अचानकपणे असा हल्ला झाल्यावर पोलिस काय करतात? तीन निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी उत्तर दिलंय
एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यात शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासाठी गेल्या ५ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. आज या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी धडकले होते.
यावेळी काही कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत दगडफेक आणि चप्पलफेक केली. मोठ्या प्रमाणात आंदोलक पवारांच्या घरात घुसल्याने गोंधळ उडाला होता. मुंबई पोलिसांनी ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्याने सुप्रिया सुळे यांनी पोलिसांचे आभार मानले. अचानकपणे अशा प्रकारे जमाव घरारावर आल्याने सगळेच गोंधळात पडले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी लगेच ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील प्रकार टाळला.
अशा प्रकारे अचानकपणे एखादा जमाव चालून आला, हिंसक झाला तर कुठली स्टॅटर्जी वापरून पोलीस यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणते. याबद्दल बोल भिडूने निवृत्त पोलीस अधिकऱ्यांशी संपर्क साधून पोलीस यंत्रणा कशा प्रकारे काम हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यातलं पहिले आहेत भानुप्रताप बर्गे,
भानुप्रताप बर्गे हे पुण्यातून एसीपी म्हणून निवृत्त झाले आहेत. १९ एन्काउंटर त्यांच्या नावावर आहेत. ४०० पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.
बोलभिडूशी बोलतांना निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे म्हणाले,
एखाद्या ठिकाणी जमाव जर चालून येत असेल तर त्याला जागेवरचं थांबविण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणेकडून करण्यात येतो. जमावाला लिडर असेल तर त्यांना थांबविणे सोपं असतं. लिडर नसेल तर मग त्यांना अडविणे अवघड होतं. अशा वेळी पोलीस यंत्रणा जागेवरची परिस्थिती पाहून आंदोलकांना ताब्यात घेते, तरी जमाव ऐकत नसले तर लाठीचार्ज करण्याशिवाय पोलिसांकडे दुसरा पर्याय नसतो. एवढं करूनही जमाव हिंसक होत असेल तर शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांकडून गोळीबार करण्याचा निर्णय घेण्यात येतो. ‘ऑन द स्पॉट’ नेमकी काय ऍक्शन घ्यायची हा निर्णय प्रभारी अधिकाऱ्याचा असतो.
तर दुसरीकडे पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करुन घटनेची माहिती देण्यात येते. यावेळी कमिशनर ऑफिस आणि पोलीस स्टेशनकडे असणारे रिझर्व्ह फोर्स घटनास्थळी पाठविण्यात येते. मोठ्या शहरात आणीबाणीच्या काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये १५ ते २० पोलीस कर्मचारी रिझर्व्ह फोर्स मध्ये असतात.
आणीबाणीच्या काळात या रिझर्व्ह फोर्स तात्काळ घटनेच्या ठिकाणी पाठविण्यात येतं.
पोलीस प्रशिक्षणा वेळीच अशा प्रकारे जमाव चालून आला तर कशा प्रकारे त्यांच्याशी डील करायचे हे शिकविण्यात येतं. मॉब मधील लोकांशी गोड बोलून, समजवून त्यांना पुढे येऊ न देणं, त्यांच्याशी बोलून काही मार्ग निघेल का यासाठी प्रयत्न करण्यात येतातं.
मुख्य म्हणजे जमावातील लोकांना बोलण्यात गुंतवून पोलसांची अधिक फोर्स मागविण्यात येते. जमावाशीडील करण्यासाठी रॅपिड ऍक्शन फोर्स तयार करण्यात आली आहे. शहरात महत्वाच्या ठिकाणी ही रॅपिड ऍक्शन फोर्स २४ तास तैनात असते. अशा प्रकारची घटना घडल्यास रॅपिड ऍक्शन फोर्स घटनेच्या ठिकाणी पाठविण्यात येते. या फोर्सला दंगल, मॉब, आंदोलक हिंसक झाले तर ते कशा प्रकारे हॅण्डल करायचा याच विशेष प्रशिक्षण दिल जातं असेही बर्गे यांनी सांगितले.
दुसरे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत अशोक धिवरे,
अशोक धिवरे हे अप्पर पोलीस महासंचालक म्हणून निवृत्त झाले. धिवरे हे पुण्यात ऍडिशनल कमिशन होते.
