एकॉन सध्या काय करतोय? तर सेनेगलचा ‘गडकरी’ बनायला बघतोय…
Smack that all on the floor
Smack that give me some more
Smack that ’till you get sore
Smack that oh-oh!
आता या चार लाईनी तुम्ही सुरात वाचल्या असतील, तर योगासन करुन स्वतःची पाठ थोपटून घ्या. कारण तुम्ही नॉस्टॅल्जीक भिडू ही पदवी मिळवलेली आहे. सुरात वाचल्या नसतील, तरी खचायचं नाही. पास होण्याचा दुसरा पर्याय देतो…
I wanna make up right now na na
I wanna make up right now na na
Wish we never broke up right now na na
We need to link up right now na na
इथं जुळणी झालेली असणार फिक्स. कारण हे गाणं आपण लय कूल आहोत हे दाखवायला, एखाद्या स्टॅंडर्ड खड्याला इम्प्रेस करायला किंवा ज्याच्या बापाला नाना म्हणतात अशा मित्राला चिडवायला आपण फिक्स म्हणलेलं असतं.
ही दोन्ही गाणी म्हणजे आपलं बालपण किंवा तरुणपण आणि या गाण्याचा सिंगर म्हणजे…
एकॉन किंवा ॲकॉन. कायपण म्हणा भावना महत्त्वाच्या.
आता ज्याकाळात एकॉन आपला आवडता सिंगर होता, तेव्हा आपलं आयुष्य लय निवांत होतं. २००४ मध्ये ट्रबल नावाचा एकॉनचा पहिला अल्बम मार्केटमध्ये आला. त्यानंतरही बरीच गाणी रिलीज झाली, अल्बमही आले. मात्र एकॉन भारतात हिट झाला, तो दोन गाण्यांमुळं.
एक म्हणजे स्मॅक दॅट आणि दुसरं म्हणजे राईट नाऊ. आता परत जाऊन तुम्ही स्मॅक दॅटच्या लिरिक्स पाहिल्या, तर तुमच्या नाड्या बाद होतील. कारण भिडू गाण्यात लय गोष्टी डबल मिनिंग आणि पोरगा आणि पोरगी जवळ येण्याची प्रोसेस सांगणाऱ्या आहेत.
राईट नाऊच्या लिरिक्समध्ये जाऊ नका (गेलातच तर बोल भिडूनं दर्दभऱ्या स्टोऱ्याही लिहून ठेवल्या आहेत, कितीही डाऊन झालात तरी वाचा.)
शाळेत, कॉलेजला असणाऱ्या पोरांना एकॉनबद्दल, त्याच्या गाण्यांबद्दल, हिपहॉपबद्दल माहीत होतं. पोरांना त्याचं इंग्लिश कळत नसलं, तरी एकॉन आवडायचा हे मात्र नक्की. पण आलम भारतात एकॉन घरोघरी कसा पोहोचला?
याचं उत्तर पुन्हा चार ओळीत सापडतं,
Shawty I am gonna getcha
You know I am gonna getcha
You know I will even letcha
Letcha be my छम्मक छल्लो
आठवली का लाल कपड्यातली करीना? विषय गंभीर. रा-वन पिक्चरमध्ये (यात नाय का हिरोचं दफन करतात आणि मग अस्थी विसर्जन करतात) एका गाण्यासाठी एकॉननं काही ओळी गायल्या आणि या बादशहाला इकडं गायला लावलं म्हणून शाहरुख खान पुन्हा एकदा बादशहा ठरला.
अजूनही एकॉनचं एखाद-दुसरं गाणं मार्केटमध्ये येतं, पण आधीसारखं भारतात हवा करत नाय. त्यामुळं आपल्याला प्रश्न पडतो,
एकॉन सध्या काय करतो..?
भिडू शपथेवर सांगतो, शोधता शोधता एक बातमी घावली. एकॉन मराठीमध्ये गाणं गाणार. नशीबानं तसलं काय झालं नाही, नायतर पुण्यातल्या कुठल्यातरी काकांनी एकॉनच्या सुरांची मापं काढत त्यालाही सुट्टी दिली नसती.
