दिल्लीमधल्या बाटला हाऊस एन्काउंटर वेळी नेमकं काय घडलेलं?
या बाटला हाऊसच्या एन्काउंटरमधलं शहजाद अहमद हे असं नाव आहे जे, फार महत्वाचं आहे. या आतंकवाद्याने झाडलेल्या त्या गोळीमुळेच पोलीस खात्यावर संशय घेतला गेला होता. पोलीस खात्यातल्याच लोकांनी इन्सपेक्टर मोहनचंद शर्मा यांना मारल्याचा आरोप होत होते.
याच शहजाद अहमदचा आता मृत्यू झालाय.
शहजाद हा तिहार तुरूंगात असताना तब्बेत बिघडल्यामुळे त्याला जीटीबी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. त्यानंतर त्याला एम्समध्ये हलवलं होतं.
न्यायालयाने इन्सपेक्टर मोहनचंद शर्मा यांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं होतं शिवाय इतर पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ल्यासाठीही शहजाद अहमदला कारणीभूत धरलं होतं. मोहनचंद शर्मा यांना लागलेली गोळी ही शहजाद अहमद याच्या बंदुकीतून निघाली होती.
बाटला हाऊस एन्काउंटर वेळी नेमकं काय घडलेलं?
१३ सप्टेंबर २००८ राजधानी दिल्लीमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. सगळा देश हादरला. अर्ध्या तासात पाच बॉम्ब फुटले. जवळपास ३० जणांचा मृत्यू आणि ९० जण जखमी झाले होते. गेल्या काही दिवसापासून झालेल्या जयपूर, अहमदाबाद बेंगलोर पाठोपाठ हा धमाका झाल्या मुळे सगळीकडे घबराटीचे वातावरण होते.
तत्कालीन सरकारवर निष्क्रीयतेचे आरोप जोरात सुरु झाले. एवढे हल्ले होऊन भारतीय सुरक्षा यंत्रणा गप्प का हा प्रश्न विचारला जात होता. आता काही तरी करणे गरजेचे होते.
१९ सप्टेंबर २००८
आदल्या दिवशी दिल्ली पोलिसांना गुजरातमधून एक टीप मिळाली जामिया नगर भागात काही अतिरेकी लपून बसले आहेत. तिथले फोन रेकॉर्ड ट्रेस केल्यावर पोलिसांना त्यांचे लोकेशन कळाले. L-18 बाटला हाउस flat no 107, जामिया नगर दिल्ली. सकाळचे साडे दहा वाजले असतील. दिल्ली पोलिसांची सात जणांची स्पेशल टीम इन्स्पेक्टर मोहनचंद शर्माच्या नेतृत्वाखाली या बाटला हाऊस ऑपरेशनवर निघाली होती .
मोहनचंद शर्मा हे बहादूर पोलीस ऑफिसर म्हणून ओळखले जायचे. त्यांनी बिल्डींग मध्ये कोणालाही शंका येऊ नये म्हणून वोडाफोन कम्पनीतर्फे सर्व्हे घ्यायला आलॉय असे सांगितले. चार मजली इमारत होती, दुसऱ्या मजल्यावर अतिरेकी लपले होते. पोलिसांनी सापळा रचला. काही पोलीस गेटवर नाकेबंदी करून उभे राहिले तर मोहनचंद शर्मा एका साथीदाराला घेऊन वर गेले.
त्याचे नाव सबइन्स्पेक्टर धर्मेंद्र.
या सबइन्स्पेक्टर धर्मेंद्रने वोडाफोन एजंट म्हणून त्या फ्लटमध्ये प्रवेश केला. बाकीचे सहा जण त्याची वाट पहात थाब्ले होते. काहीवेळाने परत आल्यावर धर्मेंद्रने माहिती दिली की अतिरेकी तिथेच आहेत. मुख्य दार बंद झाले होते. मोहन चंद शर्मानी डायरेक्ट हल्ला करायच ठरवलं.
