सह्याद्रीच्या जंगलात हरवलात, चुकलात तर काय करायचं अन् काय नाही हे समजून घ्या..

दिल्लीहून फरहाद अहमद नावाचा एक तरुण ट्रेकिंगसाठी लोणावळा इथे गेला होता. तसा तो कामानिमित्त कोल्हापूरला आला होता आणि त्यानंतर तो लोणावळा इथे ट्रेकिंगसाठी गेला होता. २० मे पासून सोलो ट्रेकिंग त्याने सुरु केली.

ट्रेकिंगच्या अगोदर त्याने भावाला फोन केला तेव्हा ट्रेकिंगच्या जागेची माहिती देखील दिली होती. मात्र, त्यानंतर या तरुणाचा फोन बंद झाला आणि तो दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती.

तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. 

फरहाद अहमदच्या वडिलांनी त्याच्या शोध घेण्यासाठी एक लाखांचं बक्षीसही ठेवलं होतं. तर स्थानिक पोलीस प्रशासन आणि रेस्क्यू टीमने त्याच्या शोधासाठी कार्य सुरू केलं होतं. मात्र, २४ मे ला बातमी आली ज्यात त्याचा मृतदेह सापडला असून तो मृत झाल्याची माहिती समोर आली. 

तसं ही काही पहिली घटना नाही. ट्रेकिंगला गेले आणि हरवले अशा अनेक घटना गुगल केल्या की सहज मिळतील.

घटना आहे २०१७ ची…

रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधब्यावर २४ तासांच्या बचावकार्यानंतर एनडीआरएफच्या बचाव पथकाला बेपत्ता झालेल्या पुण्यातील दोन ट्रेकर्सचे मृतदेह सापडले होते.

माणगाव गावापासून सुमारे ३० किमी अंतरावर विनीत पाठक नावाचा दापोलीतील एक महाविद्यालयीन विद्यार्थी त्याच्या १० ट्रेकर्सच्या गटापासून वेगळा झाला होता, हरवला होता. तर तासाभराने लेफ्टनंट अखिलेश चौधरी हा लष्करातील एक अधिकारी आपल्या १५ आर्मी ट्रेकर्सच्या ग्रुपमधून देवकुंडकडे जाताना दबडाबा धबधब्याजवळ बेपत्ता झाला. या घटना एकमेकांपासून एक किलोमीटर अंतरावर घडल्या.

दुसऱ्या दिवशी दुपारी साडेचारच्या सुमारास एनडीआरएफच्या पथकाने कुंडलिका नदीकाठी तब्बल ११ तास पाण्याखाली शोध घेतल्यानंतर विनीत पाठकचा मृतदेह शोधून काढला. तर घटनास्थळापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर दुसऱ्या पथकाने संध्याकाळी ७.३० च्या सुमारास चौधरी यांचा मृतदेह शोधून काढला.

दूसरी घटना तरी अशी आहे ज्यातील व्यक्ती इतकी दुर्दैवी आहे की आजतागायत पत्ता लागलेला नाहीये. 

२००९ साली २८ वर्षांची कविता चिखली नावाची तरुणी तिच्या ऑफिसमधील ३१ जणांच्या ग्रुपसह पुण्यापासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या सिंहगडला ट्रेकिंगसाठी गेली होती. मात्र तिथे ती रस्ता चुकली आणि हरवली. 

खूप शोधकार्य करण्यात आली तरी ती जिवंत आहे की मृत आजही पत्ता लागलेला नाहीये. 

या घटना ट्रेकिंग जरी मज्जा वाटत असली तरी किती भयानक प्रसंग आपल्यावर आणू शकते हे दाखवतात.

म्हणूनच ट्रेकिंगला जातात सावध असण्याची गरज असते. ट्रेकिंगला जाताना काय काळजी घ्यायची याबद्द्ल, 

बोल भिडूने प्रवास वेडे या संस्थेचे संस्थापक विनायक बेलोसे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार… 

आपण हरवू नये यासाठी सगळ्यात पहिले तर आपण ज्या भागात ट्रेकिंगला जातोय, जो भाग निवडतोय तो आपल्यासाठी अनोळखी असतो. म्हणून आधी त्या परिसराबद्दल बेसिक माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी नेटवर्क आहे का? जवळचं मोठं गाव कोणतं? पोलीस चौकी, हॉस्पिटल कोणतं? हे माहित करून घेणं. हे सर्व गुगलवर आरामात मिळतं, कुणालाही विचारायची गरज पडत नाही. 

त्या ठिकाणी गेल्यावर सर्वप्रथम आजूबाजूच्या गावातील लोकल माणसाचा नंबर असणं आवश्यक आहे. जो मुलगा लोणावळ्यात हरवला त्याच्याकडे जर लोकल माणसाचा नंबर असता तर तो त्यांना सांगू शकला असता. लोकल माणसांना जास्त माहिती असते. कारण गुरांना चरायला किंवा घाटात वगैरे कामानिमित्त त्यांची जा-ये असते, म्हणून त्यांना तो भाग पूर्ण माहित असतो. 

तेव्हा ट्रेकला जाताना जवळच्या गावात जनरल विचारपूस करणं, माहिती देणं-घेणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे एखादा वाट्याडा सोबत असला तर आणखी चांगलं. चार-पाचशे रुपये जास्त गेले तरी ठीक मात्र त्यांना वाटा माहित असतात. 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठे माघार घ्यायची, हे माहिती असावं. ते माहित नसेल तर काही अर्थ नसतो. 