ते राहूद्या, सगळ्यात मेन पॉईंट हा आहे, की एकॉनला सेनेगलचे ‘नितीन गडकरी’ बनायचंय.
तुम्ही म्हणाल येड्यात काढतोय का भिडू? काहीही काय… पण खरंच.
एकॉनला बनायचंय बिल्डर, नाय नाय तब्येतवाला नाय.. रिअल इस्टेट वाला. आणि गडी किरकोळीत खेळणार नाहीये… तर स्वतःची शहरं बांधणार आहे. एक युगांडामध्ये आणि एक त्याच्या मायदेशात म्हणजे सेनेगलमध्ये.
या शहरांना गडी नाव देणार आहे, एकॉन सिटी. या सिटीमध्ये काय काय असणार? तर एकदम हायटेक बिल्डिंग, खुंखार गुळगुळीत रस्ते, एकदम परफेक्ट नगररचना, सुपरफास्ट वाहतूक…
आता एखाद्या शहरात एवढे सगळे फीचर्स निर्माण करण्याची आशा आपल्याला याआधी फक्त एकाच माणसानं दाखवलीये, ते म्हणजे आपले मंत्री नितीन गडकरी… म्हणून सेनेगल आणि युगांडात फिरताना, एकॉन गडकरींचा फोटो मोठ्या श्रद्धेनं खिशात ठेवत असावा अशी दाट शक्यताय.
सेनेगल आणि युगांडामध्ये उभ्या राहणाऱ्या या एकॉन सिटीचं वैशिष्ट्य म्हणजे, इथं एकॉनची स्वतःची क्रिप्टोकरन्सी चालणार आहे. एकॉईन नावाची क्रिप्टोकरन्सी त्यानं लॉन्च केली होती. सेनेगलमध्ये वाढती महागाई, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि लोकांच्या वाढत्या आंदोलनाला पर्याय म्हणून एकॉननं आपलं शहर आणि आपली पर्यायी अर्थव्यवस्था असे दोन पर्याय खुले केले आहेत.
सेनेगलमधल्या प्रोजेक्टसाठी तो सहा बिलियन डॉलर्स एवढे पैशे लावतोय.
त्याची स्वतःची क्रिप्टोकरन्सी लोकं कुठल्याही इतर करन्सीप्रमाणं वापरु शकतील. त्याचं शहर उभं राहिलं की ते सेनेगलमधल्या घरांच्या टंचाईचा प्रश्न सोडवेल, तरुणांना जॉब देईल असं बोललं जातंय. त्यानं आफ्रिकेतल्या अनेक ठिकाणी ‘सौर ऊर्जा’ आणत तिथल्या जनतेचं जगणं सोपं केलंय. पण असं असलं तरी सेनेगलमध्ये एकॉन सिटीला विरोध होतोय.
युगांडामधल्या सरकारनं त्याला पाठिंबा दिला असला, तरी तिथल्या विरोधी पक्षातनं एकॉन हवेत गोळीबार करतोय, असा आरोपही केलाय.
सेनेगल असो किंवा युगांडा डायरेक्ट हायटेक सिटी बांधणं हे काय सोपं काम नाही. सेनेगलमध्ये पहिला फेज २०२३ पर्यंत आणि दुसरा फेज २०२९ पर्यंत बांधायचा त्याचा प्लॅन आहे. तर युगांडाची डेडलाईन आहे, २०३६.
होईल का नाय, यावर मोठं प्रश्नचिन्ह असलं, तरी जर का झालं तर एकॉन सिटी नाव काढणार आणि तिकडं प्रत्येक फ्लेक्सवरही एकॉन भाऊचाच फोटो दिसणार.
एकॉनची नवी गाणी नाय आली तर उचकु नका, भाऊ सध्या बांधकामात बिझी असेल.
हे ही वाच भिडू:
- ती सध्या काय करते..?
- दात पुढ आलेला हा लाजाळू भारतीय मुलगा जगातला “ग्रेटेस्ट रॉकस्टार” बनला.
- ब्रह्मानन्दम : थपडा खाऊन स्टार बनलेला माणूस.