आता बारक्या पोरांसाठी पण हेल्मेट कम्पल्सरी केलंय, पण पुणेकरांना हेल्मेट खरंच आवडत नाय का?

चितळे बंधू, शनिवारवाडा, प्रतिसमुद्र खडकवासला, प्रति मरीन लाईन्स नदीपात्र, बाकरवडी, आयटी पार्क, नवीकोरी मेट्रो हे सगळं ऐकल्यावर पुणेकरांची छाती फुगते. अस्सल पुणेकर माणूस जगात कुठल्याही विषयावर बोलायला ऐकत नाही. तुम्ही काहीही विचारा यांच्याकडे उत्तर रेडी असतंय. समजा उत्तर नसलंच, तरी आमचंच म्हणणं कसं बरोबर आहे ही गोष्ट ते तुम्हाला पटवून देऊ शकतात, तेही अगदी सहज. पण याच पुणेकरांचा मूड एका गोष्टीचं नाव घेतल्यावर बाद होऊ शकतो, ते म्हणजे हेल्मेट.

पुण्यात राहून आलेला दोस्त तर सांगत होता, इथली लोकं पगडी घालायला तयार होतील, पण हेम्लेट घालायला मात्र अजिबात नाही. आता तुम्ही म्हणाल, भिडूला आज पुणेकरांची आठवण कशी काय आली?

तर उत्तर तसं लई सोपं आहे. केंद्र सरकारनं एक नियम केलाय, त्यानुसार आता टू-व्हीलरवर सोबत असणाऱ्या नऊ महिने ते चार वर्षांच्या बारक्या लेकरांना हेल्मेट घालणं आणि हार्नेसचा वापर करुन चालकाच्या छातीला बांधणं गरजेचं आहे. २०१६ मध्येच सरकारनं ४ वर्षांपुढील मुलांनी दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट घालणं कम्पल्सरी केलं होतं. त्यामुळं आता ९ महिन्यापुढच्या लेकरांना टू-व्हीलर वरुन नेताना हेल्मेट घालणं आणि हार्नेसनी बांधणं बंधनकारक असेल. हा नियम जाहीर आत्ता करण्यात आला असला, तरी अंमलबजावणी मात्र फेब्रुवारी २०२३ पासून होणार आहे.

आमचा एक पुणेकर भिडू मध्यंतरी दिल्लीला जाऊन आला, तिकडं त्याचं डोकं बधीर झालं. म्हणला ‘गाडी चालवणारा हेल्मेट घालतो, हे ठीके… पण मागं बसणाऱ्यानं पण हेल्मेट घालायचं? आपल्या पुण्यात असं नव्हतं.’ आता पुण्यातही हेल्मेट घालणं कंपल्सरी आहे, पण तरीही दिल्ली किंवा गोव्यासारखं सगळे कार्यकर्ते हेल्मेट घालून गाड्या चालवतायत हे चित्र तुम्हाला स्वप्नात दिसू शकतं, पण सत्यात नाही. खोटं वाटत असेल, तर पुण्यातल्या सिग्नलला थांबलात तर जरा आजूबाजूला नजर फिरवा.

पण पुणेकरांचं आणि हेल्मेटचं वाकडं आहे का?

आम्ही कोथरुडमध्ये राहणाऱ्या एका काकांना विचारलं, ते म्हणाले ”बाळ… विरोध हेल्मेटला नाही सक्तीला आहे.” काकांना ‘सिग्नल पाळायची पण सक्ती आहे, उद्यापासून मोडणार का?’ असं विचारल्यावर मात्र काका चिडून गेले. पुणेकर कार्यकर्ते म्हणजे डेंजर विषय असतोय. २०१९ मध्ये जेव्हा पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली, तेव्हा पुणेकरांनी त्याविरोधात आंदोलन केलं होतं. (नाद करा पण यांचा कुठं?)

पुणेकरांनी हेल्मेटसक्ती विरोधी कृती समिती स्थापन केली होती. सर्वपक्षीय कार्यकर्ते असलेल्या या समितीचं मत होतं, की नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात हेल्मेट सक्ती रद्द करावी. हायवेवर हेल्मेट सक्तीला आमचा काहीच विरोध नाही. सक्ती रद्द झाली नाही, तर आम्ही पुण्यात आंदोलन करु. याबाबत ही समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.

बरं एवढंच नाही, काही पुणेकरांनी हेल्मेट सक्तीविरोधात आरटीओवर हेल्मेट न घालता, टू व्हीलर मोर्चा काढला होता, (झुकेगा नहीं म्हणणाऱ्या पुष्पाला ट्युशन दिल्या असत्या ओ इकडच्या लोकांनी.) एका कार्यकर्त्यानी इलेक्शन लढवायचं ठरवलं. चिन्ह निवडलं हेल्मेट आणि मुद्दा निवडला हेल्मेट सक्ती. अधिकृतपणे हेल्मेट सक्ती मागं घेण्यात आली नसली, तरी पोलिस कधी कधी पावती फाडतात, तर कधीकधी ताकीद देऊन सोडतात.

हेल्मेट या विषयावर आम्ही फक्त कोथरुडमधल्या कार्यकर्त्यांशी बोलूनच थांबलो नाही, तर काही पुणेकर भिडूंनाही प्रश्न विचारले…

शनिवार पेठेत राहणारा मयूर मेंगे म्हणतो, ”मी बाणेरला ऑफिसला जातो, कधीकधी हायवेवरुन प्रवास करावा लागतो, तेव्हा हेल्मेट घालतो. पण सिटीत फिरताना हेल्मेटची एवढी गरज वाटत नाही, आधीच इथले रस्ते छोटे आहेत, त्यात त्याच्यावर एवढं ट्रॅफिक असतं. गाडी ६० च्या पुढं जात नाही, मग कशाला हेल्मेट घाला?”

वानवडीला (पुण्यातच येतं भिडू) राहणाऱ्या हर्षदाचं मत काहीसं वेगळं आहे, ”ती म्हणते शक्यतो मी हेल्मेट घालतेच. तुम्ही लांबचा प्रवास करत असाल, तर हेल्मेट जवळ असायलाच हवं. पण एखाद्यावेळी हेल्मेट नसलं तर मोठा दंड करणं चुकीचं आहे. आधी रस्त्यांवरचे खड्डे बुजवायला हवे, सिग्नल नीट करायला हवे मग हेल्मेट सक्ती करणं ठीक आहे.”

एका कार्यकर्त्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर उत्तर दिलं, ”ज्यांना डोकं आहे ते गाडी नीटच चालवतात, त्यांना सक्ती वैगरेची गरज पडत नाही.” एक जण तर काय बोललाच नाही, खास पुणेरी हसला.

२०१८ मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार ४ हजार पेक्षा जास्त टू व्हीलर चालकांचा अपघातात मृत्यू झाला. त्यातल्या ७५ टक्के पेक्षा जास्त टू व्हीलरवाल्यांनी हेल्मेट घातलं नव्हतं. त्यामुळं तुम्ही कुठलेही असा, तुम्हाला आवडो-न आवडो पण हेल्मेट घाला. कारण जीव सलामत राहिला, तरच सक्तीला विरोध करता येऊ शकतोय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.