनेट मंत्रीपदी लोकांमधून निवडून आलेले आमदार असावेत असे संकेत असतात. मात्र कदम यांचा कॅबिनेट मंत्री आणि त्यातही पर्यावरण मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश झाला. पुढे २०१५ साली त्यांना पुन्हा एकदा विधानपरिषदेवर पाठवण्यात आलं.
हे हि वाच भिडू
- नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला शिवसेना शिव्या-शाप यात्रा का म्हंटले गेले?
- किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर असलेले महाविकास आघाडीचे ११ नेते
- भाजपच्या या चेहऱ्यांनी महाविकास आघाडीचा एक दिवस देखील सुखाने जाऊ दिलेला नाही