आपल्याला वाटत असेल की आपण वाट हरवतोय तर तिथेच थांबलं पाहिजे. ही एक गोष्ट आणि दुसरं म्हणजे आजकाल GPS  ट्रॅकर्स आले आहेत. ते गुगल मॅप्स, GPS मॅप्स कसं वाचायचं, हे माहित असणं गरजेचं आहे. कशीही परिस्थिती असो, एकदम तंतोतंत नसली तरी थोडीफार माहिती देणारी नोट येतेच त्यावर. म्हणजे तो निळा लाईट गुगलचा तो साधारण दिशा सांगतोच. त्यावरून अंदाज येतो, म्हणून मॅप्स शिकायला हवे. 

याव्यतिरिक्त असतं लोकेशन सोडणं.

जिथे आपल्याला नेटवर्क मिळतं तिथे घरी किंवा कुणालाही माहिती असावं अशा व्यक्तीला लोकेशन पाठवत जाणं. भले व्हाट्सअपवर का असेना. थोडक्यात मार्क सोडत जाणं. कारण हरवलात तर त्या लास्ट लोकेशन आधारे रेस्क्यू करणं सोपं जातं. शिवाय हे जसं रेस्क्यू करणाऱ्यांना कामात येतं तसंच तुम्हाला देखील येतं. ते उघडल्यावर कुठल्या दिशेला तुम्ही आहात हे तुम्हाला स्वतःला कळतं आणि तुम्ही तसे परत जाऊ शकतात. 

लोणावळ्याच्या मुलाने लोकेशन सोडलं असतं तर त्याला लवकर रेस्क्यू करणं शक्य झालं असतं. 

आता या सगळ्या टेक्निकल गोष्टी सोडा. मोबाईलचं बंद पडला, जसा लोणावळ्याच्या मुलाचा पडला तर..?

साध्या सोप्या गोष्टी असतात.

पहिली गोष्ट आपण ज्या रस्त्याने जात आहोत त्या वाटा आपण वळून-वळून बघितल्या पाहिजे. भले वेळ जाऊद्या. कुठे काय आहे? कुठे झरा आहे? या मोठ्या दगडापासून आपण इकडे आलो होतो, इथे आंब्याचं झाड आहे, इथे एकदमच जंगलात मोठं मोकळं मैदान लागलं होतं, अशा छोट्या गोष्टी नोटीस करणं, लक्ष असू देणं आवश्यक आहे. 

शक्य झालं तर एकावर एक दगडं रचणं, फांद्या तोडत जाणं, म्हणजे काही तरी खुणा सोडणं. फॅन्सी वाटतं हे अनेकदा, पण करावं. जंगलात असंच असतं. कारण वाट चुकल्यावर याच खुणा बघत तुम्ही परत सेफली मागे येऊ शकतात. 

आता ट्रेकिंगला गेलात तर बेसिक कोणत्या गोष्टी सोबत असाव्यात तर एक कॅप – कधी ऊन पडेल सांगता येत नाही. अशात कॅपमुळे तुम्हालाच हिट लागत नाही आणि शक्ती राहते.  एक ड्रेस – घालायची गरज नाही पडली तरी पाणी गळायला किंवा कशालातरी बांधून खाली उतरायला मदत होतेच. मोबाईल पावर बॅकअप कारण हाच आपल्याला अशा स्थितीतून बाहेर काढतो. बॅटरी वाचवणं गरजेचं. 

भरपूर पाणी सोबत असणं. एकवेळ खाणं नसलं तरी हायड्रेटेड आपण राहिलो तर आशा मिळते आणि आपण पेशंसली ओढवलेल्या परिस्थितीचा सामना करू शकतो. टॉर्च असणं गरजेचंच. कारण टॉर्चनेच तुम्ही दूरवर तुमचं लोकेशन रेस्क्यू टीमला दाखवू शकतात. मोबाईलची लाईट जास्त दूर जात नाही, मोबाईल डेड झाला तरी टॉर्च कामी पडते. 

शिवाय आपण हरवलो तर कुणाला संपर्क करावा हे नीट माहिती असावं. त्यासाठी काही हेल्पलाईन नंबर आपल्याकडे असावे. 

जसं की MMRCC. महाराष्ट्र माउंटेनर्स रेस्क्यू कॉर्पोरेशन सेन्टर. 7620-230-231 हा त्याचा नंबर आहे. सर्च आणि रेस्युसाठी ही संस्था काम करते. लोणावळा वगैरे भागात गेलात तर शिवदुर्ग लोणावळा म्हणून संस्था आहे. रेस्क्यूसाठी काम करणारी ही सगळ्यात जास्त ऍक्सेसिबल संस्था आहे या भागातील ही. अशा संस्थांचे नंबर गुगल वर लगेच मिळतात. ते घेऊन ठेवणं गरजेचं आहेच. 

तर भिडूंनो,

अशाप्रकारे या सर्व गोष्टी आपण करू शकतो आणि हरवल्यावर परत घरी सुखरूप येऊ शकतो. कसं आहे? ब्लाइंडली कुठेही जाणं, ‘बेस्ट प्लेसेस अराऊंड लोणावळा’ वगैरे याला काहीही अर्थ नसतो. ‘सोलो इस फन’ मात्र जोपर्यंत आपण जे करतोय त्याची पूर्ण खात्री, माहिती नसते तोवर तसे ट्रेंड काही कामाचे नसतात. आणि एखादा वाट्याडा सोबत घेणं हे देखील टेक्निकली सोलोच असतं. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.