ती सध्या काय करते..?

हया से सर झुका लेना, अदा से मुस्कुरा देना
हसीनों को भी कितना सहल है, बिजली गिरा देना 

आमच्या एका दोस्तानं तिचा फोटो कापून रुममध्ये लावला होता आणि त्याच्याखाली हा शेर पेन्सिलनं लिहिला होता. आपण जेव्हा केव्हा अधिकारी बनू, तेव्हा या लेव्हलचे बनू की तिला भेटता येईल. ती म्हणजे आमच्या सगळ्या रुमनं युपीएससीचा अभ्यास मन लाऊन करण्याचं कारण होती. आता गोष्टी ३६० अंशात बदललेल्या असल्या… तरी कोक स्टुडिओ पाकिस्तानची गाणी ऐकताना प्रामाणिकपणे तिलाच आठवायचं हा आमचा कुणीच न लिहिलेला पण ठरलेला नियम आहे. ती बोलायची तेव्हा इंग्लिशही कळायचं… मग उर्दू काय चीझ होती.

तिचं नाव हिना रब्बानी खार, पाकिस्तानची माजी परराष्ट्र मंत्री आणि कित्येकांचं काळीज… तुटलेलं आणि स्वप्नातलं…

तर झालं असं होतं की, २०११ च्या जुलै महिन्यात हिना रब्बानी खार भारतात चर्चेसाठी आल्या होत्या. २००८ च्या मुंबई हल्ल्यांनंतर भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होत असतानाच १३ जुलै २०११ ला मुंबईत बॉम्बस्फोट झाले, त्यानंतर फक्त १३ दिवसांनी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री भारतात येणार म्हणून देशात कल्ला झाला होता.

त्या काय बोलतात, काय मोठं वक्तव्य करतात, काश्मीर प्रश्नावर काय भूमिका घेतात या गोष्टी प्रचंड महत्त्वाच्या होत्या… पण या मुद्द्यांना बातम्यांमध्ये फारसं स्थान मिळालंच नाही. ती जागा घेतली रब्बानी यांच्या दिसण्यानं, त्यांच्या गळ्यातल्या मोत्यांच्या नेकलेसनं आणि महागड्या बॅगनं…

इतर परराष्ट्र मंत्री दुसऱ्या देशात गेल्यावर जे बोलतात, तेच रब्बानी इथं बोलल्या. त्यांनी हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांची भेटही घेतली, भारतीय जनता पक्षानं या विरोधात चांगलंच रान पेटवलं. रब्बानी यांची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. भारताला ‘most favoured nation’ हा दर्जा देण्याचा अयशस्वी प्रयत्नही रब्बानी यांनी केला.

पेपर आणि टीव्हीवर आलेले फोटो पोरांनी आयुष्यभरासाठी लक्षात ठेवले. मंत्री म्हणल्यावर झब्बा कुर्ता आणि साडी ही इमेज कित्येकांच्या डोक्यातून गेली नव्हती, पण हिना रब्बानी यांनी या सगळ्या इमेजला तडा दिला. साधा पण सुंदर सलवार कुर्ता आणि एखाद्या मॉडेलला लाजवेल असं दिसणं…पोरांच्या काळजाला अलगद छेडून गेलं.

आता तुम्ही तिचा वर्तमानकाळ वाचायला आतुर झाले असणार, पण आधी थोडा इतिहास बघायला पाहिजे भिडू. एकतर्फी असली, तरी लव्हस्टोरी शेवटपर्यंत बघायची असती, असं म्हणतात.

तर हिना ही पाकिस्तानचे नेते गुलाम नूर रब्बानी खार यांची मुलगी. अर्थशास्त्रात ऑनर्स पूर्ण केल्यावर तिनं अमेरिकेतून बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री घेतली. पाकिस्तानमध्ये परत आल्यावर २००२ मध्ये तिनं लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही. २००३ मध्ये शौकत अजिज यांच्या मंत्रिमंडळात तिची संसदीय सचिव म्हणून नियुक्ती झाली. पुढच्याच वर्षी हिना रब्बानीची इकॉनॉमिक अफेअर्सची राज्यमंत्री म्हणून निवड झाली. २००७ पर्यंत तिनं हे पद भूषवलं.

२००८ मध्ये हिना पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये सामील झाली आणि पुन्हा निवडूनही आली. फायनान्स आणि इकॉनॉमिक अफेअर्सच्या राज्यमंत्री पदी पुन्हा एकदा तिची नियुक्ती झाली. आता अर्थशास्त्रातलं काय कळत नसलं, तरी पाकिस्तानची पोरं पार मन लावून बातम्या बघत असणार.. हे फिक्स.

