योगींनी बोलवलेली बॉलिवूडची मीटिंग अण्णानं २ मिनीटांच्या भाषणात गाजवली…

बॉलिवूडमध्ये अण्णा म्हणून ओळख असलेला सुनील शेट्टी हा मागचे बरेच दिवस अभिनेता म्हणून काही फारसा दिसलेला नाही. असं असलं तरी त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांना तो एक फिटनेस फ्रीक माणूस असल्याचं माहिती असेलच. आता सुनील शेट्टी पुन्हा चर्चेत आलाय.

सुनील शेट्टीने योगी आदित्यनाथ यांच्यासमोर फिल्म इंडस्ट्रीबद्दलची काही मतं मांडली आणि तो व्हिडीओ सध्या जबरदस्त चर्चेचा विषय ठरतोय.

आदित्यनाथ यांनी बोलवलेल्या एका मीटिंगमध्येच सुनील शेट्टीने मतं मांडली आहेत.

ही मीटिंग नेमकी कसली होती तर, योगी आदित्यनाथ हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध उद्योगपतींची भेट घेऊन त्यांना उत्तर प्रदेशात येण्याचं निमंत्रण दिलं. याशिवाय, त्यांनी रोड शो केला…

पण खरी चर्चा रंगली ती आदित्यनाथ यांनी सिनेसृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांची जी मीटिंग घेतली त्या मीटिंगचीच.

ही मीटिंग त्यांनी बोलवली त्यामागचं कारण होतं ते म्हणजे योगींनी युपीमधल्या नोएडामध्ये फिल्मसिटी बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. त्यासाठी त्यांनी कामाला ही सुरूवात केलीये. पण, जरी फिल्म सिटी पूर्ण झाली तरी तिथे काम करण्यासाठी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांची इच्छा आहे का हे योगींना पाहायचं होतं. सिनेमा नोएडामध्ये बनवायचा झाला तर त्यात काय अडचणी येतील हे ही त्यांनी जाणून घेतलं.

या मीटिंगद्वारे आदित्यनाथ यांनी सिनेनिर्मात्यांना एक प्रकारे युपीमध्ये येऊन काम करण्याचं आवाहनच केलं. हे लक्षात येतं ते मीटिंगवेळी झळकलेल्या पोस्टरवरून. या पोस्टरवरचा मजकूर होता, ‘वेलकम टू उत्तर प्रदेश. मोस्ट फिल्म फ्रेंडली सिटी इन इंडिया.’

या टॅगलाईन वरून योगींचा फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशात घेऊन जाण्याचा मनसूबा तर स्पष्ट होतोय. पण, त्यांच्या मनसुब्या पेक्षा आणि मीटिंगला उपस्थित असलेल्या सर्वांपेक्षा जास्त चर्चेत राहिलं ते सुनील शेट्टीचं भाषण.

या भाषणात सुनील शेट्टी म्हणलाय,

“आज आम्हाला पैश्यांचा प्रॉब्लेम होत नाहीये. तर, मुळ प्रॉब्लेम हा ऑडियन्सकडून हॅशटॅग्जचा जो ट्रेंड सुरू आहे त्याचा त्रास होतोय. आणि तुम्ही जर यात लक्ष घातलं तर, हे थांबू शकतं. आम्ही दिवसभर ड्रग्ज घेत नाही… आमची ही इमेज बदलणं गरजेचं आहे.”

याशिवाय, उत्तर प्रदेश ही जागा चित्रपट निर्मितीसाठी नक्कीच उत्तम असू शकते असंही तो म्हणाला.

सुनील शेट्टीने मांडलेले हे विचार ऐकून मात्र, मीटिंगसाठी आलेल्या सर्व सिनेनिर्मात्यांनी टाळ्या वाजवून त्याला समर्थनही दर्शवलं.

आजच्या मीटिंगमध्ये गाजलेला सुनील शेट्टी उर्फ अण्णा सध्या इंडस्ट्रीमध्ये फारसा दिसत नाही. हे खरंय. पण, मग तो सध्या काय करतो?

तर, याचं उत्तर आहे तो सध्या तेच करतो जे तो अभिनेता होण्याआधी करत होता.

म्हणजेच काय तर, अभिनय क्षेत्रात येण्याआधी तो व्यावसायिक होता… व्यवसाय कसला? तर, त्याच्या वडिलांचाच मुळात हॉटेलचा व्यवसाय होता. त्याच्या वडिलांचं एक उडपी हॉटेल होतं. त्यामुळे व्यवसायाचे धडे त्याला घरातूनच मिळाले. अभिनेता होण्याआधी त्यानेही हॉटेल व्यवसायातच मन रमवलं होतं.

येवढंच कशाला अगदी, त्याला त्याच्या आयुष्याची साथीदारही एका बीझनेस पार्टीमध्ये सगळ्यात आधी दिसली होती.

त्यानंतर मग ओळख वाढवायची म्हणून  सुनीलने स्वत:च एक पार्टी ऑर्गनाईझ केली आणि त्या मुलीला पार्टीला बोलवलं. तिथे मग ओळख झाली आणि अण्णा एखाद्या हीरोप्रमाणे पार्टीनंतर तिला बाईकवरून लाँग राईडलाही घेऊन गेला. पुढे मग त्यांनी लग्नही केलं.

लग्न केलं तरीही सुनील शेट्टी अभिनेता म्हणून जगासमोर आला नव्हता.

१९९१ मध्ये लग्न झालं तर, १९९२ मध्ये सुनील शेट्टीचा पहिला सिनेमा रीलिज झाला. ‘बलवान’ हा त्याचा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला आणि इंडस्ट्रीला एक नवा अ‍ॅक्शन हीरो मिळाला. त्यानंतर मग सुनील शेट्टीने बरेच सिनेमे केले. अनेक सिनेमे सुपरहीटही झाले.

साधारण, २०१० च्या सुमारास त्याने इंडस्ट्रीत काम करणं कमी केलं. त्यानंतर, मग त्याने व्यवसायाकडे लक्ष दिलं.

सध्या तो हॉटेल व्यवसायात आहे. मुंबईमध्ये H2O नावाचा त्याचा रेस्टोबार आहे. अगदी व्यावसायिकांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटीजपर्यंत त्याच्या या हॉटेलमध्ये येतात. शिवाय, त्याचे वडील एकेकाळी ज्या उडपी हॉटेलचे मालक होते ते हॉटेल त्याने पुन्हा विकत घेतलं. सध्या लिटील इटली या नावाने तो हे रेस्टॉरंट चालवतो.

शिवाय, मोअर मिसशेफ या नावाने सुनिल शेट्टीचा क्लोथिंग ब्रँडसुद्धा आहे.

याशिवाय, लॉकडाऊन एशियन पेंट्स या कंपनीनं सुनील शेट्टीच्या लोणावळ्यातील फार्महाऊसा चा व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ पाहून अण्णाच्या व्यवसायाची व्याप्ती किती मोठी असेल हे सगळ्यांच्याच लक्षात आलं होतं.

सुनील शेट्टीचं अलीकडच्या काळातलं सिनेसृष्टीतलं काम सांगायचं झालं तर, त्याने २०२२ मध्ये धारावी बँक या वेबसीरिजमध्ये मुख्य भुमिका साकारली होती. याशिवाय, पॉपकॉर्न एन्टर्टेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाने त्याचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊसही आहे.

थोडक्यात सध्या इंडस्ट्रीत कमी दिसत असला तरी अजूनही आपला अण्णा प्रोड्यूसर, अभिनेता आणि व्यावसायिक अशी तिहेरी भुमिका बजावतोय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.