धडक देऊन फ्लॅटचं मेन दार तोडल. अतिरेकी सावध झाले. अंधाधुंद गोळीबार सुरु झाला. आसपासच्या रहिवाश्यांना कळेना काय झालंय. जोरदार फायरिंगचे आवाज बाहेर येत होते. थोड्याच वेळात हा गोंधळ थांबला. वेगवेगळ्या टीव्ही चॅनलचे रिपोर्टर तो पर्यंत तिथे गोळा झाले होते.
जखमी मोहनचंद शर्मा ना तिथून घेऊन जात असताना चे चित्र सगळ्या देशाने पाहिलं. काही वेळाने बातमी आली, अतिफ अमीन आणि मोहम्मद साजिद नावाचे दोन अतिरेकी मारले गेले. यातला अतिफ अमीन हा जैश इ मोह्म्म्दचा कमांडर वर दिल्ली बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगण्यात आले. दोन अतिरेकी पकडले गेले आणि आणखी दोन पळून गेले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
या ऑपरेशनमध्ये मोहनचंद शर्मा यांना हौतात्म्य आले. त्यांनी दाखवलेल्या बहादुरीबद्दल त्यांना अशोकचक्र जाहीर करण्यात आले. पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले,
“शर्मा यांनी असाधारण धैर्य दाखविले. त्यांचे कार्य आपल्या सुरक्षा दलांसाठी कायम प्रेरणाई ठरणारे आहे”
पण काही दिवसांनी या एन्काउन्टरवर शंका व्यक्त करणारे आरोप सुरु झाले. एवढ्या मोठ्या ऑपरेशनवेळी दोन अतिरेकी पळून कसे जाऊ शकले यावर प्रश्न उभे राहिले. सापडलेला अतिरेकी मोहम्मद सैफ हा एवढ्या गोळीबारात सुद्धा जिवंत कसा राहिला? असं म्हटलं गेलं की सैफचे वडील राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे त्याला माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं.
सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता कि मोहनचंद शर्मा यांचावर गोळी कोणी झाडली? पोलिसांपैकीच कोणी तरी शर्मा यांचा खून केला असण्याची शक्यता बोलून दाखवली गेली.
खूप सारे आरोप झाले. धरणे, आंदोलने करणयात अली. समाजवादी पक्ष आणि बसपा यांनी सरळसरळ हा फेक एन्काऊंटर असल्याचा दावा केला. सत्ताधारी काँग्रेस पक्षातील ही काही नेत्यांनी अशीच शंका व्यक्त केली. खुद्द पक्षाध्यक्षा सोनिया गांधी ही घटना ऐकून रडल्या होत्या असे ही आरोप झाले. पण तत्कालीन गृहमंत्री, प्रधानमंत्री यांनी हे सगळे आरोप खोडुन काढले.
पाच वर्षांनी या एन्काऊंटरचा कोर्टात निकाल लागला. त्यात हे ऑपरेशन फेक नव्हते याचा निर्वाळा देण्यात आला. पळून गेलेल्या अतिरेक्यांपैकी शाहजाद अहमद हा सापडला होता त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
या शहजाद अहमदची गोळी इन्सपेक्टर मोहनचंद शर्मा यांना लागली होती. हे सिद्ध व्हायला मात्र ५ वर्षे निघून गेली. त्यामुळे, आता त्याच्या गोळीमुळे पोलीस खात्यावर प्रश्न उपस्थित झाले होते असं बोललं जातं. त्याच अतिरेक्याचा आता मृत्यू झालाय.
हे ही वाच भिडू .
- तर सोहराबुद्दीन सांगलीत असता..!
- त्यांच्या एका गोळीने पुढे दया नायक ते प्रदिप शर्मांसारखे एन्काऊंटर स्पेशॅलिस्ट तयार झाले.
- आपल्या तीन नवऱ्यांना मारून दिल्लीच्या रेड लाईटवर राज्य करणारी खऱ्या आयुष्यातील सोनू पंजाबन.