ब्रिजभूषण यांच्यामुळे की आजारपणामुळे ; या ६ कारणांमुळे अयोध्या दौरा स्थगित झाला असू शकतो

देशाच्या राजकारणाची दिशा बदलवणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा ‘अयोध्या दौरा’ प्रचंड गाजत होता. त्यांनी सुरु केलेल्या ‘अयोध्या दौऱ्याच्या’ ट्रेंडमध्ये इतर नेते आपले अयोध्या दौरे पूर्ण करून परतही आलेत.. मात्र राज ठाकरेंचा अयोध्या दौऱ्याला मुहूर्त लागत नव्हता…

तितक्यात बातमी आली की,

राज ठाकरेंचा ५ जून रोजी होणारा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला !

राज ठाकरेंनी ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली आहे कि, दौरा जरी स्थगित झाला तरी पुण्यातील आगामी सभा ठरल्यानुसार पार पडणार आहे. मनसैनिकांनी त्यास उपस्थित राहावं असं आवाहन केलं आहे…

अयोध्या दौरा स्थगित करण्यामागे प्रकृतीचं कारण दिलं जातंय, मात्र पुण्यातली सभा नियोजित वेळेनुसार होणार आहे.

मग उत्तर प्रदेशातून होणाऱ्या विरोधाला राज ठाकरे घाबरले का? कट्टर भूमिकेसाठी खळ्ळखट्याक आंदोलनं घडवणारे राज ठाकरे यांनी माघार घेतली का? 

राज ठाकरेंनी माघार घेण्याची नक्की काय कारणं असू शकतात ?

खरं तर यामागे तब्येतीचं कारण सांगण्यात येतंय…मात्र राजकीय वर्तुळात चर्चेत असणारी काही कारणं पाहणे गरजेचे आहेत….

ती म्हणजे…

१)  उत्तर भारतातून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणारा विरोध.

मनसैनिकांकडून अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु होती अन तिकडे अयोध्येतून त्याला प्रचंड विरोध होत होता. तरीदेखील राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. पण राज ठाकरेंच्या ठाम भूमिकेला आव्हान देणारा नेता म्हणून युपीमधील बीजेपीचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह समोर आले.

त्यांनी,

“राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही,”

अशी भूमिका घेतली ज्यावर ते आजही ठाम आहेत.

१० मे ला त्यांनी अयोध्येत भव्य रॅली काढत या दौऱ्याला थेट आव्हान दिलं होतं. दरम्यान त्यांना ‘नमतं घ्या’ अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलीही होती मात्र ते काय माघार घेईनात.

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याशिवाय अयोध्येतील खासदारांनी तीव्र विरोधाची भूमिका घेतली म्हणून राज ठाकरेंना दौरा रद्द करण्यावाचून पर्याय नव्हता असं म्हणलं जातंय..एका खासदारामुळे राज यांच्या अयोध्या दौरा स्थगित करावा लागला हे मात्र नक्की. 

याशिवाय मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनीही ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता.

२) उत्तर भारतीयांची माफी मागायची नाही म्हणून हा निर्णय घेतला. 

हे तर स्पष्ट आहे कि, राज ठाकरेंची उत्तर भारतीयांबाबत काय भूमिका राहिल्यात. राज यांनी याआधी उत्तर भारतीयांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंकडे माफी मागण्याची मागणी केली. अन त्यावर ते अडून आहेत. पण त्यांच्या माफी मागण्याच्या मागणीला झुकतील ते राज ठाकरे कसले? त्यांनी एक वेळेस अयोध्या दौरा तात्पुरता स्थगित करण्याचा विचार केला मात्र उत्तर भारतीयांची माफी काय मागितली नाही.

३) राज ठाकरे यांच्या या नामुष्कीला भाजपच जबाबदार आहे का ?

राज ठाकरेंनी हिंदुत्वाची शाल पांघरली मात्र त्यांच्या खांद्यावर हि भगवी शाल नेमकी कुणी घातली हा प्रश्न निर्माण झाला.त्यावर त्याच दरम्यान झालेल्या त्यांच्या तिन्ही सभेतली भाषणं पाहता ते कळून गेलं अशी टीका होऊ लागली.