भारतातल्या पोरांच्या मनात हिनाची एंट्री झाली, ती २०११ मध्ये. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात डेप्युटी हेड म्हणून तिची नियुक्ती झाली आणि मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेत तिची नियुक्ती झाली थेट परराष्ट्र मंत्री म्हणून. झालं, पेपरमध्ये तिचे फोटो झळकले आणि भारतभेटीत तर कहरच झाला. वयाच्या ३४ व्या वर्षी पाकिस्तानची मंत्री बनलेली हिना पाकिस्तानची पहिली महिला परराष्ट्र मंत्री होती. २०१३ पर्यंत तिनं हे पद भूषवलं, त्यानंतर मात्र तिनं निवडणूक न लढवण्याचं ठरवलं आणि वडिलांसाठी आपली जागा सोडली. (आमच्या मनात मात्र ती आजन्म खासदार राहील…)

पुढं तिच्या राजकीय कारकीर्दीबद्दलच्या बातम्या येणं कमी झालं, तिचं आणि बिलावल भुट्टोचं अफेअर असल्याच्या आणि त्यांचं लग्न होण्याच्या बातम्यांनीही कळस गाठला… पण हिनानं १९९९ मध्येच फिरोझ गुलजार या पाकिस्तानी उद्योगपतीशी लग्न केलेलं. (हा थोडा दर्द हुआ, पर चलता है) बिलावल आणि तिचं अफेअर या अफवाच ठरल्या… पण नाय म्हणलं तरी आपलं नशीबही फोटो बघण्याच्या पुढे सरकलं नाही.

२०१६ मध्ये तिनं पाकिस्तान युद्धाच्या धमक्या देऊन काश्मीर आपल्या ताब्यात घेऊ शकत नाही, असं वक्तव्य केलं आणि पाकिस्तानमध्ये त्याची जोरदार चर्चा झाली. २०१८ मध्ये हिना रब्बानी हे नाव पुन्हा एकदा पाकिस्तानच्या संसदेत चमकलं, तिथं महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर ती पाकिस्तान पीपल्स पार्टीकडून निवडून आली. सोबतच ती अनेक जाहीर कार्यक्रमांमध्ये आपल्या वक्तृत्वाची छाप पाडू लागली, पब्लिक स्पीकर म्हणूनही तिचं नाव प्रचंड गाजलं आणि गाजतंय.

एका पाकिस्तानी वेब पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, मार्चच्या पहिल्या आठवड्यात पार पडलेल्या पाकिस्तानच्या आर्थिक धोरणांविषयीच्या बैठकीला ती उपस्थित होती. वेगवेगळे प्रकल्प सुरू करायला घेतलेल्या कर्जाच्या रकमेत गैरव्यवहार झाल्याचा आणि त्याची चौकशी करायचा सल्ला तिनं या बैठकीत दिला. आता तिला कुणी सांगावं की, पोरी तुझ्यामुळं आमची बेरीज-वजाबाकी किती वेळा गंडली, पण आम्ही हिशोब ठेवला नाही.

थोडक्यात काय तर एका मोठ्या ब्रेकनंतर ती पुन्हा एकदा राजकारणात, पाकिस्तानची धोरणं ठरवण्यात सक्रिय होतेय. सध्या पाकिस्तानात तेहरीक ए इन्साफ पक्षाचं सरकार आहे, तिथं सरकारं लय वेळ टिकायचा इतिहास तसा फार नाही… त्यामुळं कधी सत्ता बदलेल आणि हिना रब्बानी मंत्री होईल हे काय सांगता येत नाही.

आमच्या रुममधली सगळी पोरं आता मार्गी लागली, पण मलर आणि श्रीवल्लीच्या जमान्यात आजही हिना रब्बानी खार वरचा क्रश कायम आहे. कधी भविष्यात भारत-पाकिस्तानचे संबंध जुळले, तर हिना रब्बानी तेवढी भारतात यावी… तिनं विमानातून उतरावं, तो निळ्या रंगाचा सलवार-कुर्ता, मोत्यांची माळ, डोळ्यांवरचा गॉगल, गालावर आलेली केसांची बट अलगद बाजूला करावी, माळेतल्या मोत्यांसारखे शुभ्र दात पुन्हा एकदा हसताना दिसताना दिसावेत आणि, तीचा पेपरात आलेला फोटो आता फेसबुकवर टाकून लिहावं…

तेरी अदा की क़सम है, तेरी अदा के सिवा
पसंद और किसी की हमें अदा न हुई…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.