कावीळ का होते? आणि टाळण्यासाठी काय करावं.

रक्तातील पित्तारुण (बिलिरूबीन) या पित्तरंजकद्रव्याचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचा, डोळ्यांच्या बुबुळाचा पांढरा भाग, नखे वगैरे ठिकाणी पिवळेपणा दिसू लागतो; या स्थितीला कावीळ म्हणतात. रक्तद्रव्यातील पित्तारुण रक्तापासून वेगळे करणे आणि पित्तात विसर्जित करणे ही कामे यकृताद्वारे होतात. यकृतापासून पित्तारुणाचे उत्सर्जन होऊन ते पित्तनलिकेतून पित्ताचा घटक म्हणून आतड्यात पोहोचते. रक्तातील तांबड्या लोहित पेशींचे आयुष्य सुमारे १२० दिवस संपल्यानंतर त्यांचा नाश होतो.

कावीळ अनेक कारणांनी होऊ शकते सामान्य निरोगी व्यक्तीच्या रक्तद्रव्यातील पित्तारुणाचे प्रमाण दर शेकडा ०-५ मिग्रॅ. असते. हे प्रमाण शेकडा १.५ मिग्रॅ. पेक्षा अधिक वाढल्यास पिवळेपणा दिसू लागतो.

काविळीचे प्रकार

तांबड्या पेशीची विघटनात्मक कावीळ : तांबड्या पेशींचा मोठ्या प्रमाणावर नाश झाल्यास रक्तातील पित्तारुणाचे प्रमाण वाढते. पांडुरोगाच्या काही प्रकारांत वा रक्तात संसर्ग झाल्यास वा रक्ताधान करतेवेळी रक्तगट न जुळल्यासही अशा स्वरूपाची कावीळ होते.

यकृतजन्य कावीळ : यकृताला हानी पोहोचल्यास यकृतजन्य कावीळ होते. हिपॅटायटीस रोगाच्या विषाणूंचा संसर्ग झाल्यास, विषारी पदार्थ शरीरात गेल्यास वा यकृत सूत्रण रोगामुळे यकृताद्वारे पुरेसे पित्त स्रवले जात नसल्यास पित्तारुण साचून राहिल्याने यकृतजन्य कावीळ होते.

अवरोधी कावीळ : काही कारणांनी पित्ताचे खडे झाल्यास पित्तनलिकेचा मार्ग बंद होतो. आणि या प्रकारची कावीळ होते. काविळीमध्ये त्वचेचा रंग पिवळट दिसणे, अन्नाचा तिटकारा व क्वचित उलट्या होणे ही सर्वसाधारण लक्षणे आढळतात.

तरुणांमध्ये यकृतावर विषाणुदाह झाल्यामुळे कावीळ होते. मध्यमवयीन प्रौढांमध्ये पित्ताच्या खड्यांमुळे होणारी अवरोधी कावीळ आढळते. वृद्धपणी होणारी काविळीची लक्षणे यकृताचा वा पित्तनलिकेचा कर्करोग दर्शवितात. तसेच मद्यपान करणार्‍या व्यक्तींमध्ये होणारी कावीळ यकृतात बिघाड झाल्याचे दर्शविते.

काविळीवर इलाज करण्यासाठी तिच्या मूळाशी असलेले रोग शोधून काढतात. रुग्णाने संपूर्ण विश्रांती घेणे, तिखट व तेलकट आहार टाळणे आणि भरपूर फळे खाणे ही पथ्ये पाळावी लागतात. प्रतिजैविके आणि अ,ब,क तसेच के जीवनसत्त्वे इ. औषधांचा उपयोग केला जातो.

 हे ही वाचा भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.