गेल्या एक-दीड महिन्यातील घटनाक्रम पाहता आधी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलेले राज ठाकरे आता अयोध्या दौऱ्यावरून माघार घेतायेत म्हणजेच त्यांच्यावर ही वेळ भाजपने आणली अशीही टीका राजकीय वर्तुळातून होत आहे. 

अगोदर राज ठाकरेंच्या रूपाने हिंदुत्वाच्या राजकारणाला पूरक असं  वातावरण तयार करून घेतलं गेलं आणि आता जेंव्हा राज ठाकरे राष्ट्राचे पातळीवर ओळखले जाऊ लागले, त्यांनी निर्माण केलेल्या मुद्द्यांना हिंदुत्ववादी जनता आकर्षित होऊ लागली तेंव्हा “आपल्या हक्काच्या हिंदुत्व व्होट बँकेत आणखी कुणी वाटेकरी नको” म्हणून त्यांना असं बाजूला केलं गेलं असंच चित्र दिसतंय.

कारण औरंगाबादला झालेल्या सभेत बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने काढता पाय घेतला होता.

४) मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी मनसेने माघार घेतली.

थोडक्यात अयोध्या दौरा करून राज ठाकरे शक्तिप्रदर्शन करणार होते. कारण भाषणापुरतं माहोल जमवण्यात आता पॉईंट नाही तर मतं मिळवण्यासाठी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला पाहिजे अशी योजना मनसेची असणार आहे. कारण २००९- २०१२ पासून प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा आलेख हा घसरताच राहिलाय. अनेक महत्वाचे शिलेदारही राज ठाकरेंना सोडून गेले आहेत.

थोडक्यात आजच्या घडीला राज ठाकरेंच्या पुढे सर्वात मोठा प्रश्न हा आहे कि, काहीही करून मनसेचं अस्तित्व टिकवून दाखवायचं.

त्यात येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. त्यालाच धरून गेल्या ३ सभा राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गाजवल्या. मात्र मुंबईच्या मतदारांना लक्षात घेऊन मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांची नाराजी ओढवून घेणं मनसेला परवडणारं नाहीये.

थोडक्यात उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी देखील राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्यातून माघार घेतली असावी.

५) दौऱ्याचं टायमिंग चुकतंय …

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ५ जूनला ५० वा वाढदिवस आहे. जो भाजप पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या दिमाखात साजरा करणार आहेत. आधीच एव्हडा मोठा जंगी कार्यक्रम होत असतांनाच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला फारसा टीआरपी आणि महत्व मिळणार नाही. 

दुसरं असंही आहे कि, दौऱ्याला लागणारी उत्तरप्रदेश सरकारची परवानगी महत्वाची आहे. खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना विरोध करायला सुरुवात केली तसं योगी आदित्यनाथ यांनी ब्र शब्दही काढला नाही. त्यामुळे असे तर्क लावले जातायेत की, बृजभूषण सिंह यांना भाजपचं बळ मिळत आहे. यामुळे अयोध्या दौरा स्थगित झाला असणार अशी कुजबुज चालू आहे.

६) खरंच राज ठाकरेंची तब्येत बिघडल्याने हा दौरा स्थगित झाला.

आता आपण म्हणतोय कि अयोध्या दौरा स्थगित केला मात्र पुण्यात २२ मे रोजी सभा होणार आहे. त्या सभेनंतर राज ठाकरे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच अयोध्या दौरा करणार आहेत. त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळेच ते काही दिवसांपूर्वीच पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतले होते.

एक ते दीड वर्षांपूर्वी राज ठाकरेंच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळतेय. मध्यंतरी त्याचे उपचार चालू होते मात्र या दुखण्याने पुन्हा डोकं वर काढलं. शस्त्रक्रीया करण्याची पुन्हा गरज लागू शकते असा डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय. जर का शस्त्रक्रीया झाली तर राज लागलीच दौऱ्यावर जाऊ शकणार नाहीत.

थोडक्यात राज यांच्या ‘राजकीय’ दौरा होणार कि नाही हे खुद्द राज ठाकरे ठरवणार नाहीत तर त्यांचे डॉक्टरच ठरवतील… 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.