अचानक समोर आलेल्या जमावशी पोलीस कशाप्रकारे सामोरे जातात याबद्दल बोल भिडूशी बोलतांना अशोक धिवरे सांगतात,
एखादी घटना घडल्यानंतर सगळ्यात अगोदर ही माहिती कंट्रोल रूमला देण्यात येते. कंट्रोल रूमला माहिती दिल्यावर तेथून वायरलेस वरून सूचना देण्यात येतात. या सूचना पोलीस कमिशनर पासून ते सगळ्या पोलिस कर्मचारी, पोलीस स्टेशनला देण्यात येते.
प्रत्येक पोलीस स्टेशनची पेट्रोलिंग व्हॅन २४ तास त्यांच्या हद्दीत फिरत असते. बिट मार्शल मोटारसायकल वरून पेट्रोलिंग करत असतात. या सर्व गाड्यांना जीपीएस असते. त्यामुळे या गाड्यांची सगळी माहिती कंट्रोल रूमला असते. त्या कुठं आहेत, त्यात किती कर्मचारी आहेत. आंदोलन, जमाव जिथे कुठे जमला असेल तिथे या पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनांना लगेच तिकडे जायला सांगतात.
यावेळी पोलीस कर्मचारी, अधिकारी घटनेच ठिकाण कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे हे पाहत नाहीत. तिथे पोहचल्यावर अगोदर त्या जमावात जाऊन त्यांना समजविण्याचा प्रयत्न करतात. गर्दीला कसं हॅण्डल करायचे हे पोलिसांना ट्रेंनींग मध्येच शिकविण्यात येते. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना जमाव हॅण्डल करणं तसं अवघड जात नाही.
जर जमाव हिंस्त्र झाला तर बळाचा वापर करून त्यांची पांगापांग करण्यात करण्यात येते.
कंट्रोल रूम, पोलीस स्टेशन, ऍडिशनल कमिशनर यांच्याकडे रिझर्व्ह पोलीस फोर्स असते. अप्रिय घटना घडल्यास ती फोर्स घटनास्थळी पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली जाते असं अशोक धिवरे यांनी सांगितले.
बोल भिडूला माहिती देणारे तिसरे निवृत्त अधिकारी आहेत राजेंद्र भामरे
राजेंद्र भामरे हे सहायक पोलीस आयुक्त म्हणून पुण्यातून निवृत्त झाले आहे. त्यांनी महाराष्ट्रतील विविध भागात पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
राजेंद्र भामरे म्हणाले,
हल्ला झाल्यास, जमाव चालून येतोय अशा घटना घडल्यास सगळ्यात अगोदर कन्ट्रोल रूम ला फोन करण्यात येतो. कन्ट्रोल रूम घटनेच्या आसपास असणाऱ्या सगळ्या पोलीस स्टेशनला त्याची माहिती देते. शहरात पोलिसांकडून २४ तास पेट्रोलिंग करण्यात येते. ज्या गाड्या घटनास्थळाच्या आजूबाजूला पेट्रोलिंग करत असतांना त्यांना जमाव, आंदोलक जिथे जमले असतात तिथे पाठविण्यात येते.
पोलीस स्टेशन आणि कमिशनर ऑफिसला रिझर्व्ह पोलीस फोर्स असते. ते कर्मचारी घटनेच्या ठिकाणी पाठविण्यात येतात. जमाव चालून येत असेल तर त्यांना अडविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. जर जमाव ऐकण्याचा मनस्थिती नसेल तर मग पोलीस यंत्रणा बळाचा वापर करतात. जमाव जर हिंस्त्र झाला तर लाठीचार्ज ते गोळीबार अशा प्रकारची कारवाई करण्यात येते.
कायदा मोडत असेल तर बळाचा वापर करून पोलीस अटक करते. अटक करतांना बळाचा वापर करण्याची पॉवर पोलिस यंत्रणेकडे असते असे भामरे यांनी सांगितले.
हे ही वाच भिडू
- मार्च एन्ड आलाय, पोलीस मामांनी धरलं, तर काय करायचं…? वाचून घ्या..
- पोलीस स्टेशनात गाड्यांचा ढीग लागलेला असतोय, त्यांचं पुढं काय होतं..?
- पुण्याचे दोन पोलीस अधिकारी स्कॉटलंडयार्ड गेले अन् राज्यात डॉग स्कॉड सुरु